सुरेखा मोंडकर
‘लहान मुलं म्हणजे ओल्या मातीचा गोळा; आकार द्यावा तसा देता येतो,’ एका प्रतिभावान लेखकाने आपल्या सुप्रसिद्ध नाटकातील व्यक्तिरेखेच्या तोंडी दिलेलं हे वाक्य एखाद्या शिलालेखाप्रमाणे सर्वमान्य झालं. बरंचसं तथ्य आहे यात. पण प्रत्येक मातीच्या गोळ्याचा गणपती नाही घडवता येत. गणपती तयार करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारची, काही खास गुणधर्म असणारीच माती लागते. पण म्हणून काही त्या व्यतिरिक्त असणारी माती बिनकामाची असते; वाया जाते असं नाही. रांजण, पणती, वीट असे कितीतरी आकर्षक मनोवेधक प्रकार घडवता येतील… बगिचा फुलवता येईल. फक्त त्या घडविणाऱ्या हातांमध्ये कला हवी, बुद्धीमध्ये कल्पकता आणि हृदयात हवं प्रेम, अपार विश्वास त्या ओल्या मातीच्या गोळ्याबद्दल! गणपतीच झाला पाहिजे, हा हव्यास फक्त नातं बिघडवेल!
संस्कार या शब्दाचा आवाका खूप मोठा आहे, अर्थ व्यापक आहे. आपण रूढार्थाने व्यवहारात जो शब्द वापरतो त्यानुसार साधारणपणे असं म्हणता येईल की, ‘योग्य अयोग्य काय आहे, ते सांगणे, चुकल्यास दुरुस्त करणे – कृतीने किंवा संवादाने! चुका सुधारण्याची संधी देणे, गुणांचे वर्धापन आणि दोषांचे, दुर्गुणांचे निर्मूलन करणे, निदान त्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे संस्कारांचा मुक्काम गाठण्याची मार्गक्रमणा आहे. या रस्त्याने चालताना हे लक्षात ठेवायला हवं की, त्या विशिष्ट दुर्गुणाचा आपल्याला तिटकारा आहे; त्या संपूर्ण व्यक्तीचा नाही.
संपूर्ण पांढरा कागद म्हणजे चित्र होत नाही. त्यावर विविध रंग लिंपल्यावर चित्र तयार होतं. माणसाचं पण तसंच आहे. संपूर्ण गुणांनी भारलेला माणूस नसतो. प्रत्येक माणसात गुण दोषांचं अनाकलनीय असं मिश्रण असतं. त्यात गुण जास्त असावेत आणि दुर्गुण कमी असावेत ही सुसंस्कारांकडून अपेक्षा. सर्वगुणसंपन्न व्यक्ती अशक्यप्राय आहे. मुल अनुकरणशील असतं, टिपकागदासारखं असतं; त्याच्या आजूबाजूला जे घडत असतं त्याला जीवनात जे अनुभवायला मिळतं किंवा भोगावं लागतं त्यातून ते व्यक्ती म्हणून घडत जातं. म्हणूनच ज्येष्ठ पांडव, सूर्यपुत्र असूनही महारथी कर्ण इतर पांडवांपेक्षा वेगळा.
हेही वाचा – संस्कार आणि स्त्रिया
मुल गर्भात असल्यापासून ते संस्कार टिपत असतं. म्हणूनच आपण गर्भवतीला आनंदी ठेवायला धडपडतो. तिने पौष्टिक खावं-प्यावं, दर्जेदार वाचावं, संगीत ऐकावं, विविध कलांचा आस्वाद घ्यावा… एकंदरीत प्रसन्न आणि अभिरुचीसंपन्न असावं हा प्रयत्न करतो. उत्तरेच्या पोटात असतानाच चक्रव्यूहात शिरण्याचं ज्ञान मिळवणारा अभिमन्यू आपल्या कायम लक्षात असतो. मुल लहान असताना सर्वात जास्त संस्कारक्षम असतं, हे खरं आहे; पण इच्छा असल्यास कोणत्याही वयात आपल्याला स्वप्रयत्नाने संस्कारित बनता येतं. शिकवून येत नाही, त्यासाठी आतून शिकायची एक तीव्र उर्मी लागते.
लहान मुलांची ग्रहणशक्ती उत्तम असते म्हणून ते पटापट चांगलं वाईट, जे मिळेल ते टिपत जातं. त्याला नाविन्याचीपण हौस असते. ‘नवं ते हवं’ या वृत्तीतूनच ते शिव्या पण शिकतं. आता चाळीशीत असणारा माझा मुलगा कधीही, कितीही चिडलेला, रागावलेला असतानाही, अगदी गाडी चालवतानाही शिव्या देत नाही. त्याबद्दल त्याचं कौतुक करत होते. तेव्हा तो म्हणाला, “तुला आठवतंय मी लहान असताना एक खूप घाणेरडी शिवी द्यायचो. तेव्हा, हा वाईट शब्द आहे… याला शिवी म्हणतात आणि तो बोलताना वापरायचा नसतो, हे तू मला दोन-चारदा सांगितलं होतंस. पण मी ती शिवी द्यायचोच. एकदा मी शिवी दिल्यावर तू पण त्याच स्वरात, तेवढ्याच रागाने ती शिवी उच्चारलीस! मी सर्द झालो, तेव्हा मला कळलं ऐकणाऱ्याला शिवी किती भयानकरित्या खुपते आणि शिव्या देणारी व्यक्ती किती विद्रूप वाटते, नजरेतून किती उतरते. तेव्हापासून मी कधीच शिव्या दिल्या नाहीत.”
