Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    गणपत अन् 2000 रुपयांची उधारी…

    May 6, 2026

    Bookshelf : माझा प्रवास… एखादा सिंह डरकाळी फोडतो, तेव्हा-

    May 6, 2026

    Dnyaneshwari : तूं आदिमध्यांतरहितु, स्वसामर्थ्यें तूं अनंतु

    May 6, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, May 6
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » गणपत अन् 2000 रुपयांची उधारी…
    ललित

    गणपत अन् 2000 रुपयांची उधारी…

    डॉ. विवेक वैद्यBy डॉ. विवेक वैद्यMay 6, 2026No Comments8 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मैत्रीची कहाणी, उधारीचे 2000 रुपये, गणपतची दिलखुलास मैत्री, गणपतच्या मनाची श्रीमंती, गणपतचा पाहुणाचार, मनमोकळा गणपत
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    गणपत माझा जवळचा मित्र नव्हता. तो आणि मी शाळेत सोबत शिकलो होतो एवढंच. त्यामुळे तोंडओळख होती. पुढे बरेच वर्षांनी त्याचा माझा पुन्हा संबंध आला. एका हॉस्पिटलला त्याची पत्नी ॲडमिट होती आणि त्याचवेळेस मी काही कामानिमित्त गेलो, तिथे तो भेटला. कर्तव्य म्हणून मी ॲडमिट असलेल्या त्याच्या पत्नीची रूममध्ये जाऊन चौकशी केली. तिथेच कळले की, तो जवळच 10 एक किलोमीटरवर राहतो आणि शेती करतो. याव्यतिरिक्त फारसे काही कळाले नाही. मात्र, त्यानंतर गणपत अधूनमधून नियमित भेटू लागला.

    शेतीची काही अवजारे, कधी खत, बी-बियाणे यांच्या खरेदीसाठी यायचा, तेव्हा आवर्जून भेटायचा. खूप आग्रह केला तर, अर्धा कप चहा घ्यायचा. नेहमी जुन्या मोटरसायकलवरून यायचा. त्यालाच कधी पोतेबिते बांधलेले असायचे. पायजमा आणि साधा शर्ट असा पेहराव. बोलणे मात्र एकदम मोकळे. मात्र, शेती किती, उत्पन्न किती हे बोलायचं नाही. मीही कधी विचारले नाही.

    एकदा मात्र तो घाईघाईत आला. “विवेक, थोडे काम होते. 2000 रुपये पाहिजे होते. बँकेत भरायला आणले हफ्त्याचे पण नेमके कमी पडले.” त्याच्याकडे बँकेचे पासबुक, स्लिप सगळे होते…

    गणपतची आर्थिक परिस्थिती मला माहीत नव्हती. बँकेचे कर्ज होतेच. जुनी मोटरसायकल आणि साधे कपडे, त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती यथातथाच असावी. या अगोदर त्याने कधी पैसे मागितले नव्हते. मी त्याची याआगोदर कोणतीही मदत घेतली नव्हती. उलट त्याला दरवेळी माझ्याच पैशाने अर्धा कप का होईना चहा पाजत होतो… थोडावेळ मी विचारात पडलो, पैसे द्यावे की नाही? काहीतरी कारण सांगून ‘नाही’ सांगू शकलो असतो. पण विचार केला 2000 काही खूप मोठी रक्कम नाही, देऊन बघू! माणूस इतका लबाड वाटत नाही. हातात कागदही आहेत, देऊ.. फारतर काय होईल? 2000 बुडतील…

    मी लगेच निर्णय घेतला अन् त्याला म्हटले “देतो”. खिशातून पैसे काढले, त्याच्या हातात दिले. त्याने घाईघाईत ते खिशात टाकले. “येतो विवेक. दोनचार दिवसांत देतो तुझे पैसे…”
    गणपत निघून गेला.

