अध्याय तेरावा
जें प्रवृत्तीसि मूळ । कामा जयाचे बळ । जें अखंड सूये छळ । अहंकारासी ॥111॥ जें इच्छेतें वाढवी । आशेतें चढवी । जें पाठी पुरवी । भयासि गा ॥112॥ द्वैत जेथें उठी । अविद्या जेणें लाठी । जें इंद्रियांतें लोटी । विषयांमाजी ॥113॥ संकल्पें सृष्टी घडी । सवेंचि विकल्पूनि मोडी । मनोरथांचिया उतरंडी । उतरी रची ॥114॥ जें भुलीचें कुहर । वायुतत्त्वाचें अंतर । बुद्धीचें द्वार । झाकविलें जेणें ॥115॥ तें गा किरीटी मन । या बोला नाहीं आन । आतां विषयाभिधान । भेदू आइकें ॥116॥ तरी स्पर्शु आणि शब्दु । रूप रस गंधु । हा विषयो पंचविधु । ज्ञानेंद्रियांचा ॥117॥ एहींचि पांचैं द्वारीं । ज्ञानासि धांव बाहेरी । जैसा कां हिरवे चारीं । भांबावे पशु ॥118॥ मग स्वर वर्णु विसर्गु । अथवा स्वीकार त्यागु । संक्रमण उत्सर्गु । विण्मूत्राचा ॥119॥ हे कर्मेंद्रियांचे पांच । विषय गा साच । जे बांधोनियां माच । क्रिया धांवे ॥120॥ ऐसे हे दाही । विषय इये देहीं । आतां इच्छा तेही । सांगिजैल ॥121॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जे तेजतत्त्वाची आदी, जे सत्त्वगुणाची वृद्धी
अर्थ
जे प्रवृत्तीला मूळ आहे व कामाला ज्याचे बळ आहे आणि जे अहंकाराला अखंड चेतविते ॥111॥ जे इच्छेला वाढविते, आशेला चढविते व जे अर्जुना भयाचे संरक्षण करते ॥112॥द्वैत जेथे उत्पन्न होते, ज्या योगाने अविद्या बलवान झाली आहे व जे इंद्रियांना विषयात ढकलते ॥113॥ जे आपल्या संकल्पाने सृष्टि बनविते व लागलीच विकल्पाने मोडते, आणि मनोरथांच्या उतरंडी उतरते व रचते ॥114॥ जे भ्रांतीचे कोठार आहे व जे वायुतत्त्वाच्या आतला गाभा आहे व ज्याने बुद्धीचे द्वार झाकले आहे, ॥115॥ अर्जुना, ते मन होय. यात काही अन्यथा नाही. आता विषयाची वेगवेगळी नावे ऐक ॥116॥ तर शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे पाच ज्ञानेंद्रियांचे पाच प्रकारचे विषय आहेत. ॥117॥ या पाच द्वारांनीच ज्ञान बाहेर धावते, ते कसे? तर जसे हिरवेगार गवत उगवलेल्या कुरणामधे जनावरे भांबावतात (तसे ज्ञान भांबावते) ॥118॥ मग तोंडाने स्वर आणि अक्षरे व विसर्ग यांचा उच्चार करणे, अथवा हाताने घेण्याची व टाकण्याची क्रिया करणे, पायाने चालणे, उपस्थाने मूत्राचा त्याग करणे व गुदाने मलाचा त्याग करणे ॥119॥ हे पाच कर्मेंद्रियांचे खरे पांच प्रकारचे विषय आहेत व त्यांचा पहाड बांधून त्यावरून क्रियेचा व्यवहार चालू रहातो ॥120॥ याप्रमाणे हे दहा विषय या देहामध्ये आहेत. व आता इच्छा काय, तेही सांगण्यात येईल ॥121॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : नीळिमा अंबरीं, कां मृगतृष्णालहरी


