दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 07 जानेवारी 2026; वार : बुधवार
- भारतीय सौर : 17 पौष शके 1947; तिथि : पंचमी 30:33; नक्षत्र : मघा 11:55
- योग : आयुष्मान 18:32; करण : कौलव 18:36
- सूर्य : धनु; चंद्र : सिंह; सूर्योदय : 07:13; सूर्यास्त : 18:14
- पक्ष : कृष्ण; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. आरोग्याची काळजी घ्या आणि किरकोळ आजारांकडेही दुर्लक्ष करू नका. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे, म्हणून काळजीपूर्वक नियोजन करा. सभोवतालच्या लोकांबद्दल, विशेषतः स्पर्धकांबद्दल जागरूक रहा.
वृषभ – नियोजित कामे वेळेत पूर्ण होतील. तब्येत नरम-गरम राहू शकते. घरात शुभ प्रसंग येतील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. व्यवसायात काही आर्थिक अस्थिरता येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे व्यवसायाच्या परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात, परंतु तडजोडीने सर्व समस्या सोडवता येतात.
मिथुन – आजचा दिवस आनंद, शांती आणि सौभाग्याने भरलेला असेल. आरोग्य उत्तम राहील, दिवसभर उत्साही रहाल. नवीन व्यवसाय किंवा उपक्रम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा दिवस शुभ ठरू शकतो. कठोर परिश्रम आणि नियोजन यशस्वी होण्याची संधी आज मिळेल. जुने येणे वसूल होईल.
कर्क – आजचा दिवस खूप चांगला जाईल. जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होतील. व्यवसायात नफा होईल. आज एखाद्या खास व्यक्तीच्या संपर्कातून तुम्हाला काही मोठे काम मिळू शकते. कुटुंबात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. कुटुंबात काही चांगल्या बातम्या मिळतील.
सिंह – आज तुम्ही एखाद्या विषयावरून वादात अडकू शकता. तुमचे महत्त्वाचे काम रखडू शकते किंवा त्यात व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. गाडी चालवताना काळजी घेणे महत्वाचे आहे. वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेवरून कुटुंबात मतभेद निर्माण होऊ शकतात. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता देखील आहे.
कन्या – मानसिक ताण येऊ शकतो. या चिंतांमुळे मित्र किंवा नातेवाईकांशी वाद होऊ शकतात. आज व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. घरी प्रियजनांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.
तुळ – तुमचे वर्तन तुमच्या विरोधकांबद्दल थोडे उदार किंवा नम्र वाटू शकते, ज्यामुळे त्यांच्याशी चांगले संबंध निर्माण करण्याची संधी मिळेल. लांब प्रवासाला जाण्याचे बेत किंवा एखाद्या विशिष्ट कारणासाठी सहलीची योजना आखू शकता. काही आरोग्यविषयक चिंता कायम राहतील. मात्र या वेळी तुम्हाला तुमच्या आरोग्याची चांगली काळजी घेण्याची गरज भासेल.
वृश्चिक – जवळच्या लोकांकडून अचानक विरोध होऊ शकतो. त्याचा तुमच्या आरोग्यावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांकडून विश्वासघात होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला मोठा मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. कोणतेही नवीन उपक्रम सुरू करणे, अनोळखी लोकांना पैसे उधार देणे टाळा, कारण यामुळे नुकसान होण्याचा धोका वाढतो.
हेही वाचा – Bookshelf : ‘नाच ग घुमा’… लेखिकेला रिंगणाच्या बाहेर पडायचेच नाही!
धनु – आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक ठरू शकतो. तुम्हाला असे वाटू शकते की तुम्ही एखाद्या कटाचे बळी बनत आहात. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे, म्हणून सावधगिरी बाळगा. जर तुम्ही नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस त्यासाठी योग्य नाही. आरोग्याशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात.
मकर – आजचा दिवस सामान्य राहील. तुमचे आरोग्यही चांगले असेल. एखाद्या प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायात थोडाफार फायदा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.
कुंभ – आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी आणि सकारात्मक वातावरण घेऊन येईल. तुम्ही बनवलेल्या सगळ्या योजना यशस्वी होतील. आज एखाद्या खास व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे व्यवसायात नवीन संधी येऊ शकतात, कुटुंबात एखादी शुभ घटना घडण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सर्व सदस्य तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतील,
मीन – आज काही आव्हानांना तोंड द्यावे लागेल. तब्बेत थोडी नरमगरम राहील. जवळच्या नातेवाईकाकडून दुःखद बातमी मिळण्याची शक्यता आहे. नवीन एखाद्या कामात अडथळा येऊ शकतो. कौटुंबिक वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोलताना संयम ठेवा.