    दोनचार दिवस तो आला नाही, मला काही वाटले नाही. पण नंतर दहा-पंधरा दिवस झाले तो आला नाही आणि माझ्या मनात संशयची पाल चुकचुकली. तीन आठवडे गेल्यावर तर माझी खात्रीच पटली. गणपत मला फसवून गेला. तो राहतो ते खेडे मला माहीत होते. पण कोण जाणार? आणि तिथे त्याच्याच घरी, त्याच्याच गावात तो ऐकून घेईल? आणि आपल्याकडे काय प्रूफ आहे पैसे दिल्याचा? पैसे जाण्याच्या दुःखापेक्षा गणपतने फसवल्याचे दुःख मला जास्त झाले.

    हेही वाचा – सुख सुख म्हणजे काय असतं?

    अजूनही काही दिवस गेले आणि एक दिवस गणपत पुन्हा भेटायला आला. नेहमीप्रमाणे गप्पा मारल्या… चहा घेतला… आता हा पैसे देईल, या आशेवर मी होतो, पण तो काही बोलला नाही. निघताना मात्र त्याला पैशांचा विषय आठवला…
    “सॉरी, विवेक यार पैसे विसरलोच बघ मी. पुढच्या वेळी नक्की.”

    तो गेला. निदान तो भेटला यातच मी समाधान मानले. पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली.

    त्यानंतर गणपत पुन्हा दोनदा येऊन गेला. पण पुन्हा तो पैसे विसरला. एकदा त्याने पैसे काढले तर, ते बाराशेच भरले! ‘देऊ तर पूर्णच देऊ, असे अर्धवट कशाला?’ असे तो स्वतःच म्हणाला. मी तर बाराशेही घ्यायला तयार होतो. आता हे असे काहीतरी त्रांगडे होऊन बसले की, पैसे बुडालेही म्हणता येत नव्हते आणि मिळतही नव्हते. त्यात माझा स्वभाव असा की, त्याला खडसावून विचारता येत नव्हते.

    काही दिवसांनी तो पुन्हा आला, यावेळेस मात्र मी हळूच पैशांचा विषय काढला. बरेच दिवस झाले हेही सांगितले…

    “अरे हो यार विवेक, खरंच बरेच दिवस झाले. सालं… माझ्याही लक्षात राहात नाही. एक काम करतो का? रविवारी फ्री असतो ना? ये माझ्या घरी. पैसेही देऊन टाकतो. माझे घरही बघून घे… गरीबाघरचं चहापाणी घे.”

    मी हो म्हणालो… या किंवा पुढच्या रविवारी.

    “घराचा पत्ता?”

    “छोटेसे गाव आहे. माझे नाव सांगितले की, कुणीही पत्ता सांगेल.”

    “तरीही…”

    “थांब… माझा मोबाइल नंबर आहे?”

    “नाही. कधी कामच पडलं नाही!”

    “लिहून घे. मला कॉल कर तिथे पोहोचला की… थांब तुझा नंबर मीही सेव्ह करून घेतो.”

    ज्या रविवारी जायचे त्याच्या आदल्या दिवशी गणपतचा फोन, “उद्या येतोय न विवेक?”

    “हो.”

    “मी काय म्हणतो… वहिनींनाही घेऊन ये.”

    “उगाच तिला कशाला?”

    “अरे, त्यानिमित्ताने माझ्या बायकोशी ओळख होईल. पेट्रोल तर तेवढंच लागणार ना?”

    “……….”

    “नक्की आण. उगाच विचार करू नको. ठेवतो फोन.”

    खरेतर जायचे.. चहा घ्यायचा आणि पैसे घेऊन यायचे… एवढेसे काम. त्यात हिला घेऊन जा! त्याचे घर कसे ते धड माहीत नाही. मी पुन्हा विचारात पडलो. शेवटी पत्नीलाच विचारले. ती आनंदाने तयार झाली.

    “मी तयार आहे. तेवढाच चेंज होईल. घर बघूया, त्या ताईशी गप्पा मारते. रविवार सकाळ… थोडी वेगळी.”

