यावर्षी उन्हाळा खूपच म्हणजे खूपच जास्त जाणवतो आहे. उन्हात फिरल्यामुळे बऱ्याच जणांना छोटे मोठे आजार होत आहेत, त्रास होत आहेत. ऑटो करून बाहेर पडलो तरी उन्हाच्या झळा लागतात आणि उन्हाचा त्रास हा होतोच होतो. ऊन मी म्हणतयं म्हणजे ऊन कमी व्हायला तयार नाही. अशा वेळेस आपण पण मी म्हणायचं, म्हणजे मी पण उन्हापासून बचावाकरता काहीतरी मार्ग काढीनच!
सर्व जाणकार आणि तज्ज्ञ मंडळी सांगत आहेत की, सध्या तरी 25 मेपर्यंत दुपारी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घराबाहेर पडूच नका. ज्यांचा व्यवसायच बाहेर फिरून काम करणे आहे, त्यांना तर पर्यायच नाही; पण इतर मंडळी मात्र दुपारी बाहेर जाणे नक्कीच टाळू शकतात. ऑफिसच्या कामाकरिता / क्लासेस करिता ऑनलाइन पद्धत पण उपलब्ध आहे. तसा काही पर्यायाचा विचार करता येऊ शकतो.
‘पुणे तिथे काय उणे’ या म्हणीप्रमाणे पुणेकरांना दुपारी बाहेर न पडणे वगैरे मान्य नसते. कुणाचे लग्नाचे वाढदिवस, कुणाची पंचाहत्तरी, कुणी परदेशातून आले म्हणून त्यांच्या स्वागताकरिता पार्टी, रिडेव्हलपमेंटनंतर नवीन घर मिळाले त्याबद्दल वास्तुशांती कार्यक्रम वगैरे वगैरे असे समारंभ अजूनही पुण्यामध्ये भरदुपारी हॉटेलमध्ये होत असतात. हा समारंभ आणि जेवणाची वेळ दुपारी एक वाजता असते. तर दुसरीकडे, निमंत्रित सगळीच मंडळी असे कार्यक्रम वरचेवर अटेंड करत असतात… ‘ऊन आहे, असे कारण सांगून नाही कसं म्हणणार,’ अशी सगळ्यांना अडचण असते.
आज सकाळीच एका मित्राला सहज गप्पा मारायला फोन केला होता.
मी : नमस्कार, काय चाललंय? उन्हापासून काळजी घे. दुपारी बाहेर पडू नकोस.
मित्र : अरे, मी श्रेयस हॉटेलमध्ये काल आणि आज असे दोन दिवस राहायला आलोय.
मी : पुण्यात तुझं घर असून हॉटेलमध्ये! हा काय नवीन प्रकार आहे?
मित्र : अरे, बायकोच्या मैत्रिणीच्या जावयाला मोठ्या पोस्टवर प्रमोशन मिळालं आहे, त्यानिमित्त ओळखीचे आणि नातेवाईक यांना आज पार्टी आहे. डेक्कनवर याच श्रेयस हॉटेलमध्ये. दुपारी 12 ते 3 वेळ आहे.
हेही वाचा – असाही ड्राय-डे! तुम्ही सहमत आहात?
मी : पण तू दोन दिवस हॉटेलमध्ये का आहेस?
मित्र : सगळीच तज्ज्ञ मंडळी सांगत आहेत की, मे महिन्याच्या 25 तारखेपर्यंत दुपारी घराबाहेर पडू नका. मी बायकोला सुचवले की, मैत्रिणीला कार्यक्रम थोडा पुढे ढकलायला सांग, म्हणजे उन्हाचा कोणाला त्रास होणार नाही. कारण अशा कार्यक्रमाकरिता मुहूर्त बघणे वगैरे असा प्रकार नसणार! बायको म्हणाली, ‘तुम्ही म्हणताय ते कारण कोणालाही पटणार नाही. अशा विचारांना पुण्यामध्ये निगेटिव्ह ॲटिट्युड असे म्हणतात. तुम्हाला ते समजणार नाही… तुम्ही येणार नसाल तर तसं सांगा, मी एकटी जाईन.’
आपण बायकोला काही सुचवणं आणि ते लॉजिकल असलं तरी बायकोला ते पटणं, असं कधीच होत नसतं. (बहुतेकांचा असाच अनुभव असणार). त्यामुळे मीच विचार केला की आपणच काहीतरी सोपा पर्याय काढावा.
मी : तुझं म्हणणं आणि तुझा अनुभव अगदी बरोबर आहे, कार्यक्रमाचं काय ठरवलं शेवटी?
मित्र : आमच्या घरापासून दुपारी साडेअकरा वाजता रिक्षेने डेक्कनला जायचं, आणि कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी कडक उन्हात अडीच वाजता पुन्हा रिक्षाने घरी यायचं, म्हणजे उन्हाला – ‘आ बैल मुझे मार’ असे सांगण्यासारखेच आहे.
रिक्षेमध्ये प्रवास करताना उन्हाच्या झळा लागतात, आणि कार्यक्रम हॉटेलमध्ये म्हणजे तिथे एसी असतो. म्हणजे आधी झळा आणि नंतर लगेच गारवा, म्हणजे तब्येतीचे आणखीन बारा… काय मार्ग काढावा? काय मार्ग काढावा? असा विचार करत मी खिडकीतून बाहेर उन्हाकडे बघितलं आणि मला मार्ग सापडला… हॉटेल श्रेयसमध्ये मी दोन दिवसांकरिता खोली बुक केली. काल संध्याकाळी ऊन उतरल्यानंतर आम्ही दोघेजण श्रेयसमध्ये आलो. रात्रीचं जेवण इथेच घेतलं, आज सकाळचा नाश्ता पण इथे झाला. त्यामुळे रोजच्या खाण्यात आणि चवीमध्ये पण अनायसेच छान बदल मिळाला.
हेही वाचा – आनंदी जगायला काय लागतं?
आजचा कार्यक्रम याच हॉटेलमधल्या हॉलमध्ये आहे. आमची खोली दुसऱ्या मजल्यावर आहे. दुपारी रूममधून खाली हॉलमध्ये कार्यक्रमाला जाऊ, जेवण आणि गप्पाटप्पा आटोपल्या की, वरती पुन्हा खोलीमध्ये येऊन आराम करू. अजूनही कोणी ओळखीच्यांना उन्हात घरी जायचं नसेल, तर त्यांना पण खोलीवर घेऊन येऊ. संध्याकाळी हॉटेलमधून चेकआऊट करू आणि रिक्षा करून घरी जाऊ!
माझ्या या प्लॅनिंगमुळे उन्हालाही बरं वाटेल की, आपल्यामुळे यांना त्रास झाला नाही आणि आपल्याला पण उन्हाचा त्रास नाही, ज्यांच्याकडे कार्यक्रम ते पण खूश आणि बायको पण खूश!
मी : तुझी आयडीया एकदमच जबरदस्त आहे. इथूनच तुला सलाम करतो. ऊन कमी झालं की, जून महिन्यात ठरवून एकदा भेटीचा कार्यक्रम करू, मित्रांना पण बोलवू, भरपूर गप्पाटप्पा करू, मस्त मजा येईल.
बाय-बाय झाले आणि फोन संपला.


