पूर्वार्ध
त्या दहा मजली हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावर नेहेमीप्रमाणे गडबड सुरू होती. पेशन्ट ॲडमिट होत होते, काही बरे होऊन बाहेर पडत होते. काही हे जग सोडून जात होते. नर्सेस, वॉर्डबॉईज इकडून तिकडे धावत होते. डॉक्टर्स या पेशन्टकडून त्या पेशन्टकडे जात होते… रसिका नर्स प्रत्येक पेशन्टचे ब्लडप्रेशर घेत होती, नाडी चेक करत होती, ऑक्सिजन लेव्हल पहात होती. एकएक पेशन्ट करत करत ती त्या आजोबांच्या जवळ आली…
“काय वर्दे आजोबा? कसं वाटतंय?”
आजोबानी हात वर केला आणि जणू ‘मी बरा आहे,’ असे सांगितले.
“भूक लागली काय? मोसंबी ज्युस आणू का?”
वर्दे आजोबानी मान हलवली. तशी रसिका पटकन बाहेर गेली आणि कॅन्टीनमधून ज्युस घेऊन आली. तिने चमच्याने ज्युस त्यांना भरवलं, तोंड पुसलं… मग त्यांचं ब्लड प्रेशर घेतलं, पल्सरेट पाहिलं… ते टेबलावरील चार्टवर नोट केलं आणि पुढच्या पेशन्टकडे गेली.
रसिका त्या वार्डमधील सर्व पेशन्टना पाहून नर्स रूममध्ये आली. तिच्या सोबतची दुसरी नर्स कविता तिला म्हणाली,
“रसिका… त्या वर्दे आजोबांना भेटलीस?”
“का गं?”
“अगं, भेटलीस म्हणजे त्यांचं बीपी वगैरे घेतलंस का?”
“हो, मी सर्वांनाच तपासते…”
“पण त्या आजोबांबद्दल काहीतरी वेगळं वाटत नाही काय?”
“वेगळं? हां… एक वेगळं म्हणजे त्यांना कुणी म्हणजे कुणी सुद्धा भेटायला येत नाही किंवा त्त्यांची विचारपूस करत नाही.”
“तेच म्हणते आहे मी रसिका! रोज संध्याकाळी नातेवाईक किंवा पेशन्टच्या जवळच्या लोकांना भेटायची वेळ असते ना, त्यावेळी या वॉर्डात सर्व पेशन्टचे नातेवाईक किंवा ओळखीची माणसे येत असतात, काही जण फुले घेऊन येतात, काही जण फळे आणतात… बहुतेक पेशन्टचे नातेवाईक बाहेर घुटमळत असतात, पण वर्दे आजोबांना भेटायला कुणी येत नाही, त्यांचे नातेवाईक येत नाहीत… त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला साधा फोन कुणी केला नाही गेल्या पंधरा दिवसांत!”
“ते खरे आहे… पण मला ते अत्यंत प्रेमळ आजोबा वाटतात…”
“तुला ते प्रेमळ का वाटतात कोण जाणे? मला तो खडूस म्हातारा वाटतो. तरुणपणात तो कुणाशी बरा वागला नसणार… त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याला इथे सोडला असणार…”
रसिका गप्प राहिली… पण तिला का कोण जाणे, त्या आजोबांबद्दल आपुलकी वाटत होती.
हेही वाचा – हळदीकुंकू… जुनी प्रथा मोडून काढणारे!
रसिका डॉ. आजगावकर सरांसोबत राऊंडला होती. सर प्रत्येक पेशन्टकडे जात होते… चार्टवरील नोट्स पहात होते.. पेशन्टना तपासत होते, त्त्यांची चौकशी करत होते.. त्याप्रमाणे औषधे लिहून देत होते… नर्स रसिकाला सूचना देत होते… आजगावकर वर्दे पेशन्टच्या बेडकडे आले…
“काय आजोबा, कसं वाटतंय?”