    मी सकाळी नऊच्या आसपास निघालो. रस्ता बरा होता. वीस-पंचवीस मिनिटांत पोहोचलो. गणपत वेशीवरच मला घ्यायला उभा होता. मला मागे मागे येण्याचा इशारा करत, तो पुढे निघाला. छोट्या गल्लीबोळातून तो मला घेऊन गेला. तीन-चार मिनिटांत त्याचे घर आले. जुनाट होते. जुने लाकडी दरवाजे. बसकी बैठकीची खोली. गाद्या आणि लोड ठेवलेले बसण्यासाठी. शेतकऱ्याचे घर म्ह्टले की पसारा असतोच. काही शेतीची अवजारे कोपऱ्यात, दोन-तीन धान्याची पोते बाजूला ठेवलेली.

    बाहेरच्या ओट्यावर पाल टाकून थोडा कापूस ठेवलेला. तेवढ्यात वहिनी चहा घेऊन आल्या. भरपूर दूध आणि भरपूर साखर असलेला चहा मी कित्येक दिवसांत प्यायलो नव्हतो. नेहमी आपले कॅलरी काँशस राहायचे. आज मात्र तो चहा पिऊन फ्रेश वाटले. वहिनीही थोड्या वेळ बोलल्या. मग आतमध्ये गेल्या.

    “चल, तुला घर दाखवतो.”

    घर जुनाट होते पण प्रशस्त होते. मागे मोठे न्हाणीघर, स्वयंपाकघर… मग अशाच दोन-तीन खोल्या, पुन्हा वरच्या मजल्यावरही खोल्या… काहीशा अस्ताव्यस्त.. पण एवढे मोठे घर बघून छाती दडपून जावी!

    “एवढे मोठे घर?” मी म्हणालो.

    “ही सगळी वडिलांची मेहरबानी. मी काय केले? जे होते तेही टिकवता आले नाही.”

    आम्ही परत आलो तर मस्तपैकी पोह्यांचा वास येत होता. दाणे टाकून पोहे… वरतून खोबऱ्याचा किस…. भूक चाळवली गेली. पोहे तिखट होते.. ते बहुदा हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकल्याने! नाका-डोळ्यांतून पाणी आले, पण चव म्हणजे चव… मी खात असतानाच गणपत 500 च्या चार नोटा घेऊन आला. त्या एका पांढऱ्या पाकिटात ठेवत तो म्हणाला, “हे तुझे पैसे रे बाबा विवेक. नंतर परत विसरेन मी!”
    मी खाता खाताच त्याला ते बाजूच्या टेबलवर ठेवायला सांगितले. त्यानेही ते ठेवले आणि त्यावर वजन ठेवले.

    नाश्ता संपताच गणपत म्हणाला, “चल, आपण शेतावर चक्कर मारून येऊ.”

    “अरे, पण मला परत जायचे आहे.”

    “जाशील रे, आता तुम्हा दोघांना आमच्यकडून जेवण. तेवढेच पुण्य मिळेल.”

    “अरे पण…!”

    “काही बोलू नको. तू आता आमच्या ताब्यात आहेस. वहिनी आणि ही गप्पा मारतील तोपर्यंत येऊ आपण.”

    मी पत्नीकडे पाहिले. बहुदा वहिनीचे हिचे गुळपीठ जमले असावे… “जाऊन या तुम्ही. भाऊजी एवढे म्हणतात तर, जाऊ दुपारी जेवण करून…”

    गणपतचे शेत तसे जवळच होते. पाच मिनिटांत पोहचलो बाइकवरून… बांधावर गाडी लावून आम्ही आत उतरलो आणि डोळेच फिरले. दूरपर्यंत हिरवेगार पिके वाऱ्याने डोलत होती. बांधावर मोठी झाडे… थोडे पुढे, विहीर दिसत होती. पंपातून पाणी धो धो वाहात होते…

    “बापरे, किती एकर?”

