“तुज सगुण म्हणो की निर्गुण रे…” हे गाणे ऐकले आणि विचार सुरू झाले की, खरंच सगुण आणि निर्गुण म्हणजे काय? कोण महत्त्वाचे? त्यांची उपासना कशी करायची? एकदम लक्षात आले की, याचे उत्तर ‘श्रीमद्भगवद्गीता’मध्ये मिळेल.
त्यानुसार चवथ्या अध्यायात ज्ञानयोगाबद्दल सांगितले म्हणजेच सुरूवात करून दिली, त्यानंतर पुढील अध्यायांमध्ये सगुण साकार आणि निर्गुण निराकार उपासनेचे महत्त्व सांगून त्याचे फळ काय याबद्दल पण सांगितले. हे ऐकल्यावर मात्र दोन्हीमध्ये नक्की श्रेष्ठ कोण? असा प्रश्न अर्जुनाला पडला. त्याचे उत्तर पण बाराव्या अध्यायात दिले. त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, सोन्याचा पर्वत असो किंवा सोन्याचा तुकडा दोघांचाही कस सारखाच! म्हणजेच खंड हा प्रारंभ तर अखंड हा शेवट. अनेक पद्धतीने दोन्ही उपासनेमधील फरक अर्जुनाला सांगून दोन्हीही श्रेष्ठच आहेत, असे सांगितले. जसे की, एखाद्या गावाला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. कोणत्या रस्त्याने जायचे, हे गावाला जाणाऱ्याने ठरवायचे, तसे हे उपासनेचे आहे.
म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे तर, रूपगुण संपन्न, साकार, सत्व-रज-तमादि गुणयुक्त दृश्यरूप म्हणजे सगुण रूप. आपल्यासारखेच देवाला रूप देऊन त्याची पूजा करणे म्हणजे सगुण उपासना तर, परमेश्वराचे मूळ रूप, निरंजन, निराकार, आत्मस्वरूप, गुणातीत म्हणजेच निर्गुण रूप. या आत्मस्वरूपासाठी मनाला, बुद्धीला लीन करणे म्हणजे निर्गुण उपासना.
हेही वाचा – मन माऊली सकळांची…
अजून सोप्या भाषेत सांगायचे तर, श्रीकृष्ण आपल्या राधा-कृष्ण स्वरूपात जसा समोर येतो तसेच देवकीनंदन, द्रौपदीचा बंधु-सखा, अर्जुनाचा सारथी अशा पण रूपात समोर येतो. ही सगळी सगुण रूपं. पण मूळ कृष्ण निर्गुण रूपातच!
ज्ञानेश्वरांनी पण
तरी व्यक्त आणि अव्यक्त, हे तूचि एक निभ्रांत ||
भक्ती पाविजे व्यक्त, अव्यक्त योगे ||
या दोन्ही जी वाटा, तुंते पावावया वैकुंठा ||
व्यक्ताव्यक्त दारवंठा, रिगिजे येथ ||
असे सांगितले.
हेही वाचा – सहावे इंद्रिय… मन
पण जर सध्याचा विचार केला तर, सगुण उपासना करावी असे वाटते. जर देव सर्वत्र आहे, सर्वांमध्ये आहे तर, मूर्तीपूजासारखीच व्यक्तीपूजा करावी. “माणसाने माणसाशी माणसासम वागणे…” असे जरी केले तरी सगुण उपासनाच होणार आहे. जसे श्रीकृष्ण आपल्याला वेगवेगळ्या रूपांत भेटतो, परंतु प्रत्येक रूपातील प्रत्येक गोष्ट आपल्याला पटतेच, असे नाही. मग आपण आपल्याला चांगले वाटते तेच बघतो. तसेच, जर सर्व माणसांनी केले की, इतरांचे फक्त चांगले गुणच बघितले तर, आपोआपच सगुण उपासना चांगली होईल.
शेवटी सगुण खरे धरून चालल्याशिवाय निर्गुणापर्यंत पोहोचतां येणार नाही!