दिनविशेष
मराठी लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर
टीम अवांतर
मराठी लोकसाहित्याच्या संकलक-संपादक आणि अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्म 7 जानेवारी 1920 रोजी बागणी (ता. वाळवा, जि. सांगली) या गावी झाला. बीएच्या परीक्षेत त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. पुणे विद्यापीठातूनच त्यांनी एमए केले. पुढे पीएच.डी.ही पदवी देखील त्यांनी प्राप्त केली. पुढे याच पुणे विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्स-डी.लिट. ही सर्वोच्च बहुमानाची पदवी दिली आणि जीवनगौरव पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठानेही त्यांना डी.लिट. दिली, तर राहुरी कृषी विद्यापीठाने डी.एस.सी. पदवी त्यांना प्रदान केली.
शिक्षणक्षेत्रात अशा सर्वोच्च पदव्या प्राप्त करीत असतानाच त्या राजकारणातही उतरल्या होत्या. याशिवाय 1961 ते 1993 एवढा दीर्घकाळ त्या महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या अध्यक्षा होत्या. समितीच्या स्थापनेपासून त्यांना मिळालेला अध्यक्षपदाचा 32 वर्षांचा काळ त्यांनी लोकसाहित्याचे संकलन-संपादन करण्यासाठी घालविला. डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. प्रभाकर मांडे, वामनराव चोरघडे असे लोकपरंपरेचे जाणते अभ्यासक या कालावधीत काहीकाळ लोकसाहित्य समितीचे साहाय्यक-सल्लागार झाले होते.
हेही वाचा – आण्णा… जगण्याच्या इच्छेला फुटली पुनश्च पालवी!
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ, दुर्गाताई देशमुख यांनी स्थापन केलेली अखिल भारतीय समाजकल्याण समिती, पुणे विद्यापीठ अधिसभा, नामदेवगाथा समिती, पुणे आकाशवाणीची सल्लागार समिती अशा वेगवेगळ्या समित्यांवर त्यांनी सदस्य म्हणून काम केले. पुणे मराठी ग्रंथालयाशीही त्यांचा निकटचा संबंध होता. मराठी साहित्य परिषदेच्या त्या काहीकाळ अध्यक्षही होत्या.
त्यांची लोकसाहित्याची संपादने ग्रंथरूपाने प्रसिद्ध आहेतच, पण समाजशिक्षणमालेची 270 संपादनेही त्यांच्या संपादनकार्यात समाविष्ट आहेत. समाजशिक्षणमाला ही त्यांचे वडील कृ. भा. बाबर यांनी सुरू केलेल्या पुस्तकमालाद्वारे शिक्षण, समाजकारण, लोकसाहित्य इत्यादी क्षेत्रांतली 280 लहानलहान पुस्तके उपलब्ध केली. प्रारंभापासूनच वडिलांना त्यांच्या लेखनकामात साहाय्य करणाऱ्या सरोजिनीबाईंनी वडिलांच्या निधनानंतर 270 पुस्तकांची मालेत भर घातली. याशिवाय मी पाहिलेले यशवंतराव आणि वसंतदादा पाटील गौरवग्रंथ या दोन ग्रंथांची संपादने सरोजिनी बाईंनी केली. कुमारवयीन मुलांसाठीही काही सहसंपादने त्यांनी केली.
एकूण 7 कादंबऱ्या, 11 कथासंग्रह, 26 ललितलेखसंग्रह, 2 कवितासंग्रह आणि 4 नाट्यवाङ्मयाची पुस्तके आणि आत्मचरित्र अशी 51 स्वतंत्र पुस्तके त्यांच्या 307 संपादित पुस्तकांच्या जोडीला ठेवली, तर त्यांच्या ग्रंथांची एकूण संख्या 358 आहे. याशिवाय ‘रानजाई’ या नावाने त्यांनी शांता शेळके यांच्यासह केलेली दूरदर्शन मालिकाही लोकसाहित्याकडे जनसामान्यांचे लक्ष वेधण्यात महत्त्वाची ठरली.
विविध पुरस्कार आणि सन्मान त्यांना प्राप्त झाले. त्यापैकी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची गौरववृत्ती, भद्रकाली ताराराणी पुरस्कार, गुरूवर्य बाबुराव जगताप पुरस्कार, महर्षि विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, पठ्ठे बापुराव पुरस्कार यांच्या जोडीला मराठा सेवा संघ विश्व गौरव पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. 20 एप्रिल 2008 रोजी प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.


