अध्याय तेरावा
तरि आंगें कर्में ढिला । जो मनें विकल्प भरला । अडवींचा अवगळला । कुहा जैसा ॥677॥ तया तोंडीं कांटिवडे । आंतु नुसती हाडें । अशुचि तेणें पाडें । सबाह्य जो ॥678॥ जैसें पोटालागीं सुणें । उघडें झांकलें न म्हणे । तैसें आपुलें परावें नेणे । द्रव्यालागीं ॥679॥ एया ग्रामकुलाचां ठायीं । जैसा मिळणी ठावो अठावो नाहीं । तैसा स्त्रीविषयीं कांहीं । विचारीना ॥680॥ कर्माचा वेळु चुके । कां नित्य नैमित्तिक ठाके । तें जया न दुखे । जीवामाजीं ॥681॥ पापी जो निसुगु । पुण्याविषयीं अति निलागु । जयाचां मनीं वेगु । विकल्पाचा ॥682॥ तो जाण निखळा । अज्ञानाचा पुतळा । जो बांधोनि असे डोळां । वित्ताशेतें ॥683॥ आणि स्वार्थें अळुमाळें । जो धैर्यापासोनि चळे । जैसें तृणबीज ढळे । मुंगियेचेनि ॥684॥ पावो सूदलिया सवें । जैसें थिल्लर कालवे । तैसे भयाचेनि नांवें । गजबजे जो ॥685॥ वायूचेनि सावायें । धू दिगंतवरी जाये । दुःखवार्ता होये । तैसें जया ॥686॥ मनोरथांचिया धारसा । वाहणें जयाचिया मानसा । पूरीं पडिला जैसा । दुधिया पाहीं ॥687॥ वाउधणाचिया परी । जो आश्रो केहींचि न धरी । क्षेत्रीं तीर्थीं पुरीं । थारों नेणे ॥688॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : गर्वें पर्वताचीं शिखरें, तैसा महत्त्वावरूनि नुतरे
अर्थ
तरी जो शरीराने कर्म करण्याविषयी आळशी असतो, ज्याचे मन विकल्पाने भरलेले असते, तो म्हणजे रानातील त्याज्य म्हणून टाकलेला आडच होय. ॥677॥ त्या रानातील आडाच्या तोंडावर काटे वगैरे घाण पडलेली असते आणि आत फक्त हाडे असतात (पाणी नसते). त्या आडाप्रमाणे जो आतबाहेर अपवित्र असतो. ॥678॥ ज्याप्रमाणे कुत्रे पोटास अन्न मिळविण्याकरिता एखादा पदार्थ झाकलेला आहे की उघडा आहे हा विचार करीत नाही, त्याप्रमाणे द्रव्याकरिता जो आपले व परके अशी निवड जाणत नाही, ॥679॥ या कुत्र्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे कुत्रीच्या संगाला योग्य किंवा अयोग्य जागा याचा विचार नसतो, त्याप्रमाणे स्त्री-(संगा-) विषयी जो काही विचार करीत नाही ॥680॥ विहित कर्म करण्याची वेळ चुकली अथवा नित्य नैमित्तिक कर्मे राहिली तर त्याचे ज्याला मनात दु:ख वाटत नाही, ॥681॥ पाप करण्यात ज्याला काही लाज वाटत नाही आणि पुण्याविषयी तो अतिशय बेगुमान असतो व ज्याच्या मनात विकल्पाचे वारे भरलेले असते ॥682॥ जो आपल्या डोळ्यांपुढे धनाच्या इच्छेस कायम करून चालतो, तो एकरस अज्ञानाचा पुतळा आहे, असे समज. ॥683॥ आणि ज्याप्रमाणे गवताचे बीज मुंगीच्या धक्क्याने आपली जागा सोडते, त्याप्रमाणे थोड्याशा स्वार्थाकरिता जो केलेल्या निश्चयापासून ढळतो, ॥684॥ डबक्यात पाय घातल्याबरोबर जसे डबक्यातील पाणी गढूळ होते, त्याप्रमाणे भयाचे नाव ऐकल्याबरोबर जो घाबरून जातो ॥685॥ वायूच्या वेगाने धूर जसा दिशेच्या अंतापर्यंत पसरतो, त्याप्रमाणे दु:खाची बातमी ऐकल्याबरोबर, ज्याचे मन दु:खाने पुरे व्यापले जाते, ॥686॥ पुरात पडलेला भोपळा जसा पाण्याच्या ओघाबरोबर हवा तिकडे वाहात जातो, त्याप्रमाणे मनोरथांच्या ओघाने त्याचे मन भटकत असते, असे समज. ॥687॥ वावटळीप्रमाणे जो कोठे स्थिर राहात नाही व जो क्षेत्रात तीर्थांच्या ठिकाणी अथवा सप्त पुर्यांपैकी कोण्या एका पुरीत कायम राहण्याचे जाणत नाही ॥688॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : गार शेवाळें गुंडाळली, कां निंबोळी जैसी पिकली


