दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 06 जुलै 2026; वार : सोमवार
- भारतीय सौर : 15 आषाढ शके 1948; तिथि : षष्ठी 13:46 ; नक्षत्र : पूर्वा भाद्रपदा 16:06;
- योग : सौभाग्य 15:50 ; करण : विष्टि 25:40;
- सूर्य : मिथुन; चंद्र : कुंभ 09:56; सूर्योदय : 06:05; सूर्यास्त : 19:20;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
प्राच्यविद्या संशोधक रामकृष्ण गोपाळ भांडारकर
टीम अवांतर
थोर प्राच्यविद्यासंशोधक संस्कृतचे प्रकांड पडित, भाषाशास्त्रज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक आणि समाजसुधारक रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म 6 जुलै 1837 साली मालवण येथे झाला. मुंबई विद्यापीठाच्या बीए आणि एमए या परीक्षा ते उत्तीर्ण झाले. मुंबई तसेच पुणे येथील जुन्या विद्वान शास्त्री-पंडितांजवळ न्याय, व्याकरण, वेदान्त इत्यादींचा चांगला अभ्यास केला. संस्कृतची दोन शालेय पाठ्यपुस्तके (प्रथम इंग्रजी आणि नंतर मराठी माध्यमातून) तयार केली. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना संस्कृत शिकता आले. 1893 मध्ये ते पुणे डेक्कन कॉलेजमधून संस्कृतचे प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले.
भांडारकरांनी संस्कृतच्या विदेशी अध्ययनाला नवे चिकित्सक आणि निःपक्षपाती संशोधनाचे स्वरुप दिले. 1885मध्ये जर्मनीतील गटिंगन विद्यापीठाने त्यांना पीएच्. डी. बहाल केली. मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये 1879 पर्यंत ते संस्कृतचे प्राध्यापक होते. मुंबई विद्यापीठचे अधिछात्र आणि सिंडिकेटचे सदस्य म्हणून कामगिरी बजाविल्यानंतर ते कुलगुरु झाले. 1904 मध्ये एल्एल्. डी. ही पदवी त्यांना मिळाली. अनेक संस्कृत हस्तलिखितांसंबंधी त्यांनी संशोधनात्मक लेख लिहिले. प्राचीन भारतीय ज्ञानभांडाराला जागतिक प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवून दिली.
हेही वाचा – नूतन… डोळ्यांतून बोलणारी कविता!
बालविवाहप्रतिबंध, विधवाविवाह, अस्पृश्यतानिवारण, मद्यपानबंदी, देवदासीपद्धतबंदी अशा सामाजिक सुधारणा व्हाव्यात म्हणून भांडारकरांनी अविरत श्रम केले. सामाजिक परिषदेच्या कार्यात भागही घेतला. हे सर्व कार्य करीत असताना त्यांना विरोध होऊन त्यांचा छळही झाला. 1911 मध्ये भरलेल्या दिल्ली दरबारप्रसंगी त्यांना ‘सर’ हा किताब देण्यात आला. न्या. रानडे यांच्या सर्वांगीण कार्याला त्यानी साथ दिली आणि नंतरही रानडे यांच्या प्रार्थनासमाजसारख्या अनेक संस्थांची धुरा वाहिली.
अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन, वैष्णविझम, शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स, ए पीप इनट् द अर्ली हिस्टरी ऑफ इंडिया, कलेक्टेड वर्क्स ऑफ श्री. आर्. जी. भांडारकर अशी त्यांची विपुल ग्रंथसंपदा त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देते. एवढेच नव्हे, तर प्राचीन भारताचा सुसंगत पुराव्यांच्या आधारे इतिहास कसा शोधून काढावा, ऐतिहासिक घटनांचा प्रमाणशुद्ध अर्थ कसा लावावा, याचा उत्कृष्ट नमुना त्यांच्या ऐतिहासिक लेखनात सापडतो. त्यामुळे त्यांचे ग्रंथ हे भारताच्या प्राचीन इतिहासाचे आधारभूत ग्रंथ म्हणून स्वीकारले जातात. मालती-माधव या संस्कृत ग्रंथाचे त्यांनी उत्कृष्टपणे संपादन केले.
भांडारकरांनी पुणे येथील ‘प्राच्यविद्या संशोधन मंदिरा’स आपल्या ग्रंथांचा आणि संशोधन पत्रिकांचा अनमोल संग्रह देणगी म्हणून दिल्यामुळे, ही महत्त्वाची संस्था उभी राहिली. शिक्षणप्रसारक मंडळी, फीमेल एज्युकेशन सोसायटी, सेवासदन यासारख्या पुण्या-मुंबईच्या अनेक शैक्षणिक संस्थांना त्यांच्या ज्ञानाचा आणि दातृत्वाचा लाभ झाला. 24 ऑगस्ट 1925 रोजी या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाचे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – मेहनत आणि बुद्धिमत्ता यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा आणखी मजबूत होऊ शकेल. महत्त्वाचा आर्थिक निर्णय घेऊ शकता, ज्याचा भविष्यात फायदा होईल. भागीदारीत काम केल्यास अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्यांनाही आशेचा किरण दिसू शकतो.