    “जास्त नाही, पंचवीस एकर आहे. पण भावाचाही हिस्सा आहे.”

    “पंचवीस एकर? आणि भाऊ किती?

    “एक भाऊ…”

    मला तर तोंडातून शब्दच फुटेना. गणपतने सालदाराला बोलावले. आम्ही तिघेही निघालो. गणपत आणि सालदार बोलत होते. कुठे पाणी दिले, कुठं बाकी आहे… खत टाकले का… बऱ्याच गोष्टी… मी चालत राहिलो.

    एकदम गणपत थांबला, “अरे, तू चालशील ना? नाहीतर इथेच थांब, आम्ही येतो चक्कर टाकून.”

    मी नकारार्थी मान हलवली आणि त्यांच्याबरोबर चालू लागलो. काट्याकुट्यातून… चिखलातून… दोघेही भराभर चालत होते कितीतरी वेळ, ऊन डोक्यावर आले… पाय दुखायला लागले, पण शरीर उत्साहाने भरून गेले होते. अखेर शेताची चक्कर आणि पाहणी संपली. आम्ही विहिरीकडे परत आलो. तिथेच बाजूला एक छोटीशी खोली बांधली होती. दोन खुर्च्या… सतरंजी अंथरलेली एक खाट. आम्ही बसलो. सालदाराने पाणी आणून दिले…

    पाणी पिऊन मी थोडा रिलॅक्स झालो. गणपत म्हणाला, “ड्रिंक घेतो ना?”
    मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले.

    “क्वचित घेतो रे! पण का विचारतोय?”

    “तुझ्यासाठी ब्लॅक डॉग (Black Dog) मागवलीय.”

    मी पुन्हा आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले… “इतकी महाग! वेडा झाला का?”

    “घे रे… आणली आहे तर… मीही कुठे रोज घेतो?”

    “नको रे, आता जेवण करायचे सगळ्यांसमोर. वासबीस येईल.”

    “बरं… अगदी थोडी घे. माझा मान म्हणून…”

    ….

    घरी आलो तर मस्त भाकरी, वांग्याची भाजी, ठेचा आणि जिलेबी असा मेन्यू. परत जेवणावर ताव मारला. भूकवर्धकने (Appetiser) भूक वाढलीच होती.

    डोळे जडावले, तसा गणपत म्हणाला… “झोप थोडा वेळ.”

    मी खरंच झोपलो.

    जाग आली तर, चार वाजत आले होते. घाईगडबडीने उठलो. पत्नी अजून वहिनींशी गप्पा मारत होती. गणपत बाहेर गेला होता.

    मी पत्नीला हाक मारली. तशी ती गडबडीने बाहेर आली. तेवढ्यात गणपतही आला.
    “चल रे बाबा निघतो…” मी म्हणालो

    “फक्त दोन मिनिट थांब.”

    वाहिनींनी दोन पाट मांडले. पटकन एक रांगोळी काढली… “बसा तुम्ही दोघे.”

    “कशाला?”

    “बस रे बाबा, तुझ्या वहिनीची इच्छा आहे.”

    आम्ही बसल्यावर गणपतने माझ्या हातात शर्टचे कापड आणि वहिनींनी हिच्या हातात साडी दिली.

    “अरे, हे कशाला?”

    “असू दे. तू पहिल्यांदा आला आणि तेही जोडीने म्हणून.”

    आम्ही निघालो तितक्यात एक छोटे पोते घेऊन गणपत आला.

    “आता हे काय?”

    “घरची बाजरी आहे रे. थोडीच आहे. खाऊन बघितली ना तू?”

    “अरे, आता हे कशाला पुन्हा?”

    “थोडीच आहे. मी बांधतो मोटरसायकलच्या कॅरीअरला.”

    हेही वाचा – होप फॉर द बेस्ट!

