माझी मैत्रीण ललिता… ललिता खरेदीच्या बाबतीत अत्यंत जाणकार आहे… तिनेच तसं मला सांगितलंय! साधी भाजी घेताना पण ती भय्याला विचारते – “ताजी है ना? शिळी तो नहीं ना? ये किडकी निकली तो देख हां!” भय्या नुसतीच मुंडी हलवतो… नरो वा कुंजरोवा… ज्याला जो हवा तो अर्थ घ्या. ललिता पण तिला हवा तो अर्थ घेऊन भाजी खरेदी करते. फळवाल्याकडे देखील अशाच प्रकारे खात्री करूनच खरेदी करते! तिने खरेदी केलेल्या सगळ्याच वस्तू बेस्टेस्ट असतात याचा तिला खूप अभिमान आहे. कोणताच दुकानदार तिला कधीच सांगत नाही – “हो, भाजी शिळी आहे… फळं किडकी आहेत!”
अगदी कालचीच गोष्ट… तिने दोन कुर्ते विकत घेतले… नेहमीप्रमाणे तिने दुकानदाराला विचारलंच – “रंग नहीं जायेगा ना? कापड आटेगा तो नहीं?” त्या दुकानदाराने रिसीट तयार करून पैसे घेता घेता, शुद्ध मराठीत तिला सांगितलं – रंग आगदी पक्का आहे… कापड पण मुळीच आटणार नाही… मी आहे ना इथे! कधीही परत आणा, बदलून देईन…” ललिता एकदम खूश! दुकानदाराचे बोलणे ऐकून माझ्याकडे तिने विजयी नजरेनं बघितलं… नेहमीप्रमाणे तिने फायदेशीर खरेदी केली होती ना!
हेही वाचा – ललिताची गीता
कपड्यांची पिशवी ललिताच्या हातात देता देता दुकानदाराने सांगितलं – “मॅडम, हे कुर्ते बदलायचे असतील तर फक्त रिसीट आणा… आणि कपड्यांचा टॅग काढू नका.” लालिताने रिसीट जपून पर्समध्ये ठेवली… हो, गरज पडली तर!
पण मला हे नाही कळलं – कपड्याचा रंग जातोय का… आटतोय का… हे कुर्ते पाण्यात बुडवल्याशिवाय कसं कळणार? आणि मग तो टॅग, त्याचं काय? पाण्यात भिजल्यावर काय होईल? पण हे ललिताला सांगणार कसं? मला कुठे काय कळतंय!
हेही वाचा – बायका म्हणजे…!
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


