अध्याय तेरावा
अगाध सरोवरीं । कमळिणी जियापरी । कां सदैवाचां घरीं । संपत्ति जैसी ॥340॥ पार्था तेणें पाडें । क्षमा जयातें वाढे । तेही लक्षे तें फुडें । लक्षण सांगों ॥341॥ तरी पढिये लेणें । आंगीं भावें जेणें । धरिजे तेवीं साहणें । सर्वचि जया ॥342॥ त्रिविध मुख्य आघवे । उपद्रवांचे मेळावे । वरि पडिलिया नव्हे । वांकुडा जो ॥343॥ अपेक्षित पावे । तें जेणें तोषें मानवें । अनपेक्षिताही करवे । तोचि मानु ॥344॥ जो मानापमानातें साहे । सुखदुःख जेथ सामाये । निंदास्तुती नोहे । दुखंडु जो ॥345॥ उन्हाळेनि जो न तापे । हिमवंती न कांपे । कायसेनिही न वासिपे । पातलेया ॥346॥ स्वशिखरांचा भारु । नेणें जैसा मेरु । धरा यज्ञसुकरु । वोझें न म्हणे ॥347॥ नाना चराचरीं भूतीं । दाटणी नव्हे क्षिती । तैसा नाना द्वंद्वीं प्राप्तीं । घामेजेना ॥348॥ घेऊनी जळाचे लोट । आलिया नदीनदांचे संघाट । करी वाड पोट । समुद्र जेवीं ॥349॥ तैसें जयाचां ठायीं । न साहणें कहींचि नाहीं । आणि साहतु असे ऐसेंही । स्मरण नुरे ॥350॥ आंगा जें पातलें । तें करूनि घाली आपुलें । येथ साहतेनि नवलें घेपिजेना ॥351॥ हे अनाक्रोश क्षमा । जयापाशीं प्रियोत्तमा । जाण तेणें महिमा । ज्ञानासि गा ॥352॥ तो पुरुषु पांडवा । ज्ञानाचा वोलावा । आतां परिस आर्जवा । रूप करूं ॥353॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : काइसा वासु कापुरा, मंद जेथ अवधारा
अर्थ
फार खोल तळ्यात ज्याप्रमाणे कमळाचे वेल अथवा भाग्यवान पुरुषाच्या येथे जशी संपत्ति (आपोआप येत असते), ॥340॥ अर्जुना त्या मानाने ज्याच्या ठिकाणी क्षमा वाढत असते तेही ज्या लक्षणांपासून कळते, ती लक्षणे आम्ही निश्चितपणे सांगतो. ॥341॥ ज्या भावनेने आवडता अलंकार धारण करतात, त्याप्रमाणे जो सर्व सहन करतो ॥342॥ आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक अशा तीन प्रकारच्या तापांचे समुदाय आहेत, ते सर्व जरी एकदम त्याच्यावर कोसळले, तथापि जो डगमगत नाही ॥343॥ इच्छा असलेली एखादी वस्तु मिळाली असता जेवढा संतोष होतो, तेवढ्याच संतोषाने अनपेक्षित वस्तु प्राप्त झाली असता तिचा आदर करतो ॥344॥ मान व अपमान (मनाच्या सारख्या स्थितीने) सहन करतो; व सुखदु:खे ही ज्याच्या ठिकाणी सारखी मानली जातात व निंदेने आणि स्तुतीने ज्याच्या मनाची स्थिती दोन प्रकारची (दु:खाची व संतोषाची अशी) होत नाही ॥345॥ उन्हाळ्याने जो तापत नाही व हिवाळ्याने जो कापत नाही आणि काही जरी प्राप्त झाले तरी जो भीत नाही ॥346॥ मेरु पर्वत आपल्या शिखरांचे जसे ओझे मानीत नाही अथवा वराह अवतार ज्याप्रमाणे पृथ्वीला ओझे म्हणत नाही, ॥347॥ ज्याप्रमाणे अनेक चराचर प्राण्यांनी पृथ्वी जशी दडपली जात नाही, त्याप्रमाणे नाना प्रकारची सुखदु:खादि द्वंद्वे प्राप्त झाली असता जो श्रमी होत नाही. ॥348॥ पाण्याचे लोट घेऊन नदी व नद यांचे समुदाय आले असता समुद्र ज्याप्रमाणे आपल्यात सर्वांचा समावेश करुन घेतो, ॥349॥ त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी सहन न करणे हे कधीच नसते आणि आपण सहन करीत आहोत अशी आठवणही ज्याचे ठिकाणी रहात नाही, ॥350॥ जे जे काही सुखदु:खादि भोग शरीराला प्राप्त होतात ते सर्व आपले स्वरूपच आहे असे तो समजतो व म्हणून आपण अलौकिक असे काही सहन करतो असा अभिमानाचा पगडा त्याच्यावर बसत नाही. ॥351॥ हे प्रियोत्तमा अर्जुना, दातओठ न चावता स्वभावत:च असलेली ही क्षमा ज्याच्या ठिकाणी असते, त्या पुरुषाच्या योगाने ज्ञानास मोठेपण प्राप्त होते, असे समज. ॥352॥ अर्जुना, तो पुरुष ज्ञानाचे जीवन आहे. आता आर्जवाचे स्वरूप तुला सांगतो, ऐक. ॥353॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जें आपुलें सर्वस्व द्याल, मग इयेतें सोडवुनि न्याल


