अध्याय तेरावा
प्रकृतिं पुरुषं चैव विद्ध्यनादी उभावपि । विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसंभवान् ॥19॥
जया मार्गातें जगीं । सांख्य म्हणती योगी । जयाचिये भाटिवेलागीं । मी कपिल जाहलों ॥957॥ तो आइक निर्दोखु । प्रकृतिपुरुषविवेकु । म्हणे आदिपुरुखु । अर्जुनातें ॥958॥ तरी पुरुष अनादि आथी । आणि तैंचि लागोनि प्रकृति । संवसरिसी दिवोराती । दोनी जैसी ॥959॥ कां रूप नोहे वायां । परी रूपा लागली छाया । निकणु वाढे धनंजया । कणेंसीं कोंडा ॥960॥ तैसीं जाण जवटें । दोन्हीं इयें एकवटे ।प्रकृतिपुरुष प्रगटें । अनादिसिद्धें ॥961॥ पैं क्षेत्र येणें नांवें । जें सांगितलें आघवें । तेंचि एथ जाणावें । प्रकृति हे गा ॥962॥ आणि क्षेत्रज्ञु ऐसें । जयातें म्हणितलें असे । तो पुरुष हें अनारिसे । न बोलों घेईं ॥963॥ इयें आनानें नांवें । परि निरूप्य आन नोहे । हें लक्षण न चुकावें । पुढतपुढती ॥964॥ तरी केवळ जे सत्ता । तो पुरुष गा पांडुसुता । प्रकृति तें समस्तां । क्रिया नांव ॥965॥ बुद्धि इंद्रियें अंतःकरण । इत्यादि विकारभरण । आणि ते तीन्ही गुण । सत्त्वादिक ॥966॥ हा आघवाचि मेळावा । प्रकृति जाहला जाणावा । हेचि हेतु संभवा । कर्माचिया ॥967॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जें आदीची आदी, जें वृद्धीची वृद्धी
अर्थ
प्रकृति व पुरुष ही दोन्ही अनादि आहेत, असे जाण. (देहेंद्रियादि) विकार आणि (सत्त्व इत्यादि) गुण हे प्रकृतिपासून उत्पन्न झाले आहेत, असे जाण. ॥19॥
ज्या मार्गाला जगामध्ये योगी सांख्य असे म्हणतात, आणि ज्या सांख्यमार्गाचे महत्त्व वर्णन करण्याकरिता मी कपिल झालो ॥957॥ तो प्रकृतिपुरुषांचा शुद्ध विचार तू ऐक, असे आदिपुरुष जे श्रीकृष्ण, ते अर्जुनास म्हणाले ॥958॥ तर दिवस आणि रात्र ही दोन्ही जशी बरोबर चालणारी (चिकटलेली) आहेत, त्याप्रमाणे पुरुष अनादि आहे व प्रकृति ही त्यावेळेपासून (अनादि) आहे. ॥959॥ किंवा शरीर हे सावलीप्रमाणे आभासिक नाही, तरी पण त्या खर्या शरीरास ज्याप्रमाणे ती सावली नेहेमी जडलेलीच असते, किंवा अर्जुना, ज्याप्रमाणे दाणे येण्याच्या पूर्वीचे कणीस हे असार भूस व साररूप दाणे यांसह वाढते ॥960॥ त्याप्रमाणे उघड अनादिसिद्ध असलेले व एकमेकांत मिसळलेले, हे प्रकृतिपुरुष जुळ्यासारखे आहेत, असे समज. ॥961॥ अरे, क्षेत्र या नावाने जे सर्व सांगितले, तेच येथे ही प्रकृति होय, असे समजावे. ॥962॥ आणि (आम्ही) ज्याला क्षेत्रज्ञ असे म्हटले, तोच पुरुष आहे, असे समज. आम्ही अन्यथा काही बोलत नाही! ॥963॥ ह्यांस ही निरनिराळी नावे आहेत. परंतु ज्याच्याविषयी निरूपण करावयाचे ते वेगळे नाही, हे वर्म तू वारंवार चुकू नकोस. ॥964॥ अर्जुना, केवळ जी सत्ता (सदत्व) तिला पुरुष हे नाव आहे. आणि (संपूर्ण) क्रियेस प्रकृति हे नाव आहे. ॥965॥ बुद्धि, इंद्रिये, अंत:करण इत्यादि विकारांचा समुदाय व सत्त्वादि तिन्ही गुण ॥966॥ हा समुदाय प्रकृतीपासून झाला आहे असे समज, आणि ही प्रकृतीच कर्माच्या उत्पत्तीला कारण आहे. ॥967॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : एक क्षेत्र एक ज्ञान, एक ज्ञेय एक अज्ञान


