अध्याय तेरावा
शून्यसेजसाळिये । सुलीनतेचिये तुळिये । निद्रा केली होती बळियें । संकल्पें येणें ॥42॥ तो अवसांत चेइला । उद्यमीं सदैव भला । म्हणोनि ठेवा झाला । इच्छेसवें ॥43॥ निरालंबींची वाडी । त्रिभुवनायेवढी । हे तयाचिये जोडी । रूपा आली ॥44॥ महाभूतांचें एकवाट । सैरा वेंटाळूनि भाट । भूतग्रामांचे आघाट । चिरिले चारी ॥45॥ यावरी आदी । पांचवटेयाची बांधी । बांधली प्रभेदीं । पंचभूतिकीं ॥46॥ कर्माकर्माचे गुंडे । बांध घातले दोहींकडे । नपुंसकें बरडें । रानें केलीं ॥47॥ तेथ येरझारेलागीं । जन्ममृत्यूची सुरंगी । सुहाविली निलागी । संकल्पें येणें ॥48॥ मग अहंकारासि एकलाधी । करूनि जीवितावधी । वहाविलें बुद्धी । चराचर ॥49॥ यापरी निराळीं । वाढे संकल्पाची डाहाळी । म्हणोनि तो मुळीं । प्रपंचा यया ॥50॥ इया मतमुत्तकीं । तेथ पडिघायिलें आणिकीं । म्हणती हां हो विवेकीं । तरी तुम्ही भले ||51॥ परतत्त्वाचां गांवीं । संकल्पतेज देखावी । तरी कां पां न मनावी । प्रकृति तयांची? ॥52॥ परि हे असो नव्हे । तुम्ही या न लगावें । आतांचि हें आघवें । सांगिजेल ॥53॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जे प्राणाचां घरीं, अंगें राबते भाऊ चारी
अर्थ
शून्य जे ब्रह्म, त्या ब्रह्मरूपी शय्यागृहामध्ये, पूर्ण लीन अवस्थेच्या गादीवर, या बलवान अशा संकल्पाने निद्रा केली होती ॥42॥ तो (संकल्प) एकाएकी जागा झाला व तो उद्योगधंद्यामधे चांगला भाग्यवान असल्याकारणाने त्याने इच्छा केल्याबरोबर त्यास (त्रिभुवनरूपी) ठेवा प्राप्त झाला ॥43॥ निराकार परब्रह्मरूपी बागेत लीन दशेत असणारा त्रिभुवनाएवढा लाभ हा त्याच्यामुळेच व्यक्त दशेला आला ॥44॥ जिकडे तिकडे निरुपयोगी म्हणून पडलेली (अपंचीकृत) महाभूतरूपी पडजमीन (पंचीकरणरूप) मशागतीने सारखी करून स्वेदजादि प्राणिवर्गाच्या चार हद्दी कायम केल्या ॥45॥ यानंतर प्रारंभास वेगवेगळ्या पंचमहाभूतांच्या योगाने पंचात्मक मिश्रणांची शरीरे तयार केली ||46॥ मनुष्यशरीररूपी शेताच्या दोन बाजूस कर्माकर्मांच्या दगडांचे बांध घालून निकस अशा माळ जमिनीची राने (सुपीक जमीन) तयार केली ॥47॥ त्या रानात येण्याजाण्याकरता संकल्पाने कोणाचाही लाग जेथे लागणार नाही, असे जन्म-मृत्युरूपी भुयार उत्तम प्रकारचे तयार केले ॥48॥ मग या संकल्पाने आपले आयुष्य आहे, तेथपर्यंत अहंकाराबरोबर एकरूपता करून भेदबुद्धीकडून चराचरांची लागवड करविली ॥49॥ याप्रमाणे निराळी (परब्रह्मरूपी) संकल्पाची शाखा वाढते, म्हणून तो संकल्प या प्रपंचाला मूळ आहे ॥50॥ याप्रमाणे संकल्पवाद्यांच्या तोंडांतून मतरूपी मोती बाहेर आल्यावर त्यांस दुसरे जे स्वभाववादी, त्यांनी दाबले. (येथून स्वभाववाद्यांचे मत सांगतात) ते म्हणाले, अहो महाराज, आपण तर चांगलेच विचारवंत दिसता ॥51॥ परब्रह्मरूपी गावांत संकल्पाची शेज (लीन-अवस्था) जर मानावयाची, तर प्रकृतिवाद्यांची प्रकृति ब्रह्माच्या ठिकाणी का मानू नये? ॥52॥ पण हे बोलणे राहू द्या. तुमचे म्हणणे बरोबर नाही. तुम्ही या क्षेत्रनिर्णयाच्या नादी लागू नका. आता हे सर्व (आमच्याकडून) सांगण्यात येईल ॥53॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : रचूनि महत्तत्त्वाचें खळें, मळी एके काळुगेनि पोळें