हा प्रसंग घडला तेव्हा मुलगा ज्युनिअर केजीला होता. त्यानंतर त्याला मी हे देखील सांगितलं होतं की, “शिव्या मला पण माहिती आहेत. पण त्या वापरायच्या नसतात हे देखील मला माहिती आहे.” मुलांना चांगल्या गोष्टी वाईट, क्रूर पद्धतीने सांगायला जाऊ नये, त्यांना मारून, बडवून, ओरडून चांगलं कसं सांगता येणार? तेव्हा ते मुल ऐकण्याच्या मन:स्थितीत नसणार, ना स्वबचाव करीत असणार! आपल्या धाकामुळे जबरदस्तीने ते ऐकेल सुद्धा पण ज्या वयाला तो आपल्या वर्चस्वातून बाहेर पडेल, तेव्हा हे सर्व लादलेले संस्कार झुगारून देईल.
आणखीन एक मजा आहे, मुल कुठून काय शिकेल, ते सांगता येत नाही. अमेरिकेत जन्मलेल्या, मराठी बोलायला जरा अवघडणाऱ्या माझ्या अडीच वर्षांच्या नातवाने Washington DC International airport वर दणदणीत स्वरात “आयचा घो!” असं म्हणून आम्हा सर्वांना आ वासायला लावला होता. आम्ही शोध घेतल्यावर लक्षात आलं की, तो भारतात असताना टीव्हीवर, ‘शिक्षणाच्या आयचा घो’ हा चित्रपट आम्ही पाहिला होता, तेव्हा तोही आजूबाजूलाच होता.
व्यक्ती जरा चुकीचं वागली तर फटकन, प्रतिक्षिप्त क्रियेसारखं (Reflex Action) त्याला विचारलं जातं, “हेच शिकवलं का तुला आई बापाने?/ शाळेत हेच शिकवतात का?” लहान मुलांना असे विचारणारी मोठी माणसं कितपत संस्कारित मानायची? किंवा असंही होतं की, मुल काही अयोग्य वागलं तर पालक स्वत:ला दोष देतात… आपल्या पालकत्वात कुठे कमतरता राहिली, पालक म्हणून आपण कुठे चुकलो, पालक म्हणून आपण नालायक आहोत… असा अपराधभाव बाळगतात. ‘हेचि फल काय मम तपाला’ असं म्हणून हताश होतात.
हल्ली आई-वडील दोघेही नोकरी करीत असतील तर, मुल इतक्या विविध वातावरणात वाढत असतं की, सतत बदलत्या परिस्थितीला, वातावरणाला, समस्यांना, ताणतणावांना तोंड देता-देता, ते पण थकत असतं, गोंधळून जात असतं. पालकांनी आत्मपरीक्षण जरूर करावं, पण अपराधगंड बाळगून नैराश्याची वाट चालू नये. आपण जे आपल्या वागणुकीतून संस्कार देत असतो, ते सर्वार्थाने उचलायला प्रत्येक मुल सक्षम असेल असं नाही. प्रत्येकाची ग्रहणशक्ती, आकलनशक्ती, दृष्टिकोन वेगळा अन् त्यानुसारच ते स्वीकारणार. आपण आपली सहनशक्ती शाबूत ठेवून पेरत जायचं. कुठेना कुठे, कधीना कधी, काहीना काही उगवणारच! फुकट काही जात नाही, यावर विश्वास ठेवायचा.
चक्रधर स्वामींनी लीळाचरित्रात नेमका दृष्टांत दिला आहे. ते म्हणतात, “लहानुल्याला उलट्या होत असल्या तर, ‘हा काय सगळं ओकूनच टाकणार आहे,’ म्हणून आई त्याला अन्न देतच नाही का? ती त्याला थोडं थोडं काहीना काही भरवतच राहते, कारण ओकेल पण पोटात काहीतरी लिप्ताळा राहीलच.” आपणही हेच धोरण ठेवायचं आहे. आपल्या वर्तणुकीतून आपण जे जे सांगू पाहतोय, त्याचा लिप्ताळा कुठेना कुठे राहीलच. निराश नाही व्हायचं…
बाहेरून आल्यावर हातपाय धू… रोज आंघोळ कर… सकाळी आणि रात्री दात घास… हे सर्व शिकवत असताना, त्या मागचा मुलभूत उद्देश त्यांना समजावून सांगितला पाहिजे. म्हणजे शारीरिक स्वच्छता! संस्कार देताना मुलांना न आवडणारं अवडंबर, फाफटपसारा न करता त्यांना मूल्यं पटवून द्यायची आहेत. काळ कितीही बदलला तरी मूल्यं त्रिकालाबाधित आहेत. मानवता, प्रेम, औदार्य, संवेदनशीलता, कष्ट, अभ्यास, साधना, काटकसर, अनावश्यक खरेदी टाळणं, काही वाया न घालवणं, हार स्वीकारणं, नकार पचवायची तयारी ठेवणं, अपयशाचं रुपांतर निष्ठेने यशात करायचं… अशा अनेक अविचल गोष्टी सांगायच्या आहेत.
