अध्याय तेरावा
हें सुख हें दुःख । हें पुण्य हें दोष । कां हें मैळ हें चोख । ऐसें निवडी ॥86॥ जिथे अधमोत्तम सुझे । जिये सानें थोर बुझे । जिया दिठी पारखिजे । विषो जीवें ॥87॥ जे तेजतत्त्वाची आदी । जे सत्त्वगुणाची वृद्धी । जे आत्मया जीवाची संधी । वसवीत असे ॥88॥ अर्जुना ते गा जाण । बुद्धि तूं संपूर्ण । आतां आइकें वोळखण । अव्यक्ताची ॥89॥ पैं सांख्यांचां सिद्धांतीं । प्रकृती जे महामती । तेचि एथें प्रस्तुतीं । अव्यक्त गा ॥90॥ आणि सांख्ययोगमतें । प्रकृती परिसविली तूंतें । ऐसी दोहीं परीं जेथें । विवंचिली ॥91॥ तेथ दुजी जे जीवदशा । तिये नांव वीरेशा । येथ अव्यक्त ऐसा । पर्यावो हा ॥92॥ तऱ्ही पाहालया रजनी । तारा लोपती गगनीं । कां हारपें अस्तमानीं । भूतक्रिया ॥93॥ नातरी देहो गेलिया पाठीं । देहादिक किरीटी । उपाधि लपे पोटीं । कृतकर्माचां ॥94॥ कां बीजमुद्रेआंतु । थोके तरु समस्तु । कां वस्त्रपण तंतु- । दशे राहे ॥95॥ तैसे सांडोनियां स्थूळधर्म । महाभूतें भूतग्राम । लया जाती सूक्ष्म । होऊनि जेथे ॥96॥ अर्जुना तया नांवें । अव्यक्त हें जाणावें । आतां आइकें आघवें । इंद्रियभेद ॥97॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : तरि महाभूतपंचकु, आणि अहंकारु एकु
अर्थ
हे सुख, हे दु:ख, हे पुण्य, हे पाप अथवा हे अशुद्ध, हे शुद्ध याप्रमाणे जी निवड करते, ॥86॥ जिला निंद्य व उत्तम कळते, जी लहान अथवा थोर समजते व ज्या दृष्टीने जीव विषयांची परीक्षा करतो, ॥87॥ जी तेजतत्त्वाचे उत्पत्तिस्थान आहे, जी सत्त्व गुणाची वाढती अवस्था आहे आणि जी आत्मा व जीव यांच्यामधील जागेत राहते ॥88॥ अर्जुना, ती सर्व बुद्धि होय असे तू समज. आता अव्यक्ताचे चिन्ह ऐक ॥89॥ हे महामते अर्जुना, सांख्यांच्या सिद्धांतामध्ये जी प्रकृति म्हणून सांगितली आहे तीच येथे सांप्रत अव्यक्त आहे ॥90॥ आणि सांख्य नामक योगाच्या मताप्रमाणे तुला प्रकृति ऐकवली. (तेव्हा) परा व अपरा अशा दोन्ही प्रकारांनी जेथे (अध्याय 7 श्लोक 4-5) तुला प्रकृतीची फोड करून सांगितली ॥91॥ तेथे त्या पैकी दुसरी परा म्हणजे जीवदशा नामक प्रकृति आहे, अर्जुना तिला अव्यक्त हे दुसरे नाव आहे. ॥92॥ (जीवरूप प्रकृतीला येथे अव्यक्त का म्हणावयाचे याची स्पष्टता येथून करतात) तर रात्र उजाडल्यावर तारे जसे आकाशात लीन होतात, अथवा सूर्यास्त झाल्यावर प्राण्यांचे जसे व्यवहार थांबतात ॥93॥ अथवा अर्जुना देह गेल्यावर देहादि उपाधी केलेल्या कर्मांच्या पोटात लीन होऊन असते ॥94॥ अथवा बीजाच्या आकारात ज्याप्रमाणे संपूर्ण झाड लीन रूपाने असते, किंवा वस्त्रपण तंतुरूपाने रहाते ॥95॥ त्याप्रमाणे स्थूल धर्म टाकून पंचमहाभूते व पंचमहाभूतांपासून झालेले प्राण्यांचे समुदाय, हे सूक्ष्म होऊन जेथे लीन होऊन जातात ॥96॥ अर्जुना, ते म्हणजे अव्यक्त असे समज. आता इंद्रियांचे सर्व प्रकार ऐक ॥97॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : नवल अहंकाराची गोठी, विशेषें न लगे अज्ञानापाठीं


