“अरे ओंकार, काहीच होऊ शकत नाही का रे आपल्या जाण्याबद्दल? आपण परत विचार करूयात नं? इथे पण तुला पुढे चांगल्या संधी चालून येतीलच की… आणि आता आठवीला श्रेयसची शाळा बदलायची म्हणजे खूप त्रास होईल आपल्याला. नाहीतर आपण असं करूयात का? असेही तुझं तिकडे स्थिरस्थावर होईपर्यंत थोडे दिवस आम्ही आहोतच इथे… नंतर पण आम्ही दोघे इथेच रहातो बाबांसोबत. त्याची शाळा संपली तीन वर्षांनी की, मग बघू तिकडे यायचं.”
अपर्णा ओंकारला समजावण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती आणि त्यासाठी कधीही तोंड वर करून न बोलणारी ती, एकदम एका दमात सगळं बोलून गेली. तसा तिच्या बोलण्याचा त्याच्यावर ढीम्म फरक पडणार नव्हता, हे तिलाही माहीत होतं. श्रेयस आणि त्याचे आजोबा म्हणजे सुधीरराव हे सगळं ऐकत होतेच. सुधीरराव पण नंतर न राहवून म्हणालेच, “ओंकार थांब ना? अरे, या महिन्यात श्रेयसची स्टेट लेव्हलची जलतरण स्पर्धा आहे, तर ती झाली की, पुढच्या महिन्यात जा. एवढ्या मोठ्या लेव्हलवरती गेल्यावर मुलांना आपले आईवडील असतील तर अजून उत्साह येतो.”
आता मात्र ओंकार चिडला… “तुम्हाला ना काही कळत नाही हो बाबा यातलं! तुम्ही नका बोलू यात… मला चांगला पगार, रहायला घर मिळतंय. शिवाय, तिथेच सेटल व्हायचा विचार आहे माझा. तुम्हाला नसेल यायचं, तर नका येऊ. पण आता आम्हाला थांबवू नका प्लीज.” असं म्हणता म्हणता ओंकार ऑफिसला जायला घराच्या बाहेर पडलासुद्धा. इथे सुधीररावांच्या मनावर किती घणाचे घाव पडले असतील, याचा त्याने जराही विचार केला नाही. अपर्णा हे सगळं ऐकून अवाकच झाली. तिला अजिबातच पटत नव्हतं ओंकारचं वागणं. त्यात आपल्यासमोर झालेला सासऱ्यांचा अपमान तिला पटला नाही…
हेही वाचा – सार्थक
“बाबा जाऊदे, तुम्ही नका लक्ष देऊ त्याच्याकडे. तो रागात असला की, काहीही बोलतो. राग झाला शांत, की कळेल त्याला त्याची चूक.” अपर्णा असं काहीबाही सांगून स्वयंपाकघरात गेली आणि श्रेयस तोंड पाडून शाळेत गेला. सुधीरराव नेहमीप्रमाणे शांतच होते. ते आपल्या खोलीतल्या आराम खुर्चीत बसून विचारात गुंग झाले.
“आज ही हवी होती, ती असती तर असा हा प्रसंग घडलाच नसता… आणि अगदी घडलाच असता तरी हिने छानपैकी तो हाताळला असता. मला तर वाटतं हिच्या प्रेमळ धाकाने तो गेलाच नसता अमेरिकेला. अगदीच गेला असता तरी आम्ही दोघे इथे आनंदाने राहिलो असतो, एकमेकांच्या सोबतीने. तसा खरंतर आधी मीच जायचो, पण अचानक उद्भवलेलं हाडांचं दुखणं, त्यातून कॅन्सरचे निदान आणि तिचं ते हसत मरणाला सामोरं जाणं सगळंच अद्भुत! किती धीराची ही! तेव्हाही ओंकारची मदत नसायचीच. पण अपर्णाने केलेली शुश्रूषा अगदी थक्क करणारी होती. आजकालच्या काळात कुठलीच सून एवढं करत नाही आपल्या सासूसाठी… तेही एकही शब्द न काढता!
