अध्याय तेरावा
तरि श्रवण नयन । त्वचा घ्राण रसन । इयें जाणें ज्ञान- । करणें पांचें ॥98॥ इये तत्त्वमेळापंकीं । सुखदुःखाची उखिविखी । बुद्धि करिते मुखीं । पांचें इहीं ॥99॥ मग वाचा आणि कर । चरण आणि अधोद्वार । पायु हे प्रकार । पांच आणिक ॥100॥ कर्मेंद्रियें म्हणिपती । तीं इयें जाणिजती ।आइकें कैवल्यपती । सांगतसे ॥101॥ पैं प्राणाची अंतौरी । क्रियाशक्ति जे शरीरीं । तियेचि रिगिनिगी द्वारीं । पांचे इहीं ॥102॥ एवं दाहाही करणें । सांगितलीं देवो म्हणे । परिस आतां फुडेपणें । मन तें ऐसें ॥103॥ जें इंद्रियां आणि बुद्धि । माझारिलिये संधीं । रजोगुणाच्या खांदीं । तरळत असे ॥104॥ नीळिमा अंबरीं । कां मृगतृष्णालहरी । तैसें वायांचि फरारी । वावो जाहलें ॥105॥ आणि शुक्रशोणिताचा सांधा । मिळतां पांचांचा बांधा । वायुतत्त्व दशधा । एकचि जाहलें ॥106॥ मग तिहीं दाहीभागीं । देहधर्माचां खैवंगीं । अधिष्ठिलें आंगीं । आपुलालां ॥107॥ तेथ चांचल्य निखळ । एकलें ठेलें निढाळ । म्हणोनि रजाचें बळ । धरिलें तेणें ॥108॥ तें बुद्धीसि बाहेरी । अहंकाराचिया उरावरी । ऐसां ठायीं माझारीं । बळियावलें ॥109॥ वायां मन हें नांव । एऱ्हवीं कल्पनाचि सावेव । जयाचेनि संगें जीव- । दशा वस्तू ॥110॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : नवल अहंकाराची गोठी, विशेषें न लगे अज्ञानापाठीं
अर्थ
तर कान, डोळे, त्वचा, नाक, जिव्हा ही पाच ज्ञानेंद्रिये आहेत असे समज ॥98॥ या छत्तीस तत्वांच्या मेळ्यात बुद्धी ही या पाच इंद्रियांच्या द्वाराने सुखादु:खांची वाटाघाट करते ॥99॥ नंतर जीभ, हात, पाय, उपस्थ व गुद हे आणखी पाच इंद्रियांचे प्रकार आहेत ॥100॥ कर्मेंद्रिये ज्यास म्हणतात ती ही समज; असे मोक्षाचे स्वामी (श्रीकृष्ण) सांगतात. अर्जुना, ऐक ॥101॥ शरीरामध्ये क्रियाशक्ति म्हणून जी प्राणांची स्त्री आहे, तिचे शरीराच्या आत येणे व बाहेर जाणे या पाच द्वारांनी होते ॥102॥ याप्रमाणे दहाही इंद्रिये सांगितली, असे देव म्हणतात आता मन हे अशा प्रकारचे आहे. ते निश्चयाने ऐक. ॥103॥ जे मन इंद्रिये आणि बुद्धि यांच्यामधील जागेत रजोगुणाच्या खांद्यावर (आश्रयावर) चंचलपणे असते, ॥104॥ आकाशातील निळ्या रंगाप्रमाणे अथवा मृगजळातील लाटांप्रमाणे ज्याचा व्यर्थ खोटा भास होतो, ॥105॥ आणखी रेत व रक्त यांचा मिलाफ झाला असता पंचमहाभूतात्मक शरीराचा आकार तयार होतो. मग तेथे (त्या शरीरात) एकच वायुतत्त्व स्थानभेदेकरून (पंचप्राण व पंच उपप्राण असे) दहा प्रकारचे झाले ॥106॥ मग त्या दहा प्रकारच्या वायूंनी देहधर्माच्या बळकटीने त्या त्या प्राण्याच्या शरीरामधील ज्या जागा ठरल्या होत्या, त्या जागांचा आश्रय केला. ॥107॥ त्या ठिकाणी शुद्ध चांचल्य केवळ एकटे (आश्रयरहित) राहिले, म्हणून त्या चांचल्याने रजोगुणाचे बल धरले. (आश्रय केला). ॥108॥ ते (चांचल्य) बुद्धीच्या बाहेर व अहंकाराच्या उरावर म्हणजे बुद्धि व अहंकार यांच्यामधील जागेत बळकट होऊन बसले. ॥109॥ त्या चांचल्याला मन हे व्यर्थ नाव आहे. वास्तविक पाहिले तर ती एक मूर्तिमंत कल्पनाच आहे व ज्या मनाच्या संगतीने वस्तूला (ब्रह्माला) जीवदशा प्राप्त झाली आहे. ॥110॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जे तेजतत्त्वाची आदी, जे सत्त्वगुणाची वृद्धी


