नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
गणपती तोंडावर आले की, माझ्या विहिणबाई ज्योती ताई गेली पाच वर्षे माझ्या मागे लागल्या होत्या की, “लक्ष्मीच्या आई चला ना माझ्याबरोबर किंग्ज सर्कलला. जीएसबीच्या गणपतीचं विराट दर्शन घ्यायला.” मी आपली नेहमी ‘हो, हो’ म्हणायचे. पण कधीच जमलं नव्हतं. यावर्षी ठरवलंच की, “जायचं म्हणजे जायचंच…” आणि जमलं की हो!
यावर्षी मी मंगला ताईंच्या कृपेने ज्योती ताई आणि मिलिंद दादासोबत विराट दर्शनला पोहोचले. तिथलं सगळं प्रकरणच विराट होतं. आतमध्ये फार सहज प्रवेश झाला. बसायला खुर्च्या पण राखून ठेवल्या होत्या. आम्ही आतमध्ये गेलो, फ्रेश झालो. मस्त आलं-वेलची घातलेला गरमागरम दुधाळ चहा पिऊन जागेवर येऊन बसलो. पण पाचच मिनिटांत एवढा मोठा ते सभागृह खचाखच भरले. अगदी हलायला सुधा जागा नव्हती. पण तरीही सगळं कसं शिस्तबद्ध होतं.
मान्यवरांची भाषणं झाली. ढोल-पथक ताल धरून वातावरण अजून पवित्र करत होते. थोड्या वेळाने तो लाल मखमली पडदा वर सरकत गेला. उत्सुकता शिगेला पोहोचली होती… आणि त्या विघ्नहर्त्याच लोभस दर्शन झालं.स्वर्ग स्वर्ग तो हाच असे वाटत होतं! बरं, बाप्पा तर सुंदर होताच, पण स्त्रीसुलभ आवड… बाप्पाचे सोन्याचांदीचे दागिने अगदी डोळे दिपवून टाकत होते. सिंहासनाला आणि इतर अशी 333 किलो चांदी आणि अतोनात सोने. मुकूट, कान, सोंड, हात-पाय सर्वत्र सोनंच!!
हेही वाचा – गणेशा मला तुझा छंद…
भाषणात एकाने सांगितलं की, हे सगळे दागिने आणि सोन्याचांदीच्या वस्तू फक्त 15 दिवसांकरिता लॉकरमधून बाहेर काढतात. पहिले पाच दिवस सगळ्या वस्तू मांडणे, देवाला अलंकार घालणं, मग पाच दिवस बाप्पाचा उत्सव… आणि शेवटचे पाच दिवस सगळ्या दागिन्यांची स्वच्छता करून, बांधाबांध करून, पुन्हा सगळं लॉकरमध्ये ठेवणे. असे ते 15 दिवस. या सगळ्यासाठी ते जो इन्शुरन्स पे करतात तो 475 कोटी एवढा असतो… अबब!!!
बाप्पा नवसाचा तर आहेच, पण अतोनात श्रीमंत. दर्शन सोहळ्यानंतर तिथे येणाऱ्या प्रत्येकाला जेवणाचा महाप्रसाद. उत्तम प्रतीचं, स्वच्छ, सुग्रास, सात्विक जेवण सगळ्यांना वाढलं जात. त्या महाप्रसादामागे फक्त पैसा नसून कितीतरी लोकांची श्रद्धा आणि मेहनत दिसून येते.
आम्ही तिथून निघून घरी पोहोचलो तरी, आमच्या मंगला ताई तिथेच होत्या. खूप उशिराने घरी जाऊन सुद्धा सकाळी लवकर उठून भाजी चिरण्याच्या सेवेसाठी हजर होत्याच. अतिशय उत्साही आणि श्रद्धाळू, कौतुक आहे की नाही!
हेही वाचा – भूतकाळ न विसरलेला भिडुजी!
आता अजून एक व्यक्तीचं कौतुक. गौतमी पाटकर… जीएसबीच्या बाप्पाला यावर्षी 72 वर्षं पूर्ण झाली. मूर्तिकार पाटकरांना पण 72 वर्षे झाली. पहिल्या मूर्तीपासून तिचे आजोबा मूर्तीकार होते. गेली 35 वर्षे तिचे बाबा मूर्ती बनवत होते आणि गेली पाच वर्षे साक्षात गौतमी आपल्या कुटुंबाचा वारसा पुढे नेतेय. ती तिच्या बाबांसोबत गणरायाची ही मूर्ती बनवते आहे. 22 ते 25 वर्षांची ही मुलगी एवढी सुंदर मूर्ती तयार करते… कसब रक्तातच आहे. गौतमी पाटकर अशाच सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्ती घडव, खूप मोठी खूप यशस्वी हो.
गणपती बाप्पा मोरया।। मंगलमूर्ती मोरया ।।


