सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
जी कोण्ही एके वेळे । सरिता घेउनि येती खडुळें । तियें सामाविजेति सिंधुजळें । आन उपायो नाहीं ॥557॥ तैसीं प्रीती कां प्रमादें । देवेंसीं मज विरुद्धें । बोलविलीं तियें मुकुंदें । उपसाहावीं जी ॥558॥ आणि देवाचेनि क्षमत्वें क्षमा । आधारु जाली आहे या भूतग्रामा । म्हणोनि पुरुषोत्तमा । विनंवू तें थोडें ॥559॥ तरि आतां अप्रमेया । मज शरणागता आपुलिया । क्षमा कीजो की यया । अपराधांसी ॥560॥
पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् । न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव ॥43॥
जी जाणितलें मियां साचें । महिमान आतां देवाचें । देवो होय चराचराचें । जन्मस्थान ॥561॥ हरिहरादि समस्तां । देवा तूं परम देवता । वेदांतेंही पढविता । आदिगुरु तूं ॥562॥ गंभीर तूं श्रीरामा । नानाभूतैकसमा । सकळगुणीं अप्रतिमा । अद्वितीया ॥563॥ तुजसी नाहीं सरिसें । हें प्रतिपादनचि कायसें । तुवां जालेनि आकाशें । सामाविलें जग ॥564॥ तया तुझेनि पाडें दुजें । ऐसें बोलतांचि लाजिजे । तेथ अधिकाची कीजे । गोठी केवीं ॥565॥ म्हणोनि त्रिभुवनीं तूं एकु । तुजसरिसा ना अधिकु । तुझा महिमा अलौकिकु । नेणिजे वानूं ॥566॥
तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीशमीड्यम् । पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम् ॥44॥
ऐसें अर्जुनें म्हणितलें । मग पुढती दंडवत घातलें । तेथें सात्त्विकाचें आलें । भरतें तया ॥567॥ मग म्हणतसे प्रसीद प्रसीद । वाचा होतसे सद्गद । काढीं जी अपराध- । समुद्रौनि मातें ॥568॥
हेही वाचा – Dnyaneshwari : परि ऐसिया तूतें स्वामी, कहींच नेणों जी आम्ही
अर्थ
महाराज, कोणत्याही एखाद्या वेळी जेव्हा नद्या गढूळ पाण्याचे लोट घेऊन येतात, तेव्हा समुद्राच्या पाण्याने त्या गढूळ पाण्याच्या लोटास आपल्या पोटात सामाविले पाहिजे, त्यास दुसरा उपाय नाही. ॥557॥ त्याप्रमाणे प्रीतीने अथवा चुकीने माझ्याकडून देवाला जी विरुद्ध भाषणे बोलली गेली, हे श्रीकृष्णा, ती तू सर्व सहन करावीस, ॥558॥ आणि हे देवा, तुझ्याच क्षमावान् स्वभावामुळे पृथ्वी या प्राणिमात्रास धारण करणारी झाली आहे. म्हणून श्रीकृष्णा तुला विनंती करावी तितकी थोडीच आहे. ॥559॥ तरी आता हे अगम्या श्रीकृष्णा, मी जो आपल्याला शरण आलो आहे, त्या मला या अपराधाची क्षमा करावी. ॥560॥
या चराचर जगाचा तू पिता आहेस, अत्यंत पूज्य आणि श्रेष्ठ असा (या जगाचा) गुरू आहेस. हे अप्रतिमप्रभावा, (स्वर्ग, मृत्यू, पाताळ या) तिन्ही लोकांमध्ये देखील तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही, मग तुझ्यापेक्षा अधिक कोठून असणार? ॥43॥
महाराज, आता मी तुझे यथार्थ माहात्म्य जाणले. हे परमात्म्या, तू स्थावर-जंगमात्मक जगाचे उत्पत्तिस्थान आहेस. ॥561॥ देवा! विष्णू, शंकर इत्यादी दैवतांचा तू श्रेष्ठ देव आहेस आणि वेदांनाही शहाणपणा शिकविणारा मूळ गुरू तू आहेस. ॥562॥ हे श्रीकृष्णा, तू फार गंभीर अंत:करणाचा आहेस आणि तू सर्व प्राण्यांत सारखा आहेस. तू सर्व गुणांमध्ये बिनजोड आहेस आणि तुझ्यासारखे दुसरे कोणीही नाही. ॥563॥ तुझ्या बरोबरीचे कोणी नाही, हे सांगावयास कशाला पाहिजे? तुझ्यापासून झालेल्या आकाशात सर्व जग सामावले आहे. ॥564॥ त्या तुझ्या बरोबरीला दुसरा काही पदार्थ आहे, असे बोलण्याची लाज वाटावयास पाहिजे. अशा प्रसंगात तुझ्याहून कोणी मोठे आहे, असे म्हणण्याची गोष्टच कशाला पाहिजे? ॥565॥ म्हणूनच या सर्व त्रिभुवनात (नाव घेण्यासारखा) तू एकच आहेस. तुझ्या तोडीचा दुसरा कोणी नाही आणि तुझ्यापेक्षा अधिक कोणी नाही. तुझे माहात्म्य खरोखर लोकोत्तर आहे. त्याचे वर्णन कसे करावे, ते समजत नाही. ॥566॥
यास्तव, जगताचा स्वामी आणि स्तवन करण्यास योग्य अशा तुला मी दंडवत घालून, नमस्कार करतो (आणि प्रार्थना करतो); प्रसन्न हो! हे देवा, पिता ज्याप्रमाणे पुत्राचे, मित्र ज्याप्रमाणे मित्राचे, प्रियजन ज्याप्रमाणे प्रियजनांचे (अपराध सहन करतो) त्याप्रमाणे माझे अपराध तू कृपा करून सहन करावेस (पोटात घालवेस). ॥44॥
याप्रमाणे अर्जुनाने भाषण केले आणि नंतर देवास साष्टांग नमस्कार केला. त्यावेळी त्याच्यात अष्टसात्विक भाव भरून आले. ॥567॥ मग त्याची वाचा सगद्गदित होऊन तो म्हणावयास लागला, “प्रसन्न हो, प्रसन्न हो”. देवा मला अपराधरूपी समुद्रातून वर काढ. ॥568॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : ‘कृष्णा’ म्हणोनि हाकारिजे, यादवपणें तूतें लेखिजे


