दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 24 जुलै 2026; वार : शुक्रवार
- भारतीय सौर : 02 श्रावण शके 1948; तिथि : दशमी 09:12; नक्षत्र : अनुराधा 28:36;
- योग : शुक्ल 20:10; करण : वणिज 22:22;
- सूर्य : कर्क; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:11; सूर्यास्त : 19:18;
- पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
अभिनेते मनोज कुमार
टीम अवांतर
हिंदी चित्रपटसृष्टीतले अभिनेते, पटकथालेखक, दिग्दर्शक आणि निर्माते मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937 रोजी आताच्या पाकिस्तानातील अबोटाबाद येथे झाला. त्यांचे मूळ नाव होते हरिकृष्ण गिरी गोस्वामी. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब जंदियाला शेरखान येथून दिल्लीला स्थलांतरित झाले. मनोज कुमार यांनी हिंदू कॉलेजमधून कला शाखेची पदवी घेतली. तरुणपणी ते दिलीप कुमार, अशोक कुमार आणि कामिनी कौशल यांचे चाहते होते. दिलीप कुमार यांच्या ‘शबनम’ या चित्रपटातील नायकाच्या नावावरून त्यांनी स्वतःचे नाव मनोज कुमार असे ठेवले. मनोज कुमार यांनी कॉलेजच्या काळात अनेक नाटकांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनयाच्या वेडापायी ते मुंबईत आले. मुंबईत आल्यावर त्यांनी सुरुवातीला अनेक हिंदी चित्रपटांसाठी लेखनाचे काम केले. 1957 मध्ये ‘फॅशन’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर 1958 मध्ये सहारा, 1959 मध्ये चांद, 1960 मध्ये हनीमून या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले होते.
मात्र 1960मध्ये आलेल्या ‘कांच की गुडिया’ या चित्रपटात पहिल्यांदाच त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून भूमिका साकारली. यानंतर ते अनेक चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिकांमधून दिसले. 1962 मध्ये ते ‘हरियाली और रास्ता’मध्ये झळकले. या चित्रपटात त्यांच्यासोबत माला सिन्हा मुख्य भूमिकेत होती. दोघांची ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. 1964 मध्ये त्यांचा आणखी एक सुपरहिट चित्रपट ‘वो कौन थी’ प्रदर्शित झाला आणि मनोज कुमार चित्रपटसृष्टीत स्थिरावले.
हेही वाचा – थकलेल्या जीवाला नवा श्वास देणारे शब्द…
1965 मध्ये प्रदर्शित झालेला ‘शहीद’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक गणला जातो. या देशभक्तीपर चित्रपटात त्यांनी भगत सिंह यांची भूमिका साकारली होती. यानंतर आलेल्या ‘उपकार’ या चित्रपटात ते एका शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसले होते. 1970 मध्ये त्यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केलेला ‘पूरब और पश्चिम’ हा चित्रपटदेखील सुपरहिट ठरला. या चित्रपटातलं ‘भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ’ हे गाणं प्रचंड गाजलं. 1974च्या ‘रोटी, कपडा और मकान’ या चित्रपटानंतर मनोज कुमार त्यांच्या कारकिर्दीत यशाच्या शिखरावर पोहोचले. यानंतर त्यांच्याकडे चित्रपटाच्या रांगा लागू लागल्या. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता आणि सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले.
त्यांनी साकारलेल्या बहुतेक चित्रपटांमधील त्यांच्या व्यक्तिरेखेचे नाव भारत असायचे. त्यामुळे लोक त्यांना ‘भारत कुमार’ म्हणू लागले. एवढेच नाही, तर माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री हे देखील मनोज कुमार यांच्या चाहत्यांपैकी एक होते. 1965 च्या भारत-पाक युद्धानंतर शास्त्री यांनी मनोज यांना ‘जय जवान, जय किसान’वर चित्रपट बनवण्याची कल्पना दिली आणि त्यानंतर मनोज कुमार यांनी ‘उपकार’ चित्रपट बनवला.
चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत त्यांनी 55 चित्रपटांमध्ये काम केले. अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या मनोज कुमार यांनी अनेक मानाच्या पुरस्कारांवर आपले नाव कोरले. मनोज कुमार यांना 1972 मध्ये ‘बेईमान’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार तर 1975 मध्ये ‘रोटी कपडा और मकान’साठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता. 1992 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. मनोज कुमार यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबदल दादासाहेब फाळके पुरस्कारानेही गौरवण्यात आले. 4 एप्रिल 2025 रोजी त्यांचे निधन झाले.
आजचे राशिभविष्य
मेष – करिअरला नवीन दिशा देणारा असा आजचा दिवस असू शकतो. प्रगतीचे मार्ग तुम्हाला खुणावतील. परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत असाल, तर एक महत्त्वपूर्ण संधी तुम्हाला मिळेल. कामाच्या ठिकाणी अनावश्यक राजकीय डावपेचांपासून दूर राहा. व्यवसायात आर्थिक लाभाची शक्यता आहे.
