अध्याय तेरावा
हारी उमचावया । जुंवारी जैसा ये डाया । कीं वैरा बापाचेया । पुत्र जचे ॥541॥ मारिलियाचेनि रागें । पाठीचा जेवीं सूड मागें । तेणें आक्षेपें लागे । जन्मापाठीं ॥542॥ परि जन्मती ते लाज । न सांडी जयाचें निज । संभाविता निस्तेज । न जिरे जेवीं ॥543॥ आणि मृत्यु पुढे आहे । तोचि कल्पांतीं कां पाहे । परि आजीचि होये । सावधु जो ॥544॥ माजीं अथांव म्हणता । थडियेचि पांडुसुता । पोहणारा आइता । कासे जेवीं ॥545॥ कां न पवतां रणाचा ठावो । सांभाळिजे जैसा आवो । वोडण सुइजे घावो । न लगतांचि ॥546॥ पाहेचा पेणा वाटबंधा । तंव आजीचि होईजे सावधा । जीव न निगतां औषधा । धांविजे जेवीं ॥547॥ येऱ्हवीं ऐसें घडे । जो जळतां घरीं सांपडे । तो मग न पवाडे । कुहा खणों ॥548॥ चोंढिये पाथरु गेला । तैसेनि जो बुडाला । तो बोंबेहिसकट निमाला । कोण सांगे ॥549॥ म्हणोनि समर्थेंसि वैर । जया पडिलें हाडखाइर । तो जैसा आठही पाहर । परजूनि असे ॥550॥ नातरी केळवली नोवरी । का संन्यासी जियापरी । तैसा न मरतां जो करी । मृत्युसूचना ॥551॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : बहु योगाभ्यासीं हांव, विजनाकडे धांव
अर्थ
पणास लावून हरलेले द्रव्य परत मिळविण्याकरिता जुगार खेळणारा जसा पुन्हा डाव खेळण्यास तयार होतो अथवा वडिलांच्या वैराबद्दल जसा मुलगा (सूड घेण्यास) परिश्रम करतो ॥541॥ (वडील भावाला) मारल्याच्या रागाने जसा पाठचा भाऊ सूड घेण्याची खटपट करतो, तितक्या हट्टाने जो जन्माचे पाठीस लागतो. ॥542॥ परंतु संभावित मनुष्यास जसा अपमान सहन होत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनाला जन्मास आल्याबद्दलची लाज केव्हाही सोडीत नाही ॥543॥ आणि पुढे येणारा मृत्यू कल्पातांइतका इतका जरी दूर असला तरी तो आजच सावध असतो. ॥544॥ नदीमधे अथांग पाणी आहे असे म्हणताच, अर्जुना, पोहावयास तयार झालेला मनुष्य काठावर असताच जसा कासोटा बळकट घालतो. ॥545॥ अथवा युद्धाच्या जागी जाण्यापूर्वीच जसे आपले अवसान सांभाळावे अथवा शस्त्राचा घाव लागण्यापूर्वीच ढाल पुढे करावी, ॥546॥ उद्याचा मुक्काम वाटमार्याचा आहे, म्हणून जसे आजच साध व्हावे, अथवा जीव जाण्यापूर्वीच औषधाकरिता धावाधाव करावी; ॥547॥ (पुढे येणार्या संकटाची जर आधी सावध होऊन तरतूद करून ठेवली नाही) तर ज्याप्रमाणे जो जळत्या घरात सापडतो, तो जसा आपल्या सामर्थ्याने (आयत्या वेळी) विहीर खणू शकत नाही, तसे होते ॥548॥ खोल पाण्यात जसा दगड पडला, त्याप्रमाणे जो पाण्यात बुडाला, तो ‘मी बुडतो’ अशा ओरडण्यासह मेला, आता तो याप्रमाणे मेला, असे कोण सांगेल! ॥549॥ म्हणून ज्याचे समर्थ पुरुषाशी हाडवैर पडले आहे, तो जसा आठही प्रहर शस्त्र हातात घेऊन सज्ज असतो ॥550॥ अथवा लग्नाचा निश्चय घेऊन गडगनेर झालेली कुमारी माहेराविषयी उदासीन असते व सासरी जाण्याविषयी मनाची आगाऊ तयारी करून ठेवते किंवा संन्यासी सर्वस्वाविषयी ज्याप्रमाणे अगोदरच उदासीन असतो, त्याप्रमाणे प्रत्यक्ष मरण येण्याच्या अगोदरच, तो पुढे येणार्या मरणासंबंधी विचार करून उदास झालेला असतो. ॥551॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : मद्यपाआंगींचें वस्त्र, लेपाहातींचें शस्त्र


