सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
पैं चराचर विनोदें पाहिजे । मग तेणें सुखें घरीं राहिजे । तैसें चतुर्भुज रूप तुझें । तो विसावा आम्हां ॥594॥ आम्हीं योगजात अभ्यासावें । तेणें याचि अनुभवा यावें । शास्त्रांतें आलोडावें । परि सिद्धांतु तो हाचि ॥595॥ आम्हीं यजनें किजती सकळें । परि तियें फळावीं येणेंचि फळें । तीर्थें होतु सकळें । याचिलागीं ॥596॥ आणीकही कांहीं जें जें । दान पुण्य आम्हीं कीजे । तया फळीं फळ हेंचि तुझें । चतुर्भुज रूप ॥597॥ ऐसी तेथिंची जीवा आवडी । म्हणोनि तेंचि देखावया लवडसवडी । वर्तत असे ते सांकडी । फेडीं वेगां ॥598॥ अगा जीवींचें जाणतेया । सकळ विश्ववसवितेया । प्रसन्न होईं पूजितया । देवांचिया देवा ॥599॥
किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव । तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते ॥46॥
कैसें नीलोत्पलातें रांवित । आकाशाही रंगु लावित । तेजाची वोज दावित । इंद्रनीळा ॥600॥ जैसा परिमळ जाहला मरगजा । कां आनंदासीचिं निघालिया भुजा । ज्याचें जानुवरी मकरध्वजा । जोडली बरव ॥601॥ मस्तकीं मुकुटातें ठेविलें । कीं मुकुटा मुकुट मस्तक झालें । शृंगारा लेणें लाधलें । आंगाचेनि जया ॥602॥ इंद्रधनुष्याचिये आडणी । माजीं मेघ गगनरंगणीं । तैसें आवरिलें शारङ्गपाणी । वैजयंतिया ॥603॥ कवणी ते उदार गदा । असुरां देत कैवल्य सदा । कैसें चक्र हन गोविंदा । सौम्यतेजें मिरवे ॥604॥ किंबहुना स्वामी । तें देखावया उत्कंठित पां मी । म्हणोनि आतां तुम्हीं । तैसया होआवें ॥605॥ हे विश्वरूपाचे सोहळे । भोगूनि निवाले जी डोळे । आतां होताति आधले । कृष्णमूर्तीलागीं ॥606॥ तें साकार कृष्णरूपडें । वांचूनि पाहों नावडे । तें न देखतां थोडें । मानिताती हे ॥607॥ आम्हां भोगमोक्षाचां ठायीं । श्रीमूर्तीवांचूनि नाहीं । म्हणोनि तैसाचि साकारु होईं । हें सांवरीं आतां ॥608॥
हेही वाचा – Dnyaneshwari : पुत्राचे अपराध, जरी जाहले अगाध
अर्थ
स्थावर-जंगमात्मक जग मजेने हिंडून पाहावे (आणि त्या हिंडण्यात बर्याचशा हालअपेष्टा भोगल्यावर), घरी सुखाने विश्रांती घेत राहावे, त्याप्रमाणे (तुझे अफाट विश्वरूप पाहिल्यानंतर) तुझे श्यामसुंदर चतुर्भुज रूप आम्हास विश्रांतीची जागा आहे. ॥594॥ आम्ही योगमात्राचा अभ्यास करावा आणि त्यायोगाने याच अनुभावाला (तुझे श्यामसुंदर चतुर्भुजरूप) यावे. आम्ही शास्त्रांचा अभ्यास करावा, परंतु शास्त्रांचा सिद्धांत हाच (चतुर्भुजरूप) आहे. ॥595॥ आम्ही सर्व यज्ञ करावेत, परंतु याचे फळ (चतुर्भुजरूप) हेच मिळावे. आमच्या सर्व तीर्थयात्रा याचकरिता असोत. ॥