भाग – 1
सकाळी आठ वाजता वंदनाला जाग आली, तिला आज शूटिंगला जायचं नव्हतं, नाहीतर गजर लावून उठायची तिला सवय. गेले पाच दिवस तिला सहाच्या शूटिंगसाठी हजर राहावं लागे… सेटवर सहा वाजता पोहोचायचं तर, तिला पाचची ट्रेन पकडावी लागे. तिचा सीन कधी कधी रात्री आठ वाजता यायचा, कधी यायचा पण नाही, पण तिच्यासारख्या नवीन ॲक्ट्रेसना हजर रहावंच लागे. दिलेले कपडे घालून दिवसभर तिथे बसायचे, जेवायचे. सोबतच्या कनिष्ठ कलाकारांबरोबर गप्पा झोडायच्या. कंटाळा आला की, एखादी सिगरेट ओढायची…
एवढे करून दिवसाला जेमतेम अडीच हजार रुपये हातात यायचे. रात्री उशीर झाला तर टॅक्सी करून यावे लागे, म्हणजे त्याच्यात सहाशे-सातशे रुपयांची फोडणी. रात्रीचे जेवण करायचा कंटाळा म्हणजे बाहेरच कुठल्यातरी गाडीवर खावे लागे. त्याचे दोन-अडीचशे रुपये!
वंदना विचार करत होती, शेवटी शिल्लक काय राहते. सेटवर मोठ्या कलाकारांचे लाड आणि आम्हा ज्युनिअर कलाकारांना लाथा. पण विचारतो कोण? आपण सोडलं तर एकापेक्षा एक कलाकार जागा घ्यायला टपून बसलेले आहेत… ‘सहन होत नाही आणि सांगता येत नाही’ अशी आपली परिस्थिती. करोना साथीनंतर कामे कमी झाली. आपल्याकडे एक नाटक होते ते बंद झाले. त्या नाटकाचे महिन्याला दहा प्रयोग झाले तर निदान महिन्याला पंधरा हजार रुपये मिळायचे.
आता फक्त राहिली ही एक मालिका. या मालिकेला फारसा टीआरपी नाही, म्हणजे ही मालिका पण कधी राम म्हणेल सांगता येत नाही. वरळीच्या घोस्ट सप्लायर्सकडून ही मालिका आपल्याला मिळाली होती. मुंबईत असे अनेक कलाकार सप्लाय करणारे एजंट आहेत. मी सहा एजंटकडे मेंबर झाले आहे, त्यांना दर महिन्याला प्रत्येकी दोन हजार रुपये द्यावे लागतात. आपल्यासारखे हजारो न्यू स्ट्रगलर त्यांचे मेंबर आहेत. ते सुचवतील तेव्हा आपल्याला काम मिळतं.
वंदनाने आळोखेपाळोखे दिले आणि ती बेडवरून बाहेर आली. समोरील टेबलवर काल रात्री प्यालेला बियरचा टिन तसाच पडला होता. तिने तो उचलला आणि वेस्ट बॉक्समध्ये टाकला. त्या एका रूममध्येच ती राहत होती… त्याच रूममध्ये ती गॅसवर चहा, कॉफी करत होती आणि एक छोटीशी बाथरूम तिला होती.
हेही वाचा – चॅलेंज.. अहंकार मोडून काढणारं!
वंदनाने गॅस पेटवून त्यावर पाणी गरम केले, त्यात कॉफी पूड टाकली, दूध नव्हतेच… त्यामुळे तिने तशीच कॉफी बनवली आणि एका कपात ओतून ती पिऊ लागली.
