सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय बारावा
जय जय शुद्धे । उदारे प्रसिद्धे । अनव्रत आनंदे । वर्षतिये ॥1॥ विषयव्याळें मिठी । दिधलिया नुठी ताठी । ते तुझिये गुरुकृपादृष्टी । निर्विष होय ॥2॥ तरि कवणातें तापु पोळी । कैसेनि वो शोकु जाळी । जरि प्रसादरसकल्लोळीं । पूरें येसि तूं ॥3॥ योगसुखाचे सोहळे । सेवकां तुझेनि स्नेहाळे । सोऽहंसिद्धीचे लळे । पाळिसी तूं ॥4॥ आधारशक्तीचां अंकीं । वाढविसी कौतुकीं । हृदयाकाशपल्लकीं । परिये देसी निजे ॥5॥ प्रत्यग्-ज्योतीची वोवाळणी । करिसी मनपवनांचीं खेळणीं । आत्मसुखाचीं बाळलेणीं । लेवविसी ॥6॥ सतरावियेचें स्तन्य देसी । अनाहताचा हल्लरु गासी । समाधिबोधें निजविसी । बुझाउनि ॥7॥ म्हणोनि साधकां तूं माउली । पिके सारस्वत तुझां पाउलीं । या कारणें मी साउली । न संडीं तुझी ॥8॥ अहो सद्गुरुचिये कृपादृष्टी । तुझें कारुण्य जयातें अधिष्ठी । तो सकळ विद्यांचिये सृष्टी । धात्रा होय ॥9॥ म्हणोनि अंबे श्रीमंते । निजजनकल्पलते । आज्ञापीं मातें । ग्रंथनिरूपणीं ॥10॥ नवरसीं भरवीं सागरु । करवीं उचित रत्नांचे आगरु । भावार्थाचे गिरिवरु । निफजवीं माये ॥11॥ साहित्य सोनियाचिया खाणी । उघडवीं देशियेचिया आक्षोणीं । विवेकवेलीची लावणी । हों देईं सैंघ ॥12॥ संवादफळनिधानें । प्रमेयाचीं उद्यानें । लावीं म्हणें गहनें । निरंतर ॥13॥
हेही वाचा – Dnyaneshwari : कां उदय न कीजे तेजाकारें, तंव गगनचि होऊनि असे आंधारें
अर्थ
तू शुद्ध आहेस, तू उदार म्हणून प्रसिद्ध आहेस आणि अखंड आनंदाची वृष्टी करणारी आहेस. गुरुकृपादृष्टीरूपी माते, तुझा जयजयकार असो. ॥1॥ विषयरूपी सर्पाने दंश केला असता मूर्च्छा येते, ती काही केल्या जात नाही. हे गुरुकृपादृष्टी, तुझ्या योगाने ती मूर्च्छा नाहीशी होते आणि सर्पदंश झालेल्या (त्या) प्राण्याची त्या (विषय) विषापासून सुटका होते. ॥2॥ जर प्रसन्नतारूप पाण्याच्या लाटांची तुला भरती येईल, तर संसाराच्या त्रासाचे (अध्यात्मादी त्रिविध तापांचे) चटके कोणाला बसतील? आणि खेद कसा बरे जाळू शकेल? ॥3॥ हे प्रेमळ माते, भक्तांना अष्टांग योगाच्या सुखाचे भोग तुझ्यामुळे प्राप्त होतात आणि भक्तांची, ते ‘ब्रह्म मी आहे’ अशा स्वरूपसिद्धीच्या प्राप्तीची हौस तू पुरवितेस. (ती कशी पुरवितेस हे स्पष्ट करतात.) ॥4॥ आधारचक्रावर असलेल्या कुंडलिनीच्या मांडीवर तू आपल्या भक्तांना कौतुकाने वाढवितेस आणि त्यांना झोप येण्याकरिता हृदयाकाशरूपी पाळण्यात घालून झोके देतेस. ॥5॥ आत्मप्रकाशरूप ज्योतीने साधकरूपी बालकास ओवाळतेस तसेच मन आणि प्राण यांचा निरोध करणे ही खेळणी त्यांच्या हातात देतेस आणि स्वरूपानंदाचे (लहान मुलाना घालावयाचे) दागिने साधकरूपी बालकांच्या अंगावर घालतेस. ॥6॥ सतरावी जीवनकलारूपी (व्योमचक्रातील चंद्रामृतरूपी) दूध देतेस आणि अनाहत ध्वनीचे गाणे गातेस, आणि समाधीच्या बोधाने समजूत घालून (स्वरूपी) निजवितेस. ॥7॥ म्हणूण साधकांना तू आई आहेस आणि सर्व विद्या तुझ्या चरणांच्या ठिकाणी पिकतात; म्हणून मी तुझा आश्रय सोडणार नाही. ॥8॥ हे सद्गुरुंची कृपादृष्टी, तुझ्या कृपेचा आश्रय ज्याला मिळेल, तो सर्व विद्यारूप सृष्टीचा (उत्पन्नकर्ता) ब्रह्मदेवच बनतो. ॥9॥ एवढ्याकरिता हे आपल्या भक्तांचा कल्पतरु आणि श्रीमंत अशा आई, तू मला हा ग्रंथ सांगण्याला आज्ञा दे. ॥10॥ शांत, अद्भुतादी नवरसांच्या समुद्राची माझ्या भाषेत भरती कर आणि (परमार्थ निरूपणास) शोभतील अशा योग्य अलंकाररूपी रत्नांची (माझे निरूपण हे) खाणच होऊन राहील असे कर. हे माऊली, (माझ्या या व्याख्यानात) गीतेतील अभिप्रायाचे मोठमोठे पर्वत तयार होतील, असे कर. ॥11॥ मराठी भाषारूपी पृथ्वीमध्ये अलंकाररुपी सोन्याच्या खाणी उघड आणि आत्मानात्मविचाररूपी वेलींची लावणी जिकडे तिकडे होऊ दे. ॥12॥ संवादरूपी फळांचे भार असलेले सिद्धातांचे दाट आणि विस्तीर्ण बगीचे निरंतर तयार कर, असे ज्ञानेश्वर महाराज (आपल्या गुरूंना) म्हणतात. ॥13॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसा जो भक्तु होये, तयाचें त्रिधातुक हें जैं जाये


