अध्याय तेरावा
हे बहु उखिविखी । ऋषीं केली नैमिषीं । पुराणें इयेविषीं । मतपत्रिका ॥66॥ अनुष्टुभादि छंदें । प्रबंधीं जिये विविधें । ते पत्रावलंबन मदें । करिताति अझुनी ॥67॥ वेदींचें बृहत्सामसूत्र । देखणेपणें पवित्र । परी तयाही हें क्षेत्र । नेणवेचि ॥68॥ आणीक आणीकींही बहुतीं । महाकवीं हेतुमंतीं । ययालागीं मती । वेंचिलिया ॥69॥ परी ऐसें हें एवढें । कीं अमुकेयाचेंचि फुडें । हें कोणाही वरपडें । होयचिना ॥70॥ आतां यावरी जैसें । क्षेत्र हें असे । तुज सांगों तैसें । साद्यंतु गा ॥71॥
महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च । इन्द्रियाणि दशैकं च पञ्च चेन्द्रियगोचराः ॥5॥ इच्छा द्वेषः सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः ।एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम् ॥6॥
तरि महाभूतपंचकु । आणि अहंकारु एकु । बुद्धि अव्यक्त दशकु । इंद्रियांचा ॥72॥ आणीकही एकु । विषयांचा दशकु । सुख दुःख द्वेषु । संघात इच्छा ॥73॥ आणि चेतना धृती । एवं क्षेत्रव्यक्ती । सांगितली तुजप्रती । आघवीचि ॥74॥ आतां महाभूतें कवणें । कवण विषयो कैसीं करणे । हें वेगळालेपणें । एकैक सांगों ॥75॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : कर्माकर्माचे गुंडे, बांध घातले दोहींकडे
अर्थ
नैमिष अरण्यात ऋषींनी या क्षेत्रासंबंधाने पुष्कळ वादविवाद केला आहे. ह्याविषयी पुराणेही साक्षीभूत आधार आहेत ॥66॥ अनुष्टुप् छंदादि जी निरनिराळ्या प्रकारची (या क्षेत्रासंबंधी) काव्यरचना आहे, ती ज्या ग्रंथात आहे, त्या ग्रंथाचा अद्यापपर्यंत लोक गर्वाने आश्रय करतात ॥67॥ ऋग्वेदातील जे बृहत् सामनामक सूत्र आहे ते ज्ञानदृष्टीने पवित्र आहे. (त्यामधे पुष्कळ ज्ञान भरलेले आहे). तथापि ह्या सूत्रासही हे क्षेत्र समजले नाही ॥68॥ आणखी पुष्कळ युक्तियुक्त अशा मोठ्या ज्ञात्यांनी या क्षेत्रनिर्णयाकरिता आपापली बुद्धि खर्च केली ॥69॥ परंतु हे क्षेत्र असे आहे अथवा एवढे आहे अथवा हे अमक्यांच्या मालकीचे नक्की आहे, असे अजूनपर्यंत कोणासही कळलेले नाही ॥70॥ आता अर्जुना, यानंतर क्षेत्र जसे आहे तसे आरंभापासून शेवटपर्यंत तुला सांगतो ॥71॥
पाच महाभूतें, अहंकार, बुद्धि, अव्यक्त (मूलप्रकृति) दहा इंद्रिये व अकरावे मन आणि इंद्रियांना गोचर असे पांच पांच दहा विषय, ॥5॥ इच्छा, द्वेष, सुख, दु:ख, चेतना, धैर्य आणि संघात हे विकारांसह क्षेत्र आहे असे संक्षेपाने सांगितले आहे. ॥6॥
तर पाच महाभूतांचा समुदाय आणि एक अहंकार, बुद्धि, अव्यक्त, दहा इंद्रियांचा समुदाय ॥72॥ आणखी एक (मन), दहा विषयांचा समुदाय, सुख, दु:ख, द्वेष, संघात, इच्छा ॥73॥ आणि चेतना व धृति (सर्व मिळून छत्तीस तत्त्वे) याप्रमाणे तुला सर्व क्षेत्र स्पष्ट सांगितले ॥74॥ आता महाभूतें, कोणती व विषय कोणते, इंद्रिये ती कशी, हे निरनिराळे एकेक सांगतो ॥75॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : रोमां कवण पेरी, कोण समुद्र भरी


