आपल्या एकुलत्या एक हुशार मुलाला शिक्षणासाठी विलायतेत पाठवण्यासाठी वाडवडिलांनी सांभाळून ठेवलेली शेती भैरूने विकायला काढली, तेव्हा गावकऱ्यांनी त्याला वेड्यात काढले.
“अरे, तो मुलगा शिकून तिथेच नोकरी पकडेल, एखाद्या गोऱ्या मड्डमेशी लग्न करून तिथेच राहील आणि म्हातारपणी तू काय भीक मागून पोट भरशील का?”
पण भैरूला आपल्या मुलावर भरवसा होता. शिक्षणाचे महत्त्व माहीत होते. खुद्द भैरू बऱ्यापैकी शिकला होता. त्याला लिहिता-वाचता यायचे, तो रोजचा पेपर वाचायचा, कीर्तन – प्रवचनाला जायचा, गावातल्या मास्तरांशी बोलायचा… त्याचे शिक्षण सुटले ते घरच्या परिस्थितीमुळे आणि पालकांच्या, समाजाच्या त्यावेळी शिक्षणाकडे बघण्याच्या उदासीनतेमुळे…
त्याने शेती विकली. मुलानेही त्याच्या विश्वासाचे चीज केले. तो यशस्वी होऊन भारतात परतला. त्याला लठ्ठ पगाराची नोकरी लागली. काही वर्षांतच त्याने त्याच्या नोकरीच्या शहरापासून जवळच भैरूकडे पूर्वी होती, त्याच्या दुप्पट-तिप्पट क्षेत्रफळ असलेली शेती घेतली. तिथे सुंदर फार्महाऊस बांधले. भैरू आणि पारू आता तिथे राहतात.
हेही वाचा – बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…
रोज सकाळी भैरूच्या मुलाचा म्हणजे साहेबांचा सहाय्यक त्यांना भेटायला येतो. त्यांच्या तब्येतीची चौकशी करतो. त्यांना काय हवे, काय नको ते विचारतो आणि जातो. मग फार्महाऊसला काम करणारे लोक येतात. भैरूबाबा आणि पारूआजीला रामराम केल्याशिवाय कामाला हात लावत नाही. नंतर शेतमजूर येतात, शेतीची देखरेख करणारा माणूस येतो. तो शेतीची जी कामे झाली आणि जी आज करायची आहेत ती सगळी भैरूबाबाला सांगतो, त्यांचा सल्ला घेतो. मग म्हातारा – म्हातारीसाठी ‘पेशल’ बाई येते. म्हातारा, म्हातारी सांगतील तो स्वयंपाक करते… त्यांचे दोन-चार कपडे धुते, भांडी घासते आणि जाते.
एवढे सगळे असताना पारू आजी अधूनमधून कटकट करते – “मुलाचा भलामोठा फ्लॅट (3BHK) शहरात आहे. त्यातली छोटीशी अडगळीची खोली जरी आम्हाला दिली असती, तरी बरे झाले असते. मुलाशी, सुनेशी रोज बोलता आले असते… नातवाला अंगाखांद्यावर खेळवता आले असते… त्याला मोठे होताना पाहता आले असते…”
भैरूबाबा आजीला म्हणतो, “सुख बोचतं काय तुला? राजमहालासारखे घर आहे, दासदासी दिमतीला आहे, खाण्यापिण्याची ददात नाही. मनात समाधान ठेव.”
पारूआजी यावर म्हणायची “मी अनाडू आहे. मला काय तुमचे अध्यात्म बिध्यात्म समजत नाही. मला संसारात गोडी वाटते.”
मग तो दिवस उजाडतो. कधी तो महिन्यातून येतो, कधी दोन महिन्यातून. एक महागडी चमचमणारी चारचाकी सकाळी फार्महाऊसला येते. त्यातून साहेब उतरतात त्यांच्यापाठोपाठ त्यांची पत्नी, आठ-दहा वर्षांचा मुलगा.
हेही वाचा – गणपत अन् 2000 रुपयांची उधारी…
साहेब चहा घेतात आणि लगेच शेतात जातात. एक चक्कर टाकतात. तिथले सगळे बघितले की, फार्महाउस बघतात. कुठे काय दुरुस्ती करायची असेल ते बघतात. मग बसतात. म्हातारी समजल्यासारखी पटकन भाकरी टाकते. गरमागरम भाकरी साहेब लसणाच्या चटणीसोबत किंवा मिरचीच्या ठेच्यासोबत खातात. मग मस्त माठातले तांब्याभर पाणी एका दमात संपवतात. मोठा ढेकर देतात. तो ढेकर ऐकताच म्हातारीचा जीव सुपासारखा होतो. म्हातारीची सून मात्र काही खात नाही. म्हातारीच्या नातवालाही काही खाऊ देत नाही. मग निरोपाची वेळ येते. साहेब, बायको पोरासह भैरूबाबाच्या पाया पडतो. भैरू त्यांच्या डोक्यावरून हात फिरवून आशीर्वाद देतो. म्हातारी मात्र नातवाला घट्ट धरते त्याचे मुके घेते.
साहेब पत्नी मुलासह बाहेर येतात. भैरूबाबा, पारुआजी त्यांच्या मागे येतात. गाडीत बसल्यावर हात हलवतात. गाडी नजरेआड होईपर्यंत बघत राहतात. गाडी दृष्टीच्या पलीकडे गेली की, भैरू गलितगात्र झाल्यासारखा हळूहळू परत येतो. पायरीवर बसतो आणि आपल्या धोतऱ्याच्या सोग्याने डोळे पुसत राहतो. पारूआजीला काय बोलावे समजत नाही. ती काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडते, पण पुन्हा मिटते. तिला नवऱ्याचे शब्द आठवतात…
“सुख बोचतं काय तुला? राजमहालासारखे घर आहे, दासदासी दिमतीला आहेत…”


