सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
मा ते व्यथा मा च विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमीदृङ्ममेदम् । व्यपेतभीः प्रीतमनाः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य ॥49॥
म्हणोनि विश्वरूपलाभें श्लाघ । एथिचें भय नेघ नेघ । हें वांचूनि चांग । न मनीं कांहीं ॥623॥ हां गा समुद्रु अमृताचा भरला । आणि अवसांत वरपडा जाहला । मग कोणीही आथि वोसंडिला । बुडिजेल म्हणोनि ॥624॥ नातरी सोनयाचा डोंगरु । येसणा न चले हा थोरु । ऐसें म्हणोनि अव्हेरु । करणें घडे ॥625॥ दैवें चिंतामणि लेईजे । कीं हें ओझें म्हणोनि सांडिजे । कामधेनु दवडिजे । न पोसवे म्हणोनि ॥626॥ चंद्रमा आलिया घरा । म्हणिजे निगे करितोसि उबारा । पडिसायि पाडितोसि दिनकरा । परता सर ॥627॥ तैसें ऐश्वर्य हें महातेज । आजि हातां आलें आहे सहज । कीं एथ तुज गजबज । होआवी कां ॥628॥ परी नेणसीच गांवढिया । काय कोपों आतां धनंजया । आंग सांडोनि छाया । आलिंगितोसि मा ॥629॥ हें नव्हे जो मी साचें । एथ मन करुनियां काचें । प्रेम धरिसी अवगणियेचें । चतुर्भुज जें ॥630॥ तरि आझुनिवरी पार्था । सांडीं सांडीं हे व्यवस्था । इयेविषयीं आस्था । करिसी झणें ॥631॥ हें रूप जरी घोर । विकृति आणी थोर । तरी कृतनिश्चयाचें घर । हेंचि करीं ॥632॥ कृपण चित्तवृत्ति जैसी । रोवोनि घाली ठेवयापासीं । मग नुसधेनि देहेंसीं । आपण असे ॥633॥ कां अजातपक्षिया जवळा । जीव बैसवूनि अविसाळां । पक्षिणी अंतराळा- । माजीं जाय ॥634॥ नाना गाय चरे डोंगरीं । परि चित्त बांधिलें वत्सें घरीं । तैसें प्रेम एथिंचें करीं । स्थानपती ॥635॥ येरें वरिचिलेनि चित्तें । बाह्यसख्य सुखापुरतें । भोगिजो कां श्रीमूर्तींतें । चतुर्भुज ॥636॥ परि पुढतपुढती पांडवा । हा एक बोलु न विसरावा । जे इये स्वरूपौनि सद्भावा । नेदावें निघों ॥637॥
हेही वाचा – Dnyaneshwari : हे विश्वरूपाचे सोहळे भोगूनि निवाले जी डोळे
अर्थ
हे माझे अशा प्रकारचे भयानक रूप पाहून तू व्याकुळ होऊ नकोस, तू भ्रांतचित्त होऊ नकोस. गतभय आणि प्रीतियुक्त अंत:करणाचा होऊन पुन्हा तू ते माझे पूर्वीचेच रूप पाहा. ॥49॥
म्हणून विश्वरूपप्राप्तीने तू आपल्याला धन्य समज आणि या विश्वरूपाची भीती मुळीच बाळगू नकोस. या विश्वरूपावाचून काही चांगले मानू नकोस. ॥623॥ अरे अर्जुना, प्रत्यक्ष अमृताचा समुद्र भरलेला असला आणि अकस्मात कोणी तेथे प्राप्त झाला; मग आपण यात बुडून मरून जाऊ, म्हणून कोणीतरी त्याचा त्याग केला आहे काय? ॥624॥ अथवा (एखादा मनुष्य सोन्याच्या डोंगराजवळ प्राप्त झाला असता) हा एवढा मोठा सोन्याचा डोंगर ‘आपल्याला नेता येत नाही,’ असे म्हणून त्याचा त्याग करणे घडेल काय? ॥625॥ दैवयोगाने चिंतामणी नावाचे रत्न अंगावर धारण करावे आणि ते ओझे म्हणून ज्याप्रमाणे टाकून द्यावे, किंवा आपल्याला पोसवत नाही म्हणून (ज्याप्रमाणे) कामधेनू हाकून द्यावी; ॥626॥ चंद्र आपल्या घरी आला असता ‘तुझ्या योगाने उष्मा होतो’ म्हणून त्याला ज्याप्रमाणे ‘तू चालता हो’ असे म्हणावे अथवा ‘तू सावली पाडतोस म्हणून पलीकडे जा,’ असे सूर्यास जसे म्हणावे, ॥627॥ त्याप्रमाणे हे महातेजरूपी (विश्वरूपी) ऐश्वर्य आज तुझ्या हाती सहज आले आहे. असे असून येथे तुझी कासाविशी का व्हावी? ॥628॥ परंतु हे अडाण्या, तुला काही कळत नाही. अर्जुना, आता तुझ्यावर काय रागवायचे आहे! प्रत्यक्ष अंग सोडून तू पडछायेला आलिंगन तो देतो आहेस, नव्हे काय? ॥629॥ विश्वरूप हे माझे खरे रूप नाही काय? पण त्या ठिकाणी मन साशंक करून क्षुल्लक असे जे चतुर्भुजरूप त्या ठिकाणी तू प्रेम धरतोस, हे बरे नाही! ॥630॥ तर अर्जुना, अजूनपर्यंत तरी हे तुझे ठरलेले मत (विश्वरूप हे भयंकर रूप आहे आणि चतुर्भुजरूप हे सुंदर आहे) टाकून दे. या सगुण रूपाविषयी आस्था (प्रेम) कदाचित करशील तर करू नकोस. ॥631॥ हे विश्वरूप जरी भयंकर अक्राळविक्राळ आणि अवाढव्य असे आहे, तरी (चतुर्भुज रूपापेक्षा) हे विश्वरूप माझे खरे रूप असल्याकारणाने हेच खरे आहे, असा तू पक्का निश्चय कर. ॥632॥ कंजूष मनुष्य आपले सर्व लक्ष ज्याप्रमाणे आपण पुरून ठेवलेल्या द्रव्याच्या साठ्यापाशी जखडलेले ठेवतो आणि मग केवळ देहाने आपले इतर सर्व व्यवहार करीत असतो. ॥633॥ किंवा पंख न फुटलेल्या पिलांच्या जवळ त्या घरट्यात, आपला सर्व जीव ठेऊन त्या पिलांची आई (पक्षीण) जशी आकाशात संचार करण्याकरिता जाते, ॥634॥ अथवा गाय डोंगरात चरत असते, परंतु तिचे सर्व लक्ष घरी आपल्या वासरावर अडकून राहिलेले असते, त्याप्रमाणे या (विश्वरूप) ठिकाणचे तू आपले प्रेम मालक कर. ॥635॥ बाकी वरवर बाह्यात्कारी मनाने बाहेरच्या मैत्रीच्या सुखापर्यंत आमच्या चतुर्भुज श्यामसुंदर मूर्तीचा उपभोग घे. ॥636॥ परंतु अर्जुना, या विश्वरूपापासून आपल्या सद्भावास दुसरीकडे कोठे जाऊ देऊ नकोस. एवढे आमचे एक सांगणे तू विसरू नयेस, हेच तुला वारंवार सांगणे आहे. ॥637॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : तें हें तुवां अनायासें, विश्वरूप देखिलें जैसें


