अध्याय तेरावा
तरी पृथ्वी आप तेज । वायु व्योम इयें तुज । सांगितलीं बुझ । महाभूतें पांचें ॥76॥ आणि जागतिये दशे । स्वप्न लपालें असे । नातरी अंवसे । चंद्र गूढु ॥77॥ नाना अप्रौढबाळकीं । तारुण्य राहे थोकीं । कां न फुलतां कळिकीं । आमोदु जैसा ॥78॥ किंबहुना काष्ठीं । वन्हि जेवीं किरीटी । तेवीं प्रकृतिचां पोटीं । गोप्यु जो असे ॥79॥ जैसा ज्वरु धातुगतु । अपथ्याचें मिष पहातु । मग जालिया आंतु । बाहेरी व्यापी॥80॥ तैसी पांचांही गांठीं पडे । जैं देहाकारु उघडे । तैं नाचवी चहूंकडे । तो अहंकारु गा ॥81॥ नवल अहंकाराची गोठी । विशेषें न लगे अज्ञानापाठीं । सज्ञानाचे झोंबे कंठीं । नाना संकटीं नाचवी ॥82॥ आतां बुद्धि जे म्हणिजे । ते ऐसां चिन्हीं जाणिजे । बोलिलें यदुराजें । तें आइकें सांगों ॥83॥ तरी कंदर्पाचेनि बळें । इंद्रियें वृत्तीचेनि मेळें । विभांडूनि येती पाळे । विषयांचे ॥84॥ तो सुखदुःखांचा नागोवा । जेथ उमाणों लागे जीवा । तेथ दोहींसीहू बरवा । पाडु जे धरी ॥85॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : रोमां कवण पेरी, कोण समुद्र भरी
अर्थ
तर पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश, ही तुला सांगितली ती पंचमहाभूते समज ॥76॥ आणि जागृतावस्थेत स्वप्न जसे लीन असते अथवा अमावास्येच्या दिवशी चंद्र जसा गुप्त असतो ॥77॥ अथवा लहान बालकांमधे तारुण्य जसे गुप्त असते, अथवा न उमललेल्या कळीत जसा सुवास गुप्त असतो ॥78॥ फार काय सांगावे! अर्जुना, लाकडामधे अग्नी जसा गुप्त असतो त्याप्रमाणे प्रकृतीच्या पोटात जो (अहंकार) गुप्त असतो ॥79॥ ज्याप्रमाणे शरीरातील धातूंमधे गुप्त असलेला (हाडी) ज्वर प्रगट होण्याकरिता कुपथ्याच्या निमित्ताची वाट पहात असतो, मग कुपथ्य झाल्याबरोबर तो शरीराला जसा आतून बाहेरून व्यापून टाकतो ॥80॥ त्याप्रमाणे अर्जुना, पंचमहाभूतांची गाठ पडल्यावर (पंचीकरण झाल्यावर) ज्या वेळेस देहाचा आकार स्पष्ट होतो त्या वेळेस जो देहाला चोहीकडे नाचवितो (कर्म करण्यास लावितो) तो अहंकार होय ॥81॥ अहंकाराची गोष्ट काही विलक्षण आहे. ती अशी की, अहंकार हा अज्ञानी पुरुषांच्या मागे विशेषेकरून लागत नाही, परंतु ज्ञानवान पुरुषाचे नरडे धरतो आणि त्याला नाना प्रकारच्या संकटांत गोते खावयास लावतो ॥82॥ आता बुद्धि जी म्हणतात ती पुढे सांगितलेल्या लक्षणांनी समजावी. ती सांगतो, अर्जुना ऐक, असे यादवश्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले ॥83॥ तर कामाच्या जोरावर वृत्तीसह इंद्रिये ही विषयांचे समुदाय जिंकून येतात (आणितात) ॥84॥ त्या सुखदु:खांच्या लुटीचा अंत:करण जेव्हा जीवाला हिशेब द्यावयास लागते, तेव्हा सुख व दु:ख या दोहोंविषयी (यांच्या बऱ्यावाइटाविषयी) जी योग्य निवड निश्चित करते ॥85॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : तरि महाभूतपंचकु, आणि अहंकारु एकु


