अध्याय तेरावा
ऐसी वार्धक्याची सूचणी । आपणिया तरुणपणीं । देखे मग मनीं । विटे जो गा ॥575॥ म्हणे पाहे हें येईल । आणि आतांचें भोगितां जाईल । मग काय उरेल । हितालागीं ? ॥576॥ म्हणोनि नाइकणें पावे । तंव आईकोनि घाली आघवें । पंगु न होता जावें । तेथ जाय ॥577॥ दिठी जंव जाये । तंव पाहावें तेतुलें पाहे । मूकत्वा आधीं वाचा वाहे । सुभाषितें ॥578॥ हात होती खुळे । हें पुढील मोटकें कळे । आणि करूनि घाली सकळें । दानादिकें ॥579॥ तेव्हा ऐसी दशा येईल पुढें । तैं मन होईल वेडें । तंव चिंतूनि ठेवी चोखडें । आत्मज्ञान ॥580॥ जैसे चोर पाहे झोंबती । तंव आजीचि रुसिजे संपत्ती । का झांकाझांकी वाती । न वचतां कीजे ॥581॥ तैसें वार्धक्य यावें । मग जें वायां जावें । तें आतांचि आघवें । सवतें केले ॥582॥ आतां मोडूनि ठेलीं दुर्गें । कां वळित धरिलें खगें । तेथ उपेक्षूनि जो रिगे । तो नागवला कीं ॥583॥ तैसें वृद्धाप्य होये । आलेपणें वायां जाये । जे तो शतवृद्ध आहे । नेणों कैंचा ॥584॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : निदैव्याचे व्यवसाय, तैसे ठाकती हातपाय
अर्थ
असा (पुढे येणार्या) म्हातारपणाचा इशारा आपल्या ठिकाणी तरुणपणी विचाराने पाहतो आणि मग जो त्याविषयी मनात विटतो ॥575॥ तो मनात म्हणतो, उद्या ही वृद्धावस्था येईल आणि सध्याची तारुण्यावस्था विषयभोगात निघून जाईल! आपले हित साधण्यास काय उरणार आहे? ॥576॥ म्हणून बहिरेपणा आला नाही तोपर्यंत; सर्व ऐकण्यास योग्य असेल ते सर्व ऐकून घेतो; पांगळे झालो नाही तोपर्यंत आपणास जेथे (देवस्थाने, तीर्थे वगैरे ठिकाणी) जावयाचे असेल तेथे जातो ॥577॥ जोपर्यंत दृष्टीचे सामर्थ्य टिकून राहिले आहे, तोपर्यंत जितके पाहावयाचे तितके पाहून घेतो आणि वाचा बंद होण्यापूर्वी सुभाषिते पाठ करून ठेवतो. ॥578॥ हात लुळे होतील, ही पुढील गोष्ट त्याला थोडीशी कळते, आणि (म्हणून) तो हातांनी दानादि सर्व सत्कृत्ये करून टाकतो. ॥579॥ अशी अवस्था पुढे येईल, त्या वेळी मन वेडे होईल, तेव्हा त्याच्या आधीच शुद्ध आत्मज्ञानाचा विचार करून ठेवतो. ॥580॥ जसे चोर उद्या द्रव्यावर तुटून पडतील, म्हणून आजच आपली संपत्ती आपल्यापासून दूर करावी, अथवा दिवा गेला नाही तोच झाकापाक करून ठेवावी, ॥581॥ त्याप्रमाणे म्हातारपण यावे आणि मग जे व्यर्थ जावे, ते आताच (तारुण्यातच) त्याने सर्व हातावेगळे करून टाकले. ॥582॥ आता जिकडेतिकडे किल्लेच किल्ले आहेत अशा ठिकाणी, पक्षी आपल्या घरट्यांकडे परत फिरण्याच्या वेळी (ऐन संध्याकाळी) जर एखादा प्रवासी प्रवास करत असता आला व त्या वेळी त्याने पुढे जाण्याचे टाकून जर किल्ल्यात प्रवेश केला, तर तो नागवला जाईल काय? ॥583॥ तसे म्हातारपण येईल व जन्माला आलेपण व्यर्थ जाईल, कारण शंभर वर्षे आयुष्य आहे, (तेव्हा भर ज्वानीत मजा करू व पुढे परमार्थ करू असे म्हणाणारा) तो तरी शतायु आहे (की नाही) हे कोणास ठाऊक? ॥584॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : कुसळें कोरडीं, वारेनि जाती बरडीं


