सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
तैसा मी एकीचि परी । आंतुडें मा अवधारीं । जरी भक्ति येउनि वरी । चित्तातें गा ॥685॥
भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन । ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप ॥54॥
परि तेचि भक्ति ऐसी । पर्जन्याची सुटिका जैसी । धरावांचूनि अनारिसी । गतीचि नेणे ॥686॥ कां सकळ जळसंपत्ती । घेऊनि समुद्रातें गिंवसिती । गंगा जैसी अनन्यगती । मिळालीचि मिळे ॥687॥ तैसे सर्वभावसंभारें । न धरत प्रेम एकसरें । मजमाजीं संचरे । मीचि होऊनि ॥688॥ आणि तेवींचि मी ऐसा । थडिये माझारीं सरिसा । क्षीराब्धि कां जैसा । क्षीराचाचि ॥689॥ तैसें मजलागुनि मुंगीवरी । किंबहुना चराचरीं । भजनासि कां दुसरी । भ्रांति नाहीं ॥690॥ तयाचि क्षणासवें । एवंविध मी जाणवें । जाणितला तरी स्वभावें । दृष्ट होय ॥691॥ मग इंधनीं अग्नि उद्दीपे । आणि इंधन हे भाष हारपे । तें अग्निचि होऊनि आरोपे । मूर्त जेवीं ॥692॥ कां उदय न कीजे तेजाकारें । तंव गगनचि होऊनि असे आंधारें । मग उदेलियां एकसरें । प्रकाशु होय ॥693॥ तैसें माझां साक्षात्कारीं । सरे अहंकाराची वारी । अहंकारलोपीं अवधारीं । द्वैत जाय ॥694॥ मग मी तो हें आघवें । एक मीचि आथी स्वभावें । किंबहुना सामावे । समरसें तो ॥695॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जी विश्वरूपाचां सागरीं, होतों तरंग मवित वांवेवरी
अर्थ
(तू ज्या विस्ताराने मला पाहिलेस,) तसाच मी एकाच प्रकाराने (मार्गाने) पाहावयास सापडतो आणि तो प्रकार हाच की, जर भक्ती येऊन चित्ताला वरील (तरच मी पाहावयास सापडतो), हे लक्षात ठेव. ॥685॥
पण हे अर्जुना, अशा स्वरूपाचा जो मी, त्या मला हे (अनन्य भक्तीच्या योगानेच) तत्वत: जाणणे, पाहाणे आणि माझ्यामध्ये लीन होणे शक्य आहे. ॥54॥
परंतु तीच भक्ती अशी की, पावसाच्या वृष्टीस पृथ्वीवाचून जशी निराळी गतीच ठाऊक नसते, तशी (म्हणजे त्या भक्तीला मजवाचून दुसरा विषयच नाही अशी), ॥686॥ अथवा सर्व जलरूप संपत्ती घेऊन भागीरथी जशी समुद्राचा शोध करीत करीत एकनिष्ठेने समुद्रास मिळून, पुन्हा मिळतच आहे, ॥687॥ त्याप्रमाणे सर्व भावांच्या समुदायासह अनावर प्रेम मद्रूप होऊन, एकसारखे माझ्यामध्ये प्रवेश करते. ॥688॥ आणि क्षीरसमुद्र जसा काठावर आणि मधेही एकसारखा दूधमयच असतो, त्याचप्रमाणे मी सारखा सर्वव्यापी आहे. ॥689॥ त्याप्रमाणे माझ्यापासून तो मुंगीपर्यंत, फार काय सांगावे?, सर्व स्थावर-जंगमात्मक जगामध्ये भजनाला माझ्याशिवाय दुसरे काही (नाही) याबद्दल शंकाच नाही. ॥690॥ (असे ज्यावेळी होईल) त्याच क्षणाबरोबर मी (भगवंत) विश्वरूप आहे असे कळेल, आणि असा मी समजल्यावर, साहजिक रीतीने मी तसा (विश्वरूप) दिसेन. ॥691॥ मग काष्ठात (घर्षणाने) अग्नी उत्पन्न झाल्यावर काष्ठ हा शब्द नाहीसा होऊन, ते काष्ठच जसे मूर्तिमंत अग्नी बनते, ॥692॥ अथवा जोपर्यंत सूर्याने उदय केला नाही, तोपर्यंत आकाशच अंधार होऊन असते, मग सूर्योदय झाल्यावर ते आकाशच एकसारखे प्रकाश होते. ॥693॥ त्याप्रमाणे माझे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर अहंकाराची येरझार संपते आणि अहंकाराचा नाश झाल्यावर द्वैत जाते, हे लक्षात ठेव. ॥694॥ मग मी, तो आणि सर्व (विश्व) हे एक मीच स्वभावत: आहे, फार काय सांगावे? तो ऐक्यभावाने माझ्यामध्ये सामावला जातो. ॥695॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : अगा आंधळिया अर्जुना, हाता आलिया मेरूही होय साना


