सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
आघवां अवकाशीं जैसें । अवकाशचि होऊनि आकाश असे । तूं सर्वपणें तैसें । पातलासि सर्व ॥534॥ किंबहुना केवळ । सर्व हें तूंचि निखिळ । परि क्षीरार्णवीं कल्लोळ । पयाचे जैसे ॥535॥ म्हणोनियां देवा । तूं वेगळा नव्हसी सर्वां । हें आलें मज सद्भावा । आतां तूंचि सर्व ॥536॥
सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति ।
अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात् प्रणयेन वापि ॥41॥
परि ऐसिया तूतें स्वामी । कहींच नेणों जी आम्ही । म्हणोनि सोयरे संबंधधर्मी । राहाटलों तुजसीं ॥537॥ अहा थोर वाउर जाहलें । अमृतें संमार्जन म्यां केलें । वारिकें घेऊनि दिधलें । कामधेनूतें ॥538॥ परिसाचा खडवाचि जोडला । कीं फोडोनि गाडोरा आम्हीं घातला । कल्पतरू तोडोनि केला । कुंपु शेता ॥539॥ चिंतामणीची खाणी लागली । तेणेंवरी वोढाळें वोल्हांटिलीं । तैसी तुझी जवळिक धाडिली । सांगातीपणें ॥540॥ हें आजिचेंचि पाहें पां रोकडें । कवण झुंज हें केवढें । परि परब्रह्म तूं उघडें । सारथी केलासी ॥541॥ ययां कौरवांचिया घरा । शिष्टाई धाडिलासि दातारा । ऐसा वणिजेसाठीं जागेश्वरा । विकलासि आम्हीं ॥542॥ तूं योगियांचें समाधिसुख । कैसा जाणेचिना मी मूर्ख । उपरोधु जी सन्मुख । तुजसीं करूं ॥543॥
यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु ।
एकोऽथवाप्यच्युत तत् समक्षं तत्क्षामये त्वामहमप्रमेयम् ॥42॥
तूं या विश्वाची अनादि आदी । बैससी जियें सभासदीं । तेथें सोयरीकीचिया शब्दीं । रळीं बोलों ॥544॥
हेही वाचा – Dnyaneshwari : सकळ विश्वजीवन, जीवांसि तूंचि निधान
अर्थ
ज्याप्रमाणे सर्व पोकळीत आकाश हे पोकळी होऊन असते, त्याप्रमाणे तू सर्वांना व्यापून सर्व झाला आहेस. ॥534॥ फार काय सांगावे! हे सर्व त्रिभुवन केवळ तूच आहेस. परंतु क्षीरसमुद्रावर जशा क्षीराच्या लाटा असतात (त्याप्रमाणे त्रिभुवन हे तुझ्या ठिकाणी आहे). ॥535॥ म्हणून देवा, तू या सर्व जगाहून वेगळा नाहीस, हे खरोखर माझ्या अनुभवाला आले. तर आता देवा, सर्व तूच आहेस. ॥536॥
तुझा हा महिमा न जाणणार्या मी, प्रमादामुळे अथवा प्रेमामुळे मित्र समजून, तुच्छतापूर्वक, अरे कृष्णा, अरे यादवा, अरे सख्या, इत्यादी जे तुला बोललो – ॥41॥
परंतु एवढा मोठा तू असूनही हे प्रभो, आम्ही तुला केव्हांच जाणले नाही आणि त्यामुळे आम्ही तुझ्याशी असलेले आप्तसंबंधाचे नाते लक्षात घेऊन, त्या दृष्टीने तुझ्याशी वागणूक ठेवली. ॥537॥ अरे अरे! ही फारच अनुचित गोष्ट झाली की, मी सडा घालण्याच्या कामी अमृताचा उपयोग केला! आणि लहानसे शिंगरू घेऊन त्याच्या मोबदल्यात कामधेनूच देऊन टाकली. ॥538॥ तू म्हणजे आम्हाला प्रत्यक्ष परिसाचा खडकच लाभला होतास; पण तो फोडून आम्ही त्याचा उपयोग भिंतीचा पाया भरण्याच्या कामी केला, अथवा आम्ही कल्पवृक्ष तोडून त्याचे शेत राखण्याकरिता कु्ंपण केले! ॥539॥ मला तू (म्हणजे) चिंतामणी नामक रत्नांच्या खाणीचा लाभ झालास, परंतु या रत्नाचा उपयोग ओढाळ गुरांना हाकण्यासाठी केला. या तर्हेने तुझी प्राप्ती झाली असतानाही, ती प्राप्ती, तू स्नेही म्हणून व्यर्थ घालविली. ॥540॥ (मागच्या सर्व गोष्टी असू दे.) आजचीच प्रत्यक्ष गोष्ट पाहा की, हे युद्ध कसले आणि काय किमतीचे आहे? पण तू मूर्तिमंत परब्रह्म असताही तुला या युद्धात मी सारथी केले आहे! ॥541॥ हे दातारा, तडजोड करण्याकरिता कौरवांच्या घरी आम्ही तुला पाठविले. अशा प्रकारे देवा, तू प्रत्यक्ष जागृत दैवत असून देखील तुला आम्ही तडजोडीसारख्या सामान्य व्यवहाराकरिता खर्ची घातले. ॥542॥ तू योग्यांचे समाधिसुख आहेस; मी कसा मूर्ख की, हे मी जाणले नाही आणि तुझ्या तोंडावर तुला वर्मी लागेल, असे भाषण करीत होतो. ॥543॥
आणि हे अच्युता, क्रीडा, शयन, आसन, भोजन इत्यादी प्रसंगी तू एकटा असताना किंवा (लोकांच्या) देखत तुझा उपहास करण्याकरिता जो तुझा अपमान केला, त्याबद्दल हे अप्रमेया, तू मला क्षमा कर. ॥42॥
या विश्वाचे अनादि मूळ जो तू, तो ज्या सभासदांमध्ये बसत होतास, तेथे जे शब्द नातलगांशी बोलत असतांना शोभतील, त्या शब्दांनी आम्ही तुझ्याशी विनोद करीत होतो. ॥544॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसीं रूपें तियें अद्भुतें, आश्चर्यें स्फुरती अनंतें