तिने मोबाइल उघडला आणि आपला ग्रुप वाचू लागली, त्या एरियात राहणाऱ्या नवीन धडपड करणाऱ्या नाटक, टीव्ही मालिकामधील कलाकारांचा ग्रुप होता – त्याचे नाव होते, ‘एस ए’ ग्रुप म्हणजेच Struggler Actors ग्रुप. या ग्रुपमधील नेहमीचे मेसेज, कुणाला कुठे काम मिळालं, कुणाचं काम बंद झाल, कुठल्या ॲक्टर्स सप्लायरकडे जास्त निर्माते आहेत, आमीर खानचे कुठे शूटिंग सुरू होणार आहें, चोप्रा कुठला सिनेमा घेऊन येत आहेत, त्यांना जुनिअर ॲक्टर्स किती लागतील वगैरे…
हें मेसेज वाचून वंदनाला कंटाळा आला, तिने फेसबुक ओपन केलं आणि ती पोस्ट पाहू लागली. एवढ्यात तिचे लक्ष एका फोटोकडे गेलं, बेडवर पडलेल्या एका तरुणीचा फोटो होता, मुलगी अस्ताव्यस्त पडली होती. वंदनाने निरखून पाहिले आणि ती मनात म्हणाली, “अरे, ही तर प्रणिता नांदे! सहा महिन्यांपूर्वी मराठी मालिकेच्या सेटवर दोन दिवस आपल्यासोबत होती. नंतर तिची कधी भेट झाली नाही, पण ती या फेसबुकमध्ये काय करते?” असे म्हणून वंदनाने तिने लिहिलेले वाचून तिला धक्का बसला.
प्रणिताने लिहिले होते – “आज माझा या जगातील शेवटचा दिवस, मी पुरती निराश झाले आहें, आईवडिलांशी भांडून मी मुंबईत आले… पण माझा लोकांनी गैरफायदा घेतला. कामे मिळत नाहीत, माझ्याकडे पैसे नाहीत…. अलविदा!”.
वंदनाने बारकाईने फोटो पाहिला, तिचा गाऊन मांड्यांपर्यंत वर आला होता, एक हात कॉट खाली लोंबत होता, वंदनाच्या काळजात धडधड सुरू झाली… ही पोरगी जिवंत आहे की नाही? असा तिला प्रश्न पडला. ती राहते कुठे, हे तिला माहीत नव्हते किंवा तिचा नंबरही नव्हता.
काही करून तिच्यापर्यंत पोहोचायला हवे, हे तिला कळत होते. ती आपल्या एस ए ग्रुपवर आहें की नाही, हेही तिला माहीत नव्हते. तिने ग्रुपचा ॲडमिन मनीषला कॉल लावला. मनीष गाडीत होता.
वंदना – मनीष, अरे प्रणिता नांदे नावाची मुलगी तुला माहीत आहें का? आपल्यासारखीच आहे… दोन-तीन वर्षांपूर्वी कुठूनतरी आलेली…
मनीष – तिचे काय?
वंदना – अरे, तिने फेसबुकवर पोस्ट टाकली आहे, आपला या जगातील शेवटचा दिवस म्हणून! तिचे विचित्र फोटो टाकलेत, ती जिवंत आहे का ते कळत नाही… आपण तिला शोधायला हवं, तू तिला ओखतोस काय?
मनीष – मी तिला ओळखत नाही, पण तिचे नाव ऐकल्यासारखे वाटते. आपल्या ग्रुपची मेंबर आहे का ते पाहावे लागेल.
वंदना – ग्रुपची मेंबर वगैरे ते लांबचे रे, ती मेंबर असो वा नसो, तिचा जीव वाचवायला हवा… याकरिता तिच्यापर्यंत ताबडतोब पोहोचायला हवे.
मनीष – मग ग्रुपवर तशी बातमी टाक, फेसबुकवरून तिचे फोटो घे आणि ते आपल्या ग्रुपवर घे. कुणाला तिचा फोन नंबर माहिती आहे का, ते विचार. तसेच, ती कुठे राहते हे माहिती आहे का विचार… मी आता वांद्र्याला चाललो आहे. पुढे काय होते ते मला कळव.
मनीषने फोन बंद केला, वंदनाने फेसबुकवरून प्रणिताचे फोटो घेतले आणि एस ए ग्रुपच्या व्हॉट्सॲप वर टाकले, तसेच तिचा मोबाइल नंबर आणि तिचा पत्ता कुणाला माहिती असल्यास कळवण्यास सांगितले.