लहानपणापासून ओंकार तसा माणूसघाणाच. कुणी आलं की, याची चिडचिड चालू असायची किंवा स्वतःच्याच नादात असायचा. मोठेपणी तरी सुधारेल असं वाटलं होतं आम्हाला दोघांना; पण त्याची भारतात राहण्याची पहिल्यापासून इच्छा नव्हतीच. पहिल्या नोकरीच्या ठिकाणी पण तीच खटपट आणि या नोकरीत पण बरेच वर्षांचे प्रयत्न आता सफल होतायत तर मी कोण अडवणार! पण आजच्या त्याच्या भाषेने मी जाम विव्हळलो. खूप आत कुठेतरी खुपलं. तो चक्क तुम्हाला यायचं नसेल तर, नका येऊ, असं म्हणाला. म्हणजे, याला मी याच्यासोबत यावं, असं अजिबात वाटत नाहीये. ही काय भाषा याची. मी फक्त दोन वाक्य बोललो तर एवढा त्रागा कशासाठी? आपल्याच मुलासाठी एवढा वेळ नाही काढता येत यांना? कठीण आहे रे देवा!”
मग ते सुमित्राबाईंच्या फोटोकडे बघत म्हणाले, “अहो! तुम्ही तर गेलात पहिल्या. मला मात्र हे सगळं बघायला ठेवलंत होय इथे! पण हा खरंच मला सोडून गेला, तर मी कसा जगू? एकट्याने कसं जमवू?” या विचारानेच त्यांचं अंग शहारलं. पण ते कसेबसे स्वतःला सावरत दिवस ढकलत राहिले.
जेव्हापासून हातात अमेरिकेला जायचं पत्रक पडलं होतं तेव्हापासून ओंकारचं वागणं बदललं होतं. अपर्णाची कुचंबणा सुद्धा त्याला दिसत नव्हती आणि वडिलांची घालमेल तर त्याच्या ध्यानीमनीही नव्हती. असेच काही दिवस गेल्यावर एक प्रसंग घडला. सुधीरराव रस्त्याने स्वतःचाच विचार करत असताना अचानक एका मोटारबाइकवाल्याने मागून त्यांना धडक दिली आणि हे जागीच पडले. जास्त जोरात धक्का नसल्याने जीवावर नाही बेतलं, पण हातापायाला चांगलाच मार लागला. उजव्या हाताला कच्चं प्लास्टर लागलं होतं आणि पायाला पट्टा लागला होता.
“लिगामेंट दुखापत आहे. कमीतकमी महिनाभर तरी पूर्ण आराम करा. नंतर व्यायामाने होईल बरं..” असं सांगून डॉक्टर गेले. आणि आता सगळेच चिंतेत पडले. ओंकारचा अजूनच त्रागा झाला. त्याने बाबांसमोर काही दाखवलं नाही. पण सुधीररावांना आपल्या मुलाचं मन आणि त्याचा पडलेला चेहरा अगदी सहज आरशासारखा वाचता आल. शेवटी बापच तो!
सुधीररावांची काळजी अपर्णा घेतच होती. ओंकारसुद्धा बाबांची अवस्था बघून हळूहळू वरमला होता. त्याचा उत्साह थोडा मावळला होता आणि त्याला खरंतर कळून चुकलं होतं की, खरंच बाबांना आपली गरज आहे. पण तरीही इतक्या वर्षांचं स्वप्नं कसं आवरतं घ्यायचं. तो कोंडीत सापडला होता.
