नुकतेच माझ्या YouTube चॅनल वरून प्रा. डॉ. सुरेश मेणे लिखीत “मनाचे श्लोक – अध्यात्माची पाऊलवाट” या पुस्तकाचे 205 भागांचे क्रमश: वाचन पूर्ण केले. खरं सांगायचे तर, आध्यात्मिक पुस्तकांचे वाचन करायचे, हे ठरवून, या आधीपण “एक तरी ओवी ज्ञानेशांची” या डॉ. वि. रा. करंदीकर आणि डॉ. हे. वि इनामदार यांच्या पुस्तकाचे पण क्रमश: वाचन केले. यामधून अनेक गोष्टी समजत गेल्या, उमजत गेल्या, काहींच्या बाबतीत नव्याने विचार करू लागले. असाच हा पण एक विचार…
कोणीतरी म्हटले आहे की, “शरीराच्या नकाशात मनाला स्थान नाही, पण दुसऱ्या कोणालाही मनाइतका मान नाही.”
खरंतर, मन हे शरीर आणि इंद्रिये यांना नियंत्रित करते. मन चंचल आहे… मन चपल आहे… असे म्हटले जाते. अशा या मनाला उपदेश केला, मनाच्या श्लोकांमधून! एवढ्या सगळ्या गोष्टी मन करते तर, त्यामधून चांगल्या-वाईट गोष्टी घडत असतात; मग या गोष्टींना योग्य वळण लागावे, त्यावर योग्य संस्कार व्हावे म्हणून हे मनाचे श्लोक! काय चांगले, काय वाईट हे प्रत्येक श्लोकामधून मनाला समजावले आहे.
अगदी सकाळी उठल्याबरोबर
प्रभातने मनी रामचिंतीत जावा
या श्लोकापासून
घडी घडी मन आता रामरूपी भजावे..
यामुळे मनाला योग्य ते वळण लावणे सोपे जाईल, असे समर्थांचे म्हणणे आहे.
हेही वाचा – मन माऊली सकळांची…
प्रत्येक श्लोक हा आजच्या भाषेत सांगायचा तर Personality Development साठीच बनलेला आहे!
नको रे मना क्रोध हा खेदकारी…॥6॥
मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे…॥7॥
नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे…॥8॥
मनी मानसी दु:ख आणू नको रे… ॥12॥
मना सर्वथा सत्य सोडू नको रे…॥19॥
अशा सर्वच श्लोकांमधून मनाला उपदेश केला. यामधीलच अजून एक श्लोक जो आपण नेहमीच म्हणत असतो…
जगी सर्व सुखी असा कोण आहे?
विचारे मना तू चि शोधूनि पाहे…॥11॥
205 श्लोकांमधून या मनावर, पर्यायाने आपल्यावर खूप छान संस्कार झालेले आहेत.
मारूती स्तोत्रात हनुमानासाठी म्हटलेल्या ओळीमध्ये – मनासी टाकिले मागे गतिसी तुळणा नसे – असे म्हटले आहे.
असेच विचार सर्व संतांनी त्यांच्या अभंगातून व्यक्त केले आहेत. ते अभंग पण आपल्याला खूपच आवडतात, आपण ते मनापासून ऐकतो…
संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले । अवघे चि जालें देह ब्रम्ह ॥1॥
संत तुकाराम महाराज म्हणतात,
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलीया ॥1॥
संत एकनाथ महाराज म्हणतात,
माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद ॥1॥
गोरा कुंभार या नाटकातले अशोकजी परांजपे यांचे पद
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर । चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर ।।
तुलसीदास या नाटकातले गोविंदराव टेंबे यांचे पद
मन हो रामरंगी रंगले। आत्मरंगी रंगले, मन विश्वरंगी रंगले ।।
इतके छान हे मन शांत, प्रसन्न असले की, आपले जीवन सुखी, समाधानी, आनंदी असते. अशीच काही गाणी पण मन प्रसन्न करणारी आहेतच की. कोणत्याही भावना या मनातच जागतात. आपण काहीकाही वेळेस त्या भावना हृदयात जाग्या झाल्या असे म्हणतो. त्यामुळे –
राजहंस सांगतो कीर्तिच्या तुझ्या कथा ।
हृदयि प्रीत जागते जाणता अजाणता ।।
पाहिले तुला न मी तरीहि नित्य पाहते ।
लाजुनी मनोमनी उगिच धुंद राहते ।
ठाउका न मजसी जरी निषद देश कोणता ।।
दिवसरात्र ओढणी या मनास लागते ।
तुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते ।
मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता ।।
या गाण्यात मनाचे महत्त्व आपण ओळखतोच.
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला…
काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटे लाज काहीतरी होऊन गेले आज…
मी मनात हसता प्रित हसे…
डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे । साजाविना कळावे संगीत लोचनांचे !
मी वाचले मनी ते, फुलली मनात आशा ।
मनोरथा, चल त्या नगरीला । भूलोकीच्या अमरावतिला ।।
मानसीचा चित्रकार तो । तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो ।।
ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा । माझ्या मनातला का तेथे असेल रावा ?
अशी कितीतरी गाणी या मनावर आधारित आहेत. ही गाणी आपण नेहमीच ऐकत असतो. अशाच या मनाबद्दल गदिमा म्हणतात –
झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा ।
तसेच
मन सुद्ध तुझं गोष्ट हाये प्रृथ्वीमोलाची ।
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची ।
पर्वा बी कुनाची ।।
मन पिसाट माझे अडले रे, थांब जरासा !
हेही वाचा – दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद
तर गुरू ठाकूर म्हणतात
मन उधाण वाऱ्याचे
मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते,
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
दिवंगत बहिणाबाईंनी तर म्हटले आहे,
माझी माय सरसोती, मले शिकयते बोली, लेक बहिनाच्या मनी किती गुपीत पेरली।
त्याचबरोबर
मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।
अनेक हिंदी गाण्यांमधून पण या मनाचा उल्लेख केला आहे
मन रे तु काहे ना धीर धरे
तोरा मन दर्पण कहलाये
मनासाठी तर नेहमीच अनेक म्हणी पण आपल्या रोजच्या जीवनाचा भाग आहेत.
मनी वसे ते स्वप्नी दिसे”
मन चिंती ते वैरी न चिंती”
ऐकावे जगाचे आणि करावे मनाचे…
महत्वाचे काय तर आपल्या सर्वांगीण विकासासाठी मनाचे स्वास्थ्य जपणे. मनाला योग्य वळण लावणे. ते नेहमी प्रसन्न राहील असे आपले आचार- विचार ठेवणे महत्वाचे! असे सगळे योग्य असेल तर मन आणि पर्यायाने आपण पण प्रसन्न राहू.
चला तर मग संत तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण ।
मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ।।1।।
मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली ।
मनें इच्छा पुरविली । मना माउली सकळांची ।।2।।
मन गुरू आणि शिष्य । करि आपुलेंचि दास्य ।
प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगती ।।3।।
साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात ।
नाहीं नाहीं आन दैवत । “तुका” म्हणे दुसरें ।।4।।
तुम्हाला पण मनावर आधारित काही गाणी, श्लोक आठवत असतील तर ती नक्की सांगा..