वर्दे फारसे बोलू शकत नव्हते… त्यांना सतत खोकला येत होता. श्वास लागत होता. वर्दे आजोबानी मोठ्या कष्टाने हात वर केला. डॉक्टरनी त्याना तपासले. त्त्यांची ऑक्सिजन लेव्हल थोडी कमी वाटली म्हणून त्यानी रसिकाला ऑक्सिजन लावायला सांगितलं आणि ते पुढील पेशन्टकडे गेले. रसिकाने छोटं ऑक्सिजन सिलिंडर आणलं आणि तिने वर्दे आजोबांना लावलं आणि ती तिथेच टेबलावर बसली.
आता वर्दे आजोबांचा खोकला थांबला, त्याना श्वास व्यवस्थित घेता येऊ लागला. रसिकाच्या मनात येत होते.. ‘कोण हे वर्दे आजोबा? यांना कुणी ॲडमिट केले? आणि यांना भेटायला कुणीच येत नाही… असे का?’
रसिकाने पाहिले, या आजोबांची छोटी बॅग होती. ती बेडखालीच होती. तिने ती बॅग उघडली… आत आजोबांचे दोन-तीन कपडे होते… आणि काही कागद होते. तिने ते कागद बाहेर काढले… काही वर्तमानपत्रांतील कात्रणे होती. एका कात्रणात वर्दे आजोबांच्या सत्काराचा फोटो होता. काही अधिकारी मंडळी त्यांना शाल घालत होती. दुसऱ्या फोटोत काही शाळकरी मुलांसमवेत वर्दे दिसत होते. एका फोटोत आग लागलेली एक शाळा दिसत होती आणि त्या आगीत घुसलेले तरुण वर्दे दिसत होते…
रसिकाला कळेना… कोण आहेत हे वर्दे? आज त्यांचे वय 85 होते आणि सिव्हिअर निमोनियाने ते आजारी होते. त्त्यांची तब्येत नाजूक होती. या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण त्यांचे कुणीच नातेवाईक कसे नाहीत? कुणी मित्र, ओळखीचे, शेजारी.. कुणीच नाही! कसे?
रसिकाला का कोण जाणे पण तिचे आजोबा आठवले… लहानपणी मांडीवर घेऊन गोष्टी सांगायचे… चिऊ-माऊची गोष्ट सांगत घास भरवायचे… आजोबा गेले आणि ते सुख गेले.
हे आजोबा तरी किती दिवस काढतील? मग हे जग सोडून गेले हे नातेवाईकाना, आप्तांना कळायला नको? कुणी तरी यांची आठवण काढतच असतील ना? कुणाला तरी ते आठवत असतील ना? काय करावे?
रसिकाला कल्पना सुचली… तिने पटकन मोबाइल बाहेर काढून वर्दे आजोबांचा फोटो काढला… सोबत त्यांच्या बॅगमधील जी कात्रणे होती, त्यांचेही फोटो काढले. ते सर्व एका पेजवर घेतले.. आणि त्या पेजवर लिहिले…
‘हे आजोबा या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत… यांचे कोण जवळचे आहेत काय?’
आणि ते पेज तिने सोशल मीडियावर पोस्ट केले. रसिका घरी आली. आई-सोबत जेवून आणि थोडा वेळ पुस्तक वाचून झोपी गेली. तिच्या बाजूलाच तिचा मोबाईल ठेवलेला होता. रात्री दोन वाजता तिला जाग आली… तिने सहज मोबाइल सुरू केला… तिला पण उत्सुकता होती, संध्याकाळी पाठविलेल्या पोस्टवर कोणी प्रतिक्रिया दिली की नाही! तिने पाहिले दोन हजारांपेक्षा जास्त लोकांनी पोस्ट पाहिली होती आणि अनेकांनी मेसेज टाकले होते.
“वर्दे सर, तुम्ही कुठे होतात इतके दिवस?”
“वर्दे सर, मी तुम्हाला भेटायला येतोय…”
“सर, तुम्ही शिकविलेले गणित अजून पक्के आहे डोक्यात.”