596॥ आणखी जे जे काही दानपुण्य आम्ही करू, त्याच्या फळाच्या ठिकाणी तुझे चतुर्भुजरूप हेच फळ होय. ॥597॥ याप्रमाणे त्या चतुर्भुजरूपाची आवड आहे; म्हणून तेच पहाण्याकरिता लगबग आहे. ती अडचण (तळमळ) आपण लवकर दूर करा. ॥598॥ हे अंत:करणातील सर्व गोष्टी जाणणार्या देवा, सर्व विश्व वसविणार्या देवा, आणि भजले जाणारे जे देव, त्या देवांच्या देवा, मला प्रसन्न हो. ॥599॥
किरीट धारण करणाऱ्या, गदा धारण करणाऱ्या, हातामध्ये चक्र धारण करणाऱ्या अशाच तुला पाहण्याची माझी इच्छा आहे. हे सहस्रबाहो, हे विश्वरूपधारिन्, तू पुन्हा तेच चतुर्भुज स्वरूप धारण कर. ॥46॥
त्या चतुर्भुज श्यामसुंदर रूपाचा नीलवर्ण कसा निळ्या कमळाला रंगविणारा, आकाशासही (निळा) रंग देणारा आणि इंद्रनील नावाच्या रत्नाला निळ्या रंगाचे तेज (प्रकाश) दाखवणारा आहे! ॥600॥ ज्याप्रमाणे पाचूच्या रत्नास सुगंध उत्पन्न व्हावा अथवा आनंदासच हात फुटावेत, (त्याप्रमाणे भगवंताचे शरीर शोभत होते). ज्याच्या गुडघ्यांचा आश्रय केल्यामुळे (ज्याचा मुलगा होऊन मांडीवर खेळल्यामुळे) मदनास सौंदर्य प्राप्त झाले ॥601॥ प्रभूंनी मुकुटाला मस्तकावर ठेवल्यामुळे त्या मुकुटाला भगवंताचे मस्तक मुकुट झाले (म्हणजे भगवंताच्या मस्तकाने मुकुटाला शोभा आली) आणि ज्या भागवंताच्या शरीराने शृंगारास (वस्रे, अलंकार इत्यादिकांस) अलंकार (शोभा) प्राप्त झाला. ॥602॥ आकाशमंडळात इंद्रधनुष्याच्या वर्तुळात जसा मेघ आवरलेला असतो, त्याप्रमाणे वैजयंती माळेने श्रीकृष्ण आवरले गेले. ॥603॥ कशी ती उदार गदा! की जी गदा असुरांना नेहेमी मोक्षपदाला नेते! गोविंदा, तुमचे सुदर्शनचक्र खरोखर सौम्य तेजाने कसे शोभत आहे! ॥604॥ फार काय सांगावे? महाराज, ते आपले चतुर्भुज श्यामसुंदर रूप पाहाण्यास मी उत्सुक आहे, म्हणून आता आपण (हे प्रचंड विश्वरूप आवरून) ते चतुर्भुज रूप धारण करावे. ॥605॥ महाराज, हे विश्वरूपाचे सोहळे भोगून माझे डोळे शांत झाले. आता ते (डोळे) श्रीकृष्णमूर्ती पहाण्याकरिता अत्यंत उत्सुक होत आहेत. ॥606॥ या डोळ्यांस त्या सगुण कृष्णमूर्तीशिवाय इतर काही पाहणे आवडत नाही. ते सगुणस्वरूप यास पाहावयास मिळाले नाही, तर या विश्वरूपाची माझ्या डोळ्यांना काही किंमत वाटत नाही. ॥607॥ आम्हाला (ऐहिक आणि पारलौकिक) भोगाच्या ठिकाणी (फार काय सांगावे!) मोक्षाच्या (देखील) ठिकाणी श्यामसुंदर मूर्तीवाचून दुसरे काही नाही. म्हणून देवा, आता तू तसाच (चतुर्भुज) हो आणि हे विश्वरूप आटोप. ॥608॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जी कल्पादीलागोनी, आजिची घडी धरुनी


