नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
आजचा विषय प्रत्येक बाईच्या जिव्हाळ्याचा… आपली कामवाली बाई किंवा मोलकरीण. खरंतर, ती असते आपली मदतनीस. तर, तशा माझ्याकडे बऱ्याच मदतनीस झाल्या. काहीजणी काम सोडून गेल्या, काही घर सोडून लांब गेल्या म्हणून काम सोडून गेल्या… काहींना मी ‘उद्यापासून येऊ नकोस’ असं सांगितलं! पण एक मुलगी माझ्याकडे कामाला आली आणि तब्बल 11 वर्षे टिकली. आता मीच घर बदलून लांब राहायला गेले. त्यामुळे तिच्यापासून फारकत घ्यावी लागली.
तिची कहाणी देखील टिपिकल आहे – पहिली मुलगी जन्माला आली अन् सासू नाराज झाली. नवरा एका कंपनीमध्ये वॉचमन म्हणून काम करायचा. घराला हातभार म्हणून ती घरकाम करायला लागली. लहानग्या लेकीला कडेवर घेऊन सगळीकडे काम करायची. मुलगी झाली म्हणून सासूने तिला कामाला जाताना मुलीला सांभाळायला नकार दिला होता. चार-पाच वर्षांनी तिला मुलगा झाला. पण त्याच्या हृदयात काहीतरी प्रॉब्लेम होता. चार महिन्यांचा असताना त्या बाळाची ओपन हार्ट सर्जरी (Open heart surgery) झाली. पाच वर्षांचा होईपर्यंत तिने त्याला अक्षरशः हाताच्या फोडाप्रमाणे जपलं. त्यानंतर सुद्धा ती काम करत होती. आता तिची सासू थोडा वेळ मुलाला सांभाळत होती.
हेही वाचा – मोठी आई अन् तिने लहानांचा राखलेला सन्मान!
तिची मुलं थोडी मोठी झाली. राहतं घर एसआरएमध्ये गेलं. चार-पाच वर्षं तरी त्या लोकांना बाहेर भाड्याने राहावं लागणार होतं. सासूने तिला वेगळं राहायला सांगितलं. दुसरा मुलगा आणि नाती सोबत ती स्वत: वेगळी राहिली. बिल्डरकडून भाड्यापोटी मिळणाऱ्या पैशातील, थोडेफार ती हिला द्यायची. त्यात ही जास्तीचे पैसे घालून स्वतःच्या घराच भाडं भरत होती आणि त्या घरात नवरा आणि मुलांसोबत नांदत होती.
माझ्याच सोसायटीच्या ऑफीसमधल्या एका खोलीत तिने संसार थाटला. ती दिवसभर बाहेरची कामं करायची. नवरा दिवसभर घरी राहून मुलांना सांभाळायचा, जपायचा. रात्री कंपनीमध्ये वॉचमन म्हणून काम करायचा. छान चाललं होतं सगळं.
तशातच लॉकडाऊन लागलं. एका झटक्यात तिची सगळी कामं बंद झाली. एकाच सोसायटीमध्ये राहत असल्यामुळे माझ्याकडचं काम तेवढं सुरू होतं. नवऱ्याचा पगार सुरू होता पण अर्धा! त्यातच ती नेटाने सगळं सावरत होती. काहीवेळेस बाजारात काही मिळत होतं-नव्हतं. पैसे असायचे-नसायचे. मुले पण गुणी… कसलाही हट्ट नाही!
याच काळात माझ्या मुलांची पण मला नव्याने ओळख झाली. दोन्ही मुलं काहीही आणायला गेली तरी, तिच्या मुलांसाठी पण तोच खाऊ, भाज्या, अंडी, चिकन सगळं घेऊन यायला लागले. तिचा ‘सेल्फ रिस्पेक्ट’ ठेवणं पण गरजेचं होतं. म्हणूनच, एका भाजीवाल्या मी सांगून ठेवलं होतं, ‘ती ज्या काही भाज्या घेईल, त्याचे थोडेच पैसे घे. बाकीचे मला सांग, मी देईन.’ बऱ्याच ठिकाणी धान्य वाटप केलं गेलं. तिथून मिळेल तेवढं धान्य ती घेऊन यायची आणि टुकीने संसार करत होती.
हेही वाचा – माझं बालपण… गिरगाव ते बदलापूर व्हाया कॉटनग्रीन!
थोड्या दिवसांनी ती बाहेर कामाला जायला लागली. दुसरीकडे जागा भाड्याने घेतली आणि तिथेच घात झाला. तिच्या नवऱ्याला पक्षाघात झाला… एवढा तरुण मुलगा! तिच्या भावाने आणि नंदव्याने खूप मदत केली. माझ्या एका ओळखीच्या माणसाला सांगून तिच्यासाठी मदत मिळवली. तिचा नवरा तरुण होता, निर्व्यसनी होता आणि तिची मेहनत होती. हळूहळू तो बरा व्हायला लागला… अन् बरा झालाही!
आता आजारच एवढा मोठा होता, तो स्वतःचा थोडा तरी ठसा ठेऊन देणारच होता. हाता-पायात थोडी कसर राहिली. नोकरी सुटली… पण ती मात्र हिम्मत धरून राहिली. मी घर सोडून दुसरीकडे राहायला आले. माझं घर सुटलं. खूप रडली. तिचं हक्काचं घर होतं ना! ज्या दिवशी मी शिफ्टींग केलं, ती आलीच नाही. आदल्या दिवशी म्हणाली, “काकी तुम्हाला जाताना मी बघू नाही शकणार…” एवढ्या वर्षांचं प्रेम, एकत्र काढलेली वर्षं त्रास तर होणारच, तिलाही आणि मलाही!
मी अधून मधून जातच असते तिथे. हमखास भेट होते तिची. मुलगी यंदा दहावीला आहे. मुलगाही सहावीला आहे. बरं चाललंय. एकदा भेटली आणि म्हणाली, “काकी, मंगळसूत्र दिलंय बनवायला… अडीच लाखांचं!” खूप छान वाटलं. काय म्हणतात ते, ‘मेहनत करने वालों की हार नहीं होती!’
सुखी रहा… खूप सारं यश मिळू देत.


