सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः ॥ निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॥55॥
जो मजचि एकालागीं । कर्में वाहातसे आंगीं । जया मीवांचोनि जगीं । गोमटें नाहीं ॥696॥ दृष्टादृष्ट सकळ । जयाचें मीचि केवळ । जेणें जिणयाचें फळ । मजचि नाम ठेविलें ॥697॥ भूतें हे भाष विसरला । जे दिठी मीचि आहे बांधला । म्हणोनि निर्वैर जाहला । सर्वत्र भजे ॥698॥ ऐसा जो भक्तु होये । तयाचें त्रिधातुक हें जैं जाये । तैं मीचि होउनि ठाये । पांडवा गा ॥699॥ ऐसें जगदुदरदोंदिलें । तेणें करुणारसरसाळें । संजयो म्हणे बोलिलें । श्रीकृष्णदेवें ॥700॥ ययावरी तो पांडुकुमरु । जाहला आनंदसंपदा थोरु । आणि कृष्णचरणचतुरु । एक तो जगीं ॥701॥ तेणें देवाचिया दोनही मूर्ती । निकिया न्याहाळिलिया चित्तीं । तंव विश्वरूपाहूनि कृष्णाकृतीं । देखिला लाभु ॥702॥ परि तयाचिये जाणिवे । मानु न कीजेचि देवें । जें व्यापकाहूनि नव्हे । एकदेशी ॥703॥ हेंचि समर्थावयालागीं । एक दोन चांगी । उपपत्ती शारङ्गी । दाविता जाहला ॥704॥ तिया ऐकोनि सुभद्राकांतु । चित्तीं आहे म्हणतु । तरी होय बरवें दोन्हींआंतु । तें पुढती पुसों ॥705॥ ऐसा आलोचु करूनि जीवीं । आतां पुसती वोज बरवी । आदरील ते परिसावी । पुढां कथा ॥706॥ प्रांजळ ओंवीप्रबंधें । गोष्टी सांगिजेल विनोदें । निवृत्तीपादप्रसादें । ज्ञानदेवो म्हणे ॥707॥ भरोनि सद्भावाची अंजुळी । मियां वोंवियाफूलें मोकळीं । अर्पिली अंघ्रियुगुलीं । विश्वरूपाचां ॥708॥
॥ अकरावा अध्याय समाप्त ॥
हेही वाचा – Dnyaneshwari : अगा आंधळिया अर्जुना, हाता आलिया मेरूही होय साना
अर्थ
हे पांडवा, जो मत्प्रीत्यर्थ कर्म करणारा, मीच ज्यांचे प्राप्तव्य आहे, असा माझा भक्त, संसारसंगरहित, कोणाही भूतांशी वैर नसलेला असा तो (पुरुष) मजप्रत येतो. ॥55॥
जो (भक्त) माझ्या एकट्याकरिताच शरीराने कर्मे आचरतो आणि ज्याला जगामध्ये माझ्यावाचून दुसरे काही चांगले नाही,॥696॥ ज्याचा इहपरलोक, हे सर्व केवळ मीच होऊन राहिलो आहे आणि ज्याने आपले जगण्याचे प्रयोजन माझीच प्राप्ती होणे, हेच ठरविले आहे, ॥697॥ तो, भूतें ही भाषा विसरला, कारण त्याच्या दृष्टीला माझ्याशिवाय दुसरा विषय नाही; म्हणून तो निर्वैर झाला असता, तो सर्व ठिकाणी मला ओळखून माझी भक्ती करतो. ॥698॥ अरे अर्जुना, असा जो भक्त आहे, त्याचे हे शरीर ज्या वेळी पडते, त्यावेळी तो मीच होऊन राहतो. ॥699॥ उदरामध्ये जगत् असल्यामुळे दोंदिल झालेले आणि करुणेच्या रसाने रसाळ, असे जे श्रीकृष्णदेव, ते याप्रमाणे बोलले, असे संजय (धृतराष्ट्रास) म्हणाला. ॥700॥ याप्रमाणे श्रीकृष्ण बोलल्यानंतर तो अर्जुन आनंदरूपी धनाने थोर झाला; कारण श्रीकृष्णाच्या चरणांचे सेवन करण्यात जगामध्ये तोच एक चतुर होता. ॥701॥ त्याने देवाच्या दोन्ही मूर्ती चित्तामध्ये चांगल्या न्याहाळून पाहिल्या, तेव्हा विश्वरूपापेक्षा कृष्णाच्या रूपामध्ये फायदा आहे, असे त्यास आढळून आले. ॥702॥ परंतु त्याच्या या समजुतीला देवाने मान दिला नाहीच, कारण व्यापक रूपापेक्षा (विश्वरूपापेक्षा) एकदेशी रूप (चतुर्भुज रूप) बरे नव्हे, असे श्रीकृष्ण म्हणाले. ॥703॥ आणि याच (चतुर्भुज) रूपापेक्षा विश्वरूप बरे, ही गोष्ट स्थापित करण्याकरिता एक दोन चांगल्या युक्ती श्रीकृष्णांनी दाखविल्या. ॥704॥ त्या युक्ती ऐकून अर्जुन मनात म्हणतो, या दोन्ही रूपांमध्ये कोणते बरे आहे, ते देवाला आता यापुढे विचारू. ॥705॥ याप्रमाणे मनात विचार करून आता तो प्रश्न विचारण्याचा चांगला प्रकार स्वीकारील, ती कथा पुढे आहे, ती ऐकावी. ॥706॥ निवृत्तिनाथांच्या पायांच्या कृपेने ती कथा सोप्या अशा ओवी छंदात मजेने सांगता येईल, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ॥707॥ मी शुद्ध भावनारूप ओंजळीत ही ओव्यांरूपी मोकळी फुले भरून विश्वरूपाच्या दोन्ही पायांवर अर्पण केली, (असे ज्ञानदेव म्हणतात). ॥708॥
॥ अकरावा अध्याय समाप्त ॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : कां उदय न कीजे तेजाकारें, तंव गगनचि होऊनि असे आंधारें