“सर, तुमच्यामुळे मी आज या पोझिशनला आहे…”
“सर, आमच्या वर्गाचे गेटटुगेदर होते, तेव्हा तुमची सर्व आठवण काढत होते…”
अनेक मेसेज आले होते. रसिकाला आनंद वाटला, सरांना ओळखणारे अनेक आहेत! अनेकांपर्यत ही पोस्ट पोहोचेल… त्यांच्या जवळच्या लोकांना सुद्धा कळेल, सर कुठे आहेत ते!
म्हणजे सर एकटे नाहीत तर! आपण योग्य तेच केले, हे समजल्याने ती परत गाढ झोपली.
दुसऱ्या दिवशी रसिका ड्युटीवर पोहोचली, तेव्हा अनेक स्त्री-पुरुष तिची वाट पहात होती. सर्वांना वर्दे सरांना भेटायचं होतं. तिने नम्रपणे सर्वाना सांगितलं, “रुग्णांना भेटायची वेळ सायंकाळी पाच ते आठ आहे, त्या वेळेत या.” पण बरीच मंडळी रिसेप्शनकडे आली होती… सर्वांना वर्दे सरांना भेटायचं होतं… पण तिथे पण त्याना तेच सांगितलं गेलं.
रसिका आपला ड्युटी ड्रेस परिधान करीत होती, तेव्हा तिची मैत्रीण कविता पण तिथे होती, ड्युटीवर येताना तिनेही हॉस्पिटलबाहेर अनेक जण वर्दे सरांना भेटायला आल्याचं पाहिलं होतं.
“रसिका, एका दिवसात काय जादू झाली. कालपर्यंत कुणी म्हणजे कुणीसुद्धा या वर्दे पेशन्टला भेटायला येत नव्हते आणि आज गेटबाहेर ही गर्दी… मला वाटले आपल्या हॉस्पिटलमध्ये कोणी व्हीआयपी ॲडमिट आहे की काय? चौकशी केली तर आपल्याच वॉर्डमधील वर्दे आजोबा.”
“अगं तस नाही गं कविता, माझा अंदाज होताच हे वर्दे आजोबा कुणी सामान्य माणूस नाही, ते निश्चित आपल्या क्षेत्रात विशेष असणार. मी त्यांची बॅग उघडली, त्यात काही वर्तमानपत्रातील कात्रणे होती. ती कात्रणे आणि आजोबांचा फोटो मी सोशल मीडियावर टाकला फक्त, रात्री दोन वाजेपर्यत दोन हजारांहून जास्त लोकांनी तो पाहिला आणि मेसेजची रिघ लागली.”
हेही वाचा – एका संपाची कहाणी
“ओके रसिका, तर तुझ्यामुळे तुझे लाडके आजोबा प्रकाशात आले!”
“माझ्यामुळे नाही गं, तेच काही कारणांनी समाजापासून लांब राहिले असावेत… पण काही का असेना ते आपल्या जवळच्या लोकांपुढे आले, हे चांगले झाले.”
रसिकाच्या फोनमध्ये अनेकांचे मेसेज येतच होते, काहीजण फोन करत होते, पण ती ड्युटीवर असल्याने तिने कुणाला उत्तरे दिली नाहीत. सायंकाळी मात्र वर्दे सरांना भेटणाऱ्यांची रिघ लागली. त्त्यांचे अनेक विदयार्थी, सहशिक्षक, ते चाळीस वर्षांपूर्वी ज्या घरात रहात होते तेथले शेजारी… पण वर्दे सर त्यांना ओळखत नव्हते!
वर्दे सरांचे सहकारी शिक्षक म्हणत होते, जवळजवळ चाळीस वर्षे सर बेपत्ता होते… 85 साली सरांना शेवटचे पाहिले होते, त्यानंतर सर आज दिसत आहेत. होते कुठे सर? आणि ते नोकरी, गाव सोडून का गेले?


