सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय बारावा
पाखांडाचे दरकुटे । मोडीं वाग्वादअव्हांटे । कुतर्काचीं दुष्टें । सावजें फेडीं ॥14॥ श्रीकृष्णगुणीं मातें । सर्वत्र करीं वो सरतें । राणिवे बैसवीं श्रोते । श्रवणाचिये ॥15॥ मऱ्हाठियेचां नगरीं । ब्रह्मविद्येचा सुकाळु करीं । घेणें देणें सुखचिवरी । हों देई या जगा ॥16॥ तूं आपुलेनि स्नेहपल्लवें । मातें पांघरुविशील सदैवें । तरि आतांचि हें आघवें । निर्मीन माये ॥17॥ इये विनवणीयेसाठीं । अवलोकिलें गुरु कृपादृष्टी । म्हणे गीतार्थेंसी उठी । न बोलें बहु ॥18॥ तेथ जी जी महाप्रसादु । म्हणोनि साविया जाला स्वानंदु । आतां निरोपीन प्रबंधु । अवधान दीजे ॥19॥
अर्जुन उवाच – एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ।
ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ॥1॥
तरी सकलवीराधिराजु । जो सोमवंशीं विजयध्वजु । तो बोलता जाहला आत्मजु । पांडुनृपाचा ॥20॥ कृष्णातें म्हणे अवधारिलें । आपण विश्वरूप मज दाविलें । तंव नवल म्हणोनि बिहालें । चित्त माझें ॥21॥ आणि ये कृष्णमूर्तीची सवे । यालागीं सोय धरिली जीवें । तंव नको म्हणोनि देवें । वारिलें मातें ॥22॥ तरि व्यक्त आणि अव्यक्त । हें तूंचि एक निभ्रांत । भक्ती पाविजे व्यक्त । अव्यक्त योगें ॥23॥ या दोनी जी वाटा । तूतें पावावया वैकुंठा । व्यक्ताव्यक्त दारवंठां । रिगिजे येथ ॥24॥ पैं जे वानी श्यातुका । तेचि वेगळिये वाला येका । म्हणोनि एकदेशीया व्यापका । सरिसा पाडु ॥25॥ अमृताचां सागरीं । जे लाभे सामर्थ्याची थोरी । तेचि दे अमृतलहरी । चुळीं घेतलिया ॥26॥
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसा जो भक्तु होये, तयाचें त्रिधातुक हें जैं जाये
अर्थ
(माझ्या देशीभाषारूपी पृथ्वीवर पुढील गोष्टी नकोत, असे ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंना म्हणतात.) नास्तिकपणारूपी दर्या आणि वितंडवादरूपी आडवाटा नाहीशा कर, आणि कुतर्करूपी दुष्ट जनावरे हाकून दे. ॥14॥ श्रीकृष्णगुणांचे वर्णन करण्यात मला सर्वत्र समर्थ कर आणि श्रोत्यांना श्रवणाच्या राज्यावर बसव. ॥15॥ या मराठी भाषेच्या गावात आत्मज्ञानाची रेलचेल कर आणि या जगाला केवळ ब्रह्मसुखाचेच घेणे देणे होऊ दे. ॥16॥ हे श्री गुरुरूपी माते, जर तू आपल्या प्रेमरूपी पदराने मला निरंतर पांघरूण घालशील, तर आता मी हे सर्व उत्पन्न करीन. ॥17॥ या विनवणीबरोबर गुरूंनी त्यास कृपादृष्टीने पाहिले आणि म्हटले, गीतार्थ करावयास लाग, फार बोलू नकोस. ॥18॥ (असे गुरू बोलले) तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना सहजच आनंद झाला आणि ते म्हणाले, महाराज, आपण जी मला आज्ञा केली ती मी आपला महाप्रसाद समजतो. तर आता आपल्या आज्ञेप्रमाणे मी कथा सांगेन, आपण लक्ष देण्याची कृपा करावी. ॥19॥
अर्जुन म्हणाला, याप्रमाणे सतत (तुझ्या व्यक्त स्वरूपाच्या ठिकाणी) युक्त असलेले जे भक्त तुझी उपासना करतात आणि जे अव्यक्त अशा अक्षरब्रह्माची उपासना करतात, त्या (दोन प्रकारच्या) योग्यांपैकी उत्तम योगी कोणते? ॥12॥
तरी सर्व वीरांचा सार्वभौम राजा आणि चंद्रवंशाच्या विजयाचा ध्वज आणि पंडुराजाचा मुलगा जो अर्जुन, तो बोलला. ॥20॥ मग अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, ऐकले महाराज, आपण मला विश्वरूप दाखविले, तेव्हा ते विश्वरूप अपूर्व म्हणून माझे चित्त भ्याले. ॥21॥ आणि (मला) या श्रीकृष्णाच्या सगुण रूपाची सवय आहे, म्हणून मनाने त्याचाच आश्रय केला. तेव्हा सगुण मूर्तीवर प्रेम ठेवणे चांगले नाही, म्हणून तेथे प्रेम ठेवू नकोस, असे देवांनी मला बजावले. ॥22॥ तर व्यक्त रूपाने अथवा अव्यक्त रूपाने तूच एक आहेस, याविषयी (माझ्या मनात) संशय नाही. भक्तीने व्यक्त स्वरूपाची आणि योगाने अव्यक्त स्वरूपाची प्राप्ती होते. ॥23॥ हे वैकुंठा, व्यक्त आणि अव्यक्त असा जो तू, त्या तुझ्या प्राप्तीच्या उंबर्यात सोडणारे, भक्ती आणि योग हे दोन मार्ग आहेत. ॥24॥ परंतु जो कस शंभरभार सोन्याच्या लगडीला असतो, तोच कस त्या लगडीतील वेगळ्या काढलेल्या एका वालभर सोन्याला असतो. म्हणून मर्यादित आणि व्यापक यांची योग्यता सारखी आहे. ॥25॥ अमृताच्या समुद्रामध्ये जी सामर्थ्याची थोरवी आढळून येते, तीच थोरवी त्या अमृतसमुद्राच्या लाटेतील चुळकाभर अमृत प्याले असता प्राप्त होते. (त्याप्रमाणे व्यक्त रूप जरी परिच्छिन्न आहे आणि अव्यक्त रूप हे जरी व्यापक आहे, तरी ती दोन्ही रूपे एकाच योग्यतेची आहेत.) ॥26॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : म्हणोनि अंबे श्रीमंते, निजजनकल्पलते