वृषभ – नोकरदार जातकांना कामाच्या ठिकाणी आज मेहनतीचे फळ मिळेल. पदोन्नतीची बातमी आनंदाचे वातावरण निर्माण करेल. एखादी जुनी इच्छा पूर्ण झाल्याने चेहऱ्यावर हास्य येईल. कौटुंबिक कार्यक्रम आणि स्वादिष्ट जेवण यामुळे आजचा दिवस आणखी खास बनेल. आज विद्यार्थी अभ्यास आणि ज्ञानात मग्न राहील.
मिथुन – तुमच्यातील नेतृत्वगुण आज बघायला मिळतील. तुम्ही प्रत्येक आव्हानाचा स्वीकार कराल. काही अडथळे नक्कीच मोठे असतील, पण तुम्ही हार मानणाऱ्यांपैकी नाही. नवीन व्यवसाय सुरू करण्याची कल्पना मनात येऊ शकते. कर्ज फेडण्याच्या दिशेने पावले उचलली जातील. योग आणि व्यायामामुळे नवी ऊर्जा संचारेल.
कर्क – आजचा दिवस खर्चाचा असू शकतो. ज्यामुळे मनावरचा ताण वाढू शकतो. म्हणून विचारपूर्वक वागा. सध्या नोकरी बदलण्याचा विचार करू नका. प्रामाणिक कामामुळे तुम्हाला आंतरिक समाधान मिळेल. जोडीदारासोबत विचार विनिमय करून संततीच्या भविष्यासाठी नियोजन कराल.
सिंह – आज नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. सामाजिक वातावरणात काम केल्याने यशाचे नवीन मार्ग खुले होतील. व्यवसायात बदल करणे किंवा जोखीम घेणे टाळा. सध्याची परिस्थिती व्यवसायासाठी सर्वोत्तम आहे. जोडीदारासोबत घालवलेला वेळ अविस्मरणीय असेल.
कन्या – तुमच्या कामामुळे यशाची नवी शिखरे गाठाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या पदोन्नतीची चर्चा पुढे जाऊ शकते. कोणाच्यातरी प्रभावाखाली व्यवसाय विषयक निर्णय घेणे टाळा. राजकारणात असलेल्यांना एखादी महत्त्वपूर्ण संधी मिळू शकते. आपल्या आरोग्याची, विशेषतः साखर आणि रक्तदाबाशी संबंधित आजाराची काळजी घ्या.
तुळ – घाईने घेतलेला निर्णय आज अडचणीत आणू शकतो, म्हणून प्रत्येक पावलावर सावधगिरी बाळगा. आर्थिक बाबतीत कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. व्यावसायिक भागीदारी टाळा, कारण त्यात फसवणुकीचा धोका आहे. प्रवासाच्या योजनांमुळे तुमचे मन उत्साहित होऊ शकते.
वृश्चिक – संयमाने आणि शांतपणे काम करण्याची आज गरज आहे. शारीरिक थकवा हळूहळू नाहीसा होईल, मनही तणावमुक्त होईल. जोडीदारासोबतचे तणाव प्रेमाने सोडवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. एखादी छोटीशी सकारात्मक बातमी तुमचा दिवस उजळवू शकते. व्यवसायासाठी कर्ज घेण्याची योजना आखत असाल तर त्यावर अधिक काम करण्याची गरज आहे.
हेही वाचा – कान्होपात्रेचे समर्पण
धनु – आज कामाचा मोठा ताण तुमच्यावर असेल. ही कामे हातावेगळी करण्यासाठी ओव्हर टाईम करण्याची गरज भासेल. वैवाहिक जीवनात किरकोळ वाद निर्माण होऊ शकतात. त्यावर वेळीच काम करण्याची गरज असेल. व्यवसायात निर्माण होणाऱ्या मोठ्या धोक्यांपासून दूर राहा. आज तुमच्या वडिलांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. विद्यार्थी पार्ट टाईम जॉबसाठी प्रयत्न करतील.
मकर – आनंद आणि आव्हाने यांचा मिलाफ आजच्या दिवशी बघायला मिळेल. छुपे शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे सावध राहा. अनावश्यक खर्च टाळणे महत्त्वाचे आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना लक्षणीय नफा मिळू शकतो. घरी पाहुणे येणार असल्याची बातमी मिळेल ज्यामुळे आनंदाचे वातावरण असेल.
कुंभ – व्यवसायातील काही अडथळे आज त्रास देऊ शकतात, पण तुमची विवेकबुद्धी तुम्हाला योग्य दिशेने जाण्यासाठी मार्गदर्शन करेल. तुमचे निर्णय इतरांना आश्चर्यचकित करू शकतात. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या प्रकृतीमुळे तुम्हाला चिंता वाटू शकते. अनोळखी लोकांच्या प्रभावाखाली येणे टाळा.
मीन – तुमच्या प्रत्येक प्रयत्नात आज यशाची चिन्हे दिसत आहेत. महत्त्वाच्या गोष्टी सर्वांना सांगणे टाळा. खास लोकांना भेटल्याने नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. गाडी चालवताना सावधगिरी बाळगा. आज, तुम्हाला काहीतरी नवीन आणि सर्जनशील करून पाहण्याची इच्छा होऊ शकते. व्यवसायात नवीन प्रकल्प हाती घेतला जाईल.