मोठ्या माणसांना वाकून नमस्कार करायचा, हे आमच्या पिढीने एक संस्कार म्हणून मान्य केलं. पण, दारू पिणाऱ्या, व्यसनं करणाऱ्या, शिवीगाळ करणाऱ्या, भ्रष्ट माणसाला नमस्कार का करायचा? केवळ तो वयाने मोठा आहे म्हणून? असं विचारतात. तेव्हा त्याला उर्मट, संस्कारहीन न मानता त्याच्या अभिव्यक्तीवर विचार करायला आपण शिकायला हवं किंवा त्याला पटेल असं तर्कशुद्ध उत्तर द्यायला हवं. कारण स्वयंनिर्णय, विचार करणं, पारखून घेणं हे सर्व आपणच त्यांना शिकवलेलं असतं नं! कोंबडं झाकून ठेवलं तरी उगवणारच आहे, हे आधी आपल्याला, मोठ्या माणसांना शिकायला हवं. खाण तशी माती असं म्हणतात, तसंच सूर्यापोटी शनैःश्वर पण म्हणतात. ‘हाथी चाले अपनी चाल…’ हेच सत्य मानून त्या खाणीतच हिरे मिळतात, त्या शनीला पण अफाट सामर्थ्य असतं हे लक्षात घेऊन मुलांना त्यांच्या संस्कारांच्या मिळकतीसाठी आत्मविश्वास द्यायचा.
प्रिया तेंडुलकर म्हणतात, ” बाबा, तुम्ही आम्हाला ज्या luxuries दिल्यात, त्या आता आमच्या गरजा झाल्या आहेत!” मुल पूर्ण व्यक्ती बनेपर्यंतच्या प्रवासात त्याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक पडणार आहे, या सत्याचा आपण मनापासून स्वीकार केला पाहिजे. व्यक्ती म्हणजे एक कॅलिडोस्कोप असतो, प्रत्येकाला, अनेकांना… प्रत्येक वेळी, अनेक वेळा एकाच व्यक्तीची अनेक रुपं दिसत असतात… अनुभवायला येत असतात. इथे पुन्हा चक्रधर स्वामींचा हत्तीचा दृष्टांत लागू पडतो. माणूस जसा दिसतो, कळतो त्याहून अनेक पट विशाल असतो. त्याच्या एखाद्या कृतीतून तो संस्कारी किंवा संस्कारहीन असा निष्कर्ष नाही काढता येणार.
हेही वाचा – संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!
काळ कसा आणि किती विकृतपणे बदलू शकतो, हे आज आपण अनुभवतो आहोत. हा आपल्याला वस्तुपाठ आहे. आपण सगळी मोठी माणसं खरंच संस्कारी आहोत का, की आपण गृहीत धरतो आहोत? आत्ता तीन-चार वर्षांत जन्माला आलेल्या मुलांना काळ कुठे कसा भिरकावणार आहे, आदळणार आहे, याची आपल्याला कल्पनापण करता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची चतुर नीती आपल्याला शिकावी आणि शिकवावी लागणार आहे. ‘शीर सलामत तो पगडी पचास’ ‘बचेंगे तो और भी लढेंगे”… आपली मूल्यं सांभाळून विचारा-आचारांची लवचिकता, तडजोड, वेळप्रसंगी झुकायची, लव्हाळ्याची वृत्ती ठेवायची! कारण महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळीं वाचती! तारेवरची कसरत आहे ही सगळी… पण जमतं हे सगळं मुलांना. Survival of the fittest… निसर्ग सुद्धा त्यांना तगायला, जगायाला मदत करत असतो.
मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा?
कोई न जाने अपना फ्युचर क्या होगा?
एक दिलासा आहेच,
कोई न जाने कल क्या होगा?
जो भी होगा अच्छा होगा!
यावर अविचल भरवसा ठेवायचा…
आपण वयाने मोठ्या असणाऱ्या माणसांनी आपले संस्कार दाखवून द्यायची वेळ आता आली आहे. जेवढं आपल्या आवाक्यात आहे, तेवढं तरी आपण करू शकतो. निदान आपल्या मुलांना तरी त्यांच्या लढाईत ‘मी आहे तुझ्याबरोबर, तुझ्या पाठीशी, तुझ्या साथीला. तू एकटा नाहीस एवढा दिलासा देऊ शकतो!
तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची
पर्वाही कुणाची!”
हा विश्वास देऊ शकतो.