    तृप्त पोटाने आणि मनाने निघालो. एवढा सत्कार तर, कोणी नातेवाईकानेही केला नसता. घरी आलो. कपडे बदलून बसत नाही तोवर फोन वाजला… गणपतचा होता…

    “अरे विवेक, तुझे 2000 रुपये इथेच विसरला तू. उद्या मी घेऊन येतो.”

    “राहूदे तिथेच. चार-पाच महिन्यांनी मी पुन्हा तुझ्याकडे येईन तेव्हा दे. फक्त एक अट आहे…”

    “कोणती?”

    “फक्त जेवण म्हणजे जेवणच द्यायचे. दुसरे काही नको. चालेल का?”

    “चालेल काय पळेल. पण चार-पाच महिने जरा जास्त नाही होत?”

    “ए बाबा… मग काय दर महिन्याला येऊ?”

    “काय हरकत आहे?”

    “धन्य हो तुझी…” मी फोन ठेवला आणि डोळ्यांत आलेले पाणी पुसले.

    एखाद्या माणसाबद्दल प्रेडिक्शन करणे किती कठीण असते ना?

    Avatar photo
    डॉ. विवेक वैद्य

    General practitioner असून ते नंदुरबार येथे राहतात. गेल्या काही वर्षांपासून स्वतःच्या FB वॉल वर तसेच साहित्यिक ग्रुप आणि वेबसाइटवर कथा लिहित असतात. नुकताच त्यांचा ‘काही कथा काही व्यथा’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांच्या कथा सामाजिक तसेच खासकरून स्त्रियांविषयी असतात. स्त्रियांची घरात होणारी घुसमट आणि हतबलता... तसेच शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या शोषणाविषयीही त्यांनी लिहिले आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक अलकही लिहिल्या.

    Related Posts

    Bookshelf : माझा प्रवास… एखादा सिंह डरकाळी फोडतो, तेव्हा-

    May 6, 2026 ललित

    फिरकी… 1100 रुपयांचं बक्षीस!

    May 5, 2026 ललित

    तणाव कमी करणारा त्रिवेणी संगम

    May 5, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    Bookshelf : माझा प्रवास… एखादा सिंह डरकाळी फोडतो, तेव्हा-

    By डॉ. अस्मिता हवालदारMay 6, 2026

    विष्णूभट गोडसे वरसईकर  यांचे ‘माझा प्रवास’ (संशोधित आवृत्ती- चिंतामणी विनायक वैद्य (1907)) हे मराठीतले पहिले…

    फिरकी… 1100 रुपयांचं बक्षीस!

    May 5, 2026

    तणाव कमी करणारा त्रिवेणी संगम

    May 5, 2026

    मनीऑर्डर… आण्णांच्या आत्म्यास समाधान देणारी!

    May 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    गणपत अन् 2000 रुपयांची उधारी…

    May 6, 2026

    Bookshelf : माझा प्रवास… एखादा सिंह डरकाळी फोडतो, तेव्हा-

    May 6, 2026

    Dnyaneshwari : तूं आदिमध्यांतरहितु, स्वसामर्थ्यें तूं अनंतु

    May 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 मे 2026

    May 6, 2026

    फिरकी… 1100 रुपयांचं बक्षीस!

    May 5, 2026

    विद्यार्थ्यांना क्लासेसची आवश्यकता किती?

    May 5, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 289
    • अवांतर 185
    • आरोग्य 107
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 409
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 203
    • मैत्रीण 18
    • ललित 606
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    गणपत अन् 2000 रुपयांची उधारी…

    May 6, 2026

    Bookshelf : माझा प्रवास… एखादा सिंह डरकाळी फोडतो, तेव्हा-

    May 6, 2026

    Dnyaneshwari : तूं आदिमध्यांतरहितु, स्वसामर्थ्यें तूं अनंतु

    May 6, 2026
    Most Popular

    गणपत अन् 2000 रुपयांची उधारी…

    May 6, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.