अध्याय तेरावा
कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्च्यते । पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्च्यते ॥20॥
तेथ इच्छा आणि बुद्धी । घडवी अहंकारेंसीं आधीं । मग तिया लाविती वेधीं । कारणाचां ॥968॥ तेंचि कारण ठाकावया । जें सूत्र धरणें उपाया । तया नांव धनंजया । कार्य पैं गा ॥969॥ आणि इच्छा मदाचां थावीं । लागली मनातें उठवी । तें इंद्रियें राहाटवी । हें कर्तृत्व पैं ॥970॥ म्हणोनि तिन्ही या जाणा । कार्यकर्तृत्वकारणा । प्रकृति मूळ हे राणा । सिद्धांचा म्हणे ॥971॥ एवं तिहींचेनि समवायें । प्रकृति कर्मरूप होये । परी जया गुणा वाढे त्राये । त्याचि सारिखी ॥972॥ जें सत्त्वगुणें अधिष्ठिजे । तें सत्कर्म म्हणिजे । रजोगुणें निपजे । मध्यम तें ॥973॥ जें कां केवळ तमें । होती जियें कर्में । निषिद्धें अधमें । जाण तियें ॥974॥ ऐसेनि संतासंतें । कर्में प्रकृतीस्तव होतें । तयापासोनि निर्वाळे तें । सुखदुःख गा ॥975॥ असंतीं दुःख उपजे । सत्कर्मीं सुख निफजे । तया दोहींचा बोलिजे । भोगु पुरुषा ॥976॥ सुखदुःखें जंववरी । निफजती साचोकारीं । तंव प्रकृति उद्यमु करी । पुरुषु भोगी ॥977॥ प्रकृतिपुरुषांची कुळवाडी । सांगतां असंगडी । जे आंबुली जोडी । आमुला खाय ॥978॥ आमुलया आंबुलिये । संगती ना सोये । कीं आंबुली जग विये । चोज ऐके ॥979॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : एक क्षेत्र एक ज्ञान, एक ज्ञेय एक अज्ञान
अर्थ
कार्य (मनाच्या प्रेरणेने इच्छित वस्तु मिळविण्याकरिता इंद्रियांकडून होणारी क्रिया) कारण (ज्याविषयी इच्छा उत्पन्न झाली असते तो पदार्थ, इच्छित वस्तु) कर्तृत्व (इच्छित वस्तुच्या प्राप्तीच्या उद्योगास मनाकडून होणारी प्रेरणारूप क्रिया) या सर्वास मूळ प्रकृति कारण आहे, असे म्हणतात आणि सुखदु:खांच्या भोगाला कारण पुरुष आहे, असे म्हणतात. ॥20॥
तेथे (प्रकृतीच्या ठिकाणी) अगोदर इच्छा आणि बुद्धि ही अहंकारास उत्पन्न करतात आणि मग त्या (इच्छा व बुद्धि) जीवाला कारणाच्या म्हणजे इच्छित वस्तु (मिळण्याच्या) नादी लावतात. ॥968॥ ज्याच्या प्राप्तीचा मनास चटका लागला असेल, तो पदार्थ प्राप्त करून घेण्याकरिता जे शारीरिक क्रियेचे सूत्र हातात धरून हालवावयाचे, अर्जुना, ह्या बाह्य प्रयत्नास ‘कार्य’ असे म्हणतात. ॥969॥ आणि मदाच्या आश्रयाने जीवास झालेली इच्छा मनाला चिथावते व नंतर ते मन इंद्रियांकडून इच्छित करवून घेते. इच्छेने उत्तेजित केलेल्या मनाकडून कर्मेंद्रियास होणार्या या प्रेरणांवरून क्रियेस, अर्जुना, कर्तृत्व असे म्हणतात. ॥970॥ आणि म्हणूनच, या तिन्ही कारण, कर्तृत्व व कार्य यांना प्रकृति ही मूळ आहे, असे समज. असे सिद्धांचे राजे श्रीकृष्ण म्हणाले. ॥971॥ याप्रमाणे या तिघांच्या समुदायाने प्रकृति कर्मरूप होते, परंतु ज्या गुणांचे आधिक्य होईल, त्यासारखी ती बनते. ॥972॥ ज्या कर्माचा सत्त्वगुण अंगीकार करतो, त्याला सत्कर्म म्हणावे, व जे कर्म रजोगुणापासून उत्पन्न होते, ते मध्यम जाणावे. ॥973॥ व जी कर्मे केवळ तमोगुणापासून होतात ती कर्मे शास्त्रविरुद्ध व निकृष्ट प्रतीची समजावीत. ॥974॥ अरे, याप्रमाणे बरीवाईट कर्मे प्रकृतिपासून होतात. मग त्या कर्मापासून जे उत्पन्न होते, ते सुखदु:ख होय. ॥975॥ वाईट कर्मापासून दु:ख उत्पन्न होते व सत्कर्मापासून सुख उत्पन्न होते व त्या दोन्हींचा (सुखदु:खांचा) भोग पुरुषाला होतो, असे म्हणतात. ॥976॥ सुख, दु:ख जोपर्यंत खरोखर उत्पन्न होतात, तोपर्यंत प्रकृति व्यापार करते व व पुरुष भोगतो. ॥977॥ प्रकृतिपुरुषांचा व्यवहार सांगावयास लागले असता, तो अघटित आहे. कारण की, या व्यवहारात स्त्री मिळविते व नवरा (आयता) खातो. ॥978॥ या प्रकृतिपुरुषरूप नवराबायकोंचा संबंध नसतो व त्यांच्यात मेळही नसतो. परंतु बायको (प्रकृति) जग प्रसवते, हे आश्चर्य ऐक. ॥979॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : तरी पुरुष अनादि आथी, आणि तैंचि लागोनि प्रकृति