थोड्याच वेळात ग्रुपवर धडाधड मेसेज येऊ लागले. बऱ्याच जणांनी तिच्याबरोबर काम केले होते. संगीता जाधवजवळ तिचा मोबाइल नंबर होता. तो तिने ग्रुपवर टाकला. तसेच तिने वंदनाला फोन लावला.
संगीता – अगं वंदना, आम्ही दोघी दोन महिन्यांपूर्वी एका वेब-सीरिजमध्ये होतो. दोन दिवसांचे काम होते, त्यावेळी तिच्याकडून मी हा नंबर घेतला होता. पण ती राहते कुठे, हे मला माहीत नाही. पण माझ्या अंदाजाने ती वाशीच्या आसपास राहात असावी. तिचा कोणीतरी बॉयफ्रेंड होता, त्याच्यासोबत ती रिलेशनमध्ये होती. पण त्यांचे आता फारसे जमत नव्हते. म्हणून तो आता आपल्या मूळ घरी गेला होता. म्हणून ही डिप्रेशनमध्ये गेल्यासारखे वाटत होते.
वंदना – पण ती राहते कुठे? तिला तातडीने शोधायला लागेल नाहीतर, ती जिवाचे काही बरे-वाईट करून घेईल.
संगीता – मी आणखी काही लोकांना संपर्क करून तिचा पत्ता मिळवण्याचा प्रयत्न करते आणि मग तुला कळविते.
संगीताने फोन ठेवला. थोड्यावेळाने मनीषचा फोन आला. त्याला स्टेशनवर प्रभात भेटला होता. प्रभातचे म्हणणे हल्ली तिचे पिणे फार वाढले होते, हल्ली ती कुणाच्याही गाडीत दिसायची. तिची मन:स्थिती ठीक नसल्याचे प्रभातला वाटत होते.
वंदनाने मग प्रणिताच्या फोनवर फोन करण्याचे प्रयत्न केले. पण पलीकडून कुणी फोन उचलत नव्हते.
हेही वाचा – एक स्त्री म्हणून माझं काय चुकलं?
थोड्यावेळाने मनीष वंदनाच्या रूमवर आला, तिचा पत्ता मिळत नसेल तर, तिच्या फोनवरून पोलीस तिचा पत्ता शोधू शकतात, असे त्याचे म्हणणे. मनीषने पोलीस स्टेशनचा फोन नंबर आणला होता. त्याने पोलीस स्टेशनला फोन नंबर देऊन या फोनची मालकीण फोन उचलत नसल्याचे त्यांना कळवले. तसेच, तिच्या जिवाचे काही बरे-वाईट होण्याची शक्यता पण त्याने पोलिसांना सांगितली.
पंधरा मिनिटांनी पोलीस स्टेशनवरून फोन आला. मोबाईल नंबरवरून त्यांनी प्रणिताचा पत्ता शोधून काढला होता. वाशीच्या सेक्टर 20मध्ये ती रहात होती, असे त्यांना कळले.
वंदनाने त्वरित ही बातमी एस ए ग्रुपवर टाकली आणि पोलीस स्टेशनकडे आपण आणि मनीष जात असल्याचेही ग्रुपवर टाकले. अर्ध्या तासात मनीष आणि वंदना पोलीस स्टेशनवर पोहोचले. तोपर्यंत एस ए ग्रुपमधील अनेक जण पोलीस स्टेशनकडे जमा झाले होते. ही सर्व मंडळी येताच पोलिसांची जीप तिच्या घरच्या दिशेने निघाली… त्यांच्यापाठोपाठ एस ए ग्रुपमधील मेंबर्स पण निघाले.
पोलिसांनी तिची चाळ शोधून काढली. घराचे दार आतून बंद केलेले होते. पोलिसांनी धक्के मारून दार उघडले. पोलिसांच्या मागोमाग एस ए ग्रुपमधील मेंबर्स पण आता घुसले…