एकदा अशाच एका रविवारी अपर्णा सुधीररावांना त्यांच्या हाताने जेवता येत नसल्याने जेवण भरवायला नेत होती. तेवढ्यात ओंकार तिकडे आला. “थांब अपर्णा, आज मी भरवतो बाबांना.” अपर्णा अवाक् झाली. तिने त्याच्या तोंडाकडे बघतच ताट त्याच्या हातात दिलं. ओंकार आज आपल्याला भरवणार म्हणून सुधीरराव अधिकच अवघडले. “अरे ओंक्या, तू कशाला भरवतोयस. आधीच अपर्णाकडून भरवून घ्यायला मला कसंतरीच होतं.” ओंकार हसतच म्हणाला, “असूदे बाबा! घ्या. अहो, मी पण भरवू शकतो. अपर्णाच नाही तर, मी पण काळजी घेऊच शकतो. म्हणूनच मी खूप विचार करून ठरवलं आहे. मी अमेरिकेला जायचा प्लॅन रद्द करतोय. ते काय नंतर पण जाता येईल. इथे तुमची काळजी कोण घेणार.” असं म्हणून त्याने गुपचूप भरवायला सुरुवात केली…
अपर्णा खूश झाली, “अरे वा! ओंकार शेवटी तुला कळलंच मला काय म्हणायचं होतं ते. चला देव पावला म्हणायचं. देवासमोर साखरच ठेवते.” हा सगळा संवाद सुधीरराव ऐकत होते. त्यांनी अपर्णाला डाव्या हाताने थांबायला सांगितलं आणि पुढे बोलायला लागले, “अपर्णा साखर ठेव, पण ओंकार थांबतो आहे म्हणून नव्हे, तर तो अमेरिकेला जातोय म्हणून ठेव. ही आनंदाची बातमी कळल्यापासून तू नेहमी करतेस त्याप्रमाणे हे केलंच नाहीस!” बाबांच्या या अनपेक्षित बोलण्याने ओंकार आणि अपर्णा बघतच राहिले बाबांकडे.
हेही वाचा – कौटुंबिक कथा… ‘सुखस्वप्न’
तेव्हा सुधीरराव धीर करून बोलले, “अरे हो तू तुझा प्लॅन माझ्यासाठी म्हणून अजिबात रद्द करू नकोस. मी काय आज आहे, उद्या नाही. पण कदाचित ही संधी तुला परत नाही मिळाली तर… आणि मी हे मनापासून बोलतोय. अरे, मी उलटाच विचार करत होतो, इतके दिवस. ही असती तर हिने तुला थांबवलं असतं, जाऊच दिलं नसतं वगैरे वगैरे.. पण गेल्या काही दिवसांत मी तुझ्या बाजूने विचार केला, तेव्हा उमजलं की, तुझ्या आईने तुला अजिबात थांबवलं नसतं. उलट तुझं हित कशात आहे, हे तिने मला समजावून सांगून तुला जाण्यासाठी होकार द्यायला फशी पाडलं असतं. अरे, मी थोडासा स्वार्थी झालो होतो. तू गेल्यावर माझं कसं होणार, मला काही झालं तर… पण माझ्यामुळे मी तुझ्या पायात बेड्या अजिबात अडकवणार नाही… आणि तुझ्या महत्वाकांक्षेआड तर मी अजिबातच येणार नाही. तू खुशाल जा आणि इथली माझी काळजी करू नकोस. थोडे दिवस अपर्णा आणि श्रेयस आहेतच, तोपर्यंत मी बरा होईन.
नंतर मी ठरवलं आहे की, मी एखाद-दोन पेईंग गेस्ट ठेवीन, म्हणजे मलाही सोबत होईल. सगळी हयात इथे गेल्यावर आता माझ्या शेवटच्या काळात मी तिथल्या वातावरणात नाही राहू शकणार रे. तेव्हा माझं सोड आणि तू तयारी कर.” असं म्हणून त्यांनी कसनुसं हसत ओंकारच्या डोक्यावर हात ठेवला.
ओंकारही खूश झाला. त्याच्या डोळ्यांवर परदेशी जाण्याचा गॉगल इतक्या प्रचंड प्रमाणात चढला होता की, त्यापुढे त्याला सुधीररावांच्या मनातली व्यथाही कळली नाही. त्याने बाबांना आनंदाने मिठीच मारली. अपर्णा मात्र ओंकारसाठी चेहऱ्यावर आनंद दाखवत होती खरी पण, तिला बाबांच्या अनपेक्षित निर्णयामागच्या यातना आणि डोळ्याआड दडवून ठेवलेले अश्रू स्पष्ट कळून चुकले होते…
शेवटी बाप बाप असतो आणि मुलाला त्याच्या मनाचा जराही थांगपत्ता लागत नाही हेच खरं…