वृषभ – जबाबदाऱ्यांचे यशात रूपांतर करण्याची आज संधी आहे. एखाद्या गोष्टीबद्दल चिंता वाटत असेल, तर त्यावरही आज उपाय सापडेल. संततीकडून अशी एखादी चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हास्य येईल. ध्येयांवर लक्ष केंद्रित केले, तर यश नक्कीच मिळेल.
मिथुन – कोणताही महत्त्वाचा निर्णय घाईने घेण्याऐवजी, त्यावर सखोल विचार करणे फायदेशीर ठरेल. व्यवसायातील नवीन प्रयोग आणि नवीन योजना नफ्याचे नवीन मार्ग खुले करू शकतात. वाहन चालवताना अधिक सावधगिरी बाळगणे उत्तम राहील. संततीसंदर्भात निर्णय घेताना त्यांचाही दृष्टीकोन विचारात घ्या.
कर्क – उत्पन्न आणि खर्च यांच्यात योग्य संतुलन साधण्यात यशस्वी व्हाल, अनेक रखडलेल्या कामांनाही गती मिळू शकेल. एखादे जुने स्वप्न पूर्णत्वाकडे जात असल्याचे जाणवेल, ज्यामुळे प्रचंड आनंद होईल. नोकरीच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. वरिष्ठांसह सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
सिंह – आज एक प्रकारे तुमच्या संयमाची परीक्षा असेल. काही लोक मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील मात्र आत्मविश्वास तुम्हाला पुढे नेत राहील. नवीन मालमत्ता किंवा गुंतवणुकीबाबत सकारात्मक बातमी मिळू शकते. काहीतरी नवीन प्रकल्प सुरू करण्याची कल्पना भविष्यासाठी फायदेशीर ठरेल.
कन्या – कठोर परिश्रम आणि समजूतदारपणा हे दोन गुण दाखवावे लागतील. कामाचा ताण थोडा जास्त असेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. थोडासा निष्काळजीपणासुद्धा नुकसानीस कारणीभूत ठरू शकतो. विद्यार्थ्यांनी पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करणे हितावह ठरेल.
तुळ – वादांपासून दूर राहून संधींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. पैसे कमावण्याचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात. पैसे उधार देण्यापूर्वी नीट विचार करा. मालमत्तेशी संबंधित एखादे प्रकरण चिंता निर्माण करू शकते. व्यवसाय क्षेत्रात नफ्याचे प्रबळ संकेत आहेत. संयम आणि समजूतदारपणा तुम्हाला पुढे घेऊन जाईल.
वृश्चिक – व्यवसाय आणि आर्थिक बाबींसाठी शुभ संकेत आहेत. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. नोकरीच्या ठिकाणी एखादी नवी जबाबदारी मिळाली, तर ती पूर्ण समर्पणाने पार पाडाल. शासकीय बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे योग्य ठरेल.
हेही वाचा – सिया लक्ष्मी बनून आली अन् रामचं स्वप्न पूर्ण झालं…
धनु – कामाशी संबंधित काही निर्णयांबद्दल साशंक असाल, पण संयमाने योग्य मार्ग शोधाल. बँक कर्ज किंवा आर्थिक मदतीशी संबंधित तुमचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळाल्याने दिलासा मिळेल. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न फलदायी ठरू शकतो.
मकर – आजचा दिवस संधींनी भरलेला असेल. भागीदारीच्या कामातून चांगले परिणाम मिळू शकतात. नोकरदारांची मेहनत आणि प्रामाणिकपणा वरिष्ठांची मने जिंकू शकतो. अनोळखी व्यक्तींसोबत कोणत्याही नवीन व्यावसायिक चर्चेत सहभागी होण्यापूर्वी, सर्व बाबींची पूर्णपणे चौकशी करा.
कुंभ – स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्या. कामाच्या ठिकाणी घाई करू नका. एका लहान चुकीचाही विपरित परिणाम होऊ शकतो. एखाद्या सहकाऱ्याच्या तिरकस बोलण्यामुळे थोडेसे दुःख होईल, पण शांत राहणे शहाणपणाचे ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमचा सल्ला आणि अनुभव याला महत्त्व दिले जाईल.
मीन – आर्थिक बाबतीत अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सध्या कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा जोखमीचे निर्णय पुढे ढकलणे उत्तम राहील. अनोळखी लोकांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेणे टाळा. संयम आणि समजूतदारपणाने उचललेले प्रत्येक पाऊल संभाव्य समस्यांपासून वाचवू शकते.


