अध्याय तेरावा
इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः । मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते ॥18॥
एवं तुजपुढां । आदीं क्षेत्र सुहाडा । दाविलें फाडोवाडां । विवंचुनी ॥939॥ तेसेंचि क्षेत्रापाठीं । जैसेनि देखसी दिठी । तैसें ज्ञानही किरीटी । सांगितलें ॥940॥ अज्ञानाही कौतुकें । रूप केलें निकें । जंव आयणी तुझी टेंके । पुरे म्हणे ॥941॥ आणि आतां हें रोकडें । उपपत्तीचेनि पवाडें । निरूपिलें उघडें । ज्ञेय पैं गा ॥942॥ हे आघवीच विवंचना । बुद्धी भरोनि अर्जुना । मत्सिद्धिभावना । माझिया येती ॥943॥ देहादिपरिग्रहीं । संन्यासु करूनियां जिहीं । जीवु माझ्या ठाईं । वृत्तिकु केला ॥944॥ ते मातें किरीटी । हेंचि जाणोनियां शेवटीं । आपणपयां साटोवाटीं । मीचि होती ॥945॥ मीचि होती परी । हे मुख्य गा अवधारीं । सोहोपी सर्वांपरी । रचिलीं आम्हीं ॥946॥ कडां पायरी कीजे । निराळीं माचु बांधिजे । अथावीं सुइजे । तरी जैसी ॥947॥ एऱ्हवीं अवघेंचि आत्मा । हें सांगों जरी वीरोत्तमा । तरी तुझिया मनोधर्मा । गिळेल ना ॥948॥ म्हणोनि एकचि संचलें । चतुर्धा आम्हीं केलें । जें अदळपण देखिलें । तुझिये प्रज्ञे ॥949॥ पैं बाळ जैं जेवविजे । तैं घांसु विसा ठायीं कीजे । तैसें एकचि चतुर्व्याजें । कथिलें आम्हीं ॥950॥ एक क्षेत्र एक ज्ञान । एक ज्ञेय एक अज्ञान । हे भाग केले अवधान । जाणोनि तुझें ॥951॥ आणि ऐसेनही पार्था । जरी हा अभिप्रावो तुज हाता । नये तरी हे व्यवस्था । एक वेळ सांगों ॥952॥ आतां चौठायीं न करूं । एकही म्हणोनि न सरूं । आत्मानात्मया धरूं । सरिसा पाडु ॥953॥ परि तुवां येतुलें करावें । मागौनि तें आम्हां देयावें । जे कानाचि नांव ठेवावें । आपण पैं गा ॥954॥ या श्रीकृष्णाचिया बोला । पार्थु रोमांचितु जाला । तेथ देवो म्हणती भला । उचंबळेना ॥955॥ ऐसेनि तो येतां वेगु । धरूनि म्हणे श्रीरंगु । प्रकृतिपुरुषविभागु । परिसें सांगों ॥956॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : बाल्यादि तिन्हीं वयसीं, काया एकचि जैसी
अर्थ
याप्रमाणे क्षेत्र, तसेच ज्ञान आणि ज्ञेय ही संक्षेपाने सांगितली, हे (सर्व) जाणून माझा भक्त मत्स्वरूपाप्रती पावतो. ॥18॥
हे सुजाण अर्जुना, याप्रमाणे प्रथम हे क्षेत्र तुला स्पष्टपणाने व्यक्त करून दाखविले. ॥939॥ त्याचप्रमाणे क्षेत्राचा प्रकार सांगितल्यानंतर आम्ही ज्या रीतीने तुला डोळ्यांनी दिसेल, त्या रीतीने तुला ज्ञान सांगितले. ॥940॥ तुझी बुद्धी ‘पुरे’ म्हणून तृप्त होईतोपर्यंत कौतुकाने आम्ही अज्ञानाचेही चांगले वर्णन केले. ॥941॥ आणि अर्जुना, आताच विचाराच्या विस्तारांच्या विस्ताराने ज्ञेय मूर्तिमंत स्पष्ट करून सांगितले. ॥942॥ अर्जुना, हा सर्व विचार बुद्धीत भरून जे माझ्या भावनेने माझ्या स्वरूपसिद्धीला येतात ॥943॥ ज्यांनी देहादि परिग्रहाचा त्याग करून आपला जीव माझ्या ठिकाणी वतनदार केला ॥944॥ अर्जुना, (असे जे माझे भक्त) ते शेवट हाच विचार जाणून व आपला मोबदला मला घेऊन, मद्रूपच होतात. ॥945॥ अर्जुना, मद्रूप होण्याचा मुख्य प्रकार हा आहे, असे समज (व इतर) सर्व (मद्रूप) होण्याच्या प्रकारांपेक्षा हा सोपा आहे. ॥946॥ डोंगराच्या कड्याला (वर जाण्याकरिता) जशा पायर्या कराव्यात व आकाशाच्या पोकळीत वर जाण्याकरिता जशी माच बांधावी, किंवा खोल पाण्यातून जाण्याकरिता जशी त्या पाण्यात नाव घालावी. ॥947॥ सहज विचार करून पाहिले तर, सर्वच आत्मा आहे, हा विचार जर तुला एकदम सांगितला असता, तर हे वीरोत्तमा, तो विचार तुझ्या बुद्धीच्या आटोक्यात आला नसता. ॥948॥ तुझ्या बुद्धीचा असमर्थपणा पाहिल्याकारणाने, एकच सर्वत्र भरलेले जे परब्रह्म, ते आम्ही चार प्रकारचे केले. ॥949॥ मुलाला जेव्हा जेवावयास घालायचे असते, तेव्हा एक घास वीस ठिकाणी करावा लागतो, त्याप्रमाणे एकच परब्रह्म चार प्रकारच्या निमित्ताने आम्ही तुला सांगितले. ॥950॥ तुझी ग्रहणशक्ती पाहून (एकाच ब्रह्माचे) एक क्षेत्र, एक ज्ञान, एक ज्ञेय, एक अज्ञान असे आम्ही हे चार भाग केले. ॥951॥ आणि अर्जुना असे सांगूनही जर हा अभिप्राय तुला कळला नसेल, तर हाच प्रकार पुन्हा एक वेळ सांगू. ॥952॥ आता त्या ब्रह्माचे चार ठिकाणी विभाग करणार नाही. व सर्व एक ब्रह्मच आहे, असे करून संपविणार नाही, तर आत्मा व अनात्मा यांची सारखी योग्यता धरून प्रतिपादन करू. [एकाच ब्रह्माचे आत्मा (पुरुष) व अनात्मा (प्रकृति) असे भाग सारखे करून सांगू.] ॥953॥ परंतु तू मात्र एवढे कर की, आम्ही तुझ्याजवळ जे मागू ते तू आम्हांला दिले पाहिजे. ते मागणे हे, की तू आपल्या स्वत:स कानाचे नाव ठेव. (इतर सर्व इंद्रियांचे व्यापार बंद ठेऊन फक्त ऐकण्याचे काम चालू दे). ॥954॥ या श्रीकृष्णाच्या बोलण्याने अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ते पाहून देव म्हणाले, तू चांगला (योग्यतेचा) आहेस, पण हर्षवेगाने अनावर होऊ नकोस ॥955॥ अर्जुनाला येणारा हर्षाचा वेग याप्रमाणे श्रीकृष्णांनी आवरून, श्रीकृष्ण म्हणाले की प्रकृतिपुरुषाचा विभाग सांगतो ऐक. ॥956॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जें आदीची आदी, जें वृद्धीची वृद्धी


