Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    तात्या काका अन् अनुत्तरीत प्रश्न…

    April 22, 2026

    Dnyaneshwari : एवं नानाविधाकृती, इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती

    April 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 एप्रिल 2026

    April 22, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 22
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » असाही ड्राय-डे! तुम्ही सहमत आहात?
    ललित

    असाही ड्राय-डे! तुम्ही सहमत आहात?

    सुधीर करंदीकरBy सुधीर करंदीकरApril 20, 2026Updated:April 20, 2026No Comments9 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, कथाकहाणी, मी मराठी, अभिजात मराठी, मोबाइल ड्राय डे, मोबाइल वापरणे बंद, मोबाइलाच अतिवापर, वाहतुकीचे नियम, ट्रॅफिक नियमांचे पालन, वाहतूक नियमांचे पालन, वाहतूक नियमांचे उल्लंघन, वाहतूक नियमांबद्दल जागरुकता, सजग नागरिकांचे कर्तव्य
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी - (प्रातिनिधीक)
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    रोज सकाळी 40 ते 45 मिनिटे फिरणे यासारखा सुंदर आणि सोपा व्यायाम नाही. फिरताना छोटीशी पथ्य पाळायची असतात… ती म्हणजे, फिरताना हातात मोबाइल नाही आणि घरगुती गप्पा नाहीत. फिरताना भेटणाऱ्यांना ‘हाय’ ‘हॅलो’ करत चालत राहिलो, तर चेहेरा आनंदित राहतो, आणि मन पण प्रसन्न राहते… आणि एखादी वेगळी सकाळ अशी पण असते –


    खरंतर सकाळ ही रोजच वेगळी असते, पण आजची सकाळ जरा हटके, म्हणजे वेगळ्यातली वेगळी होती! आम्ही सकाळी  साधारण 7 – 7:15 वाजता बाहेर पडतो. ही वेळ ऑफिसची असल्यामुळे, रस्त्यावर निरनिराळ्या ठिकाणी कंपन्यांच्या बसचे पिक-अप पॉइंट्स आहेत. काही ठिकाणी कॅबचे पिक-अप पॉइंट्स आहेत. त्यामुळे फिरण्याच्या पूर्ण रस्त्यावर, या वेळेला फुटपाथवर थोड्या थोड्या अंतरावर मुले-मुली, स्त्री-पुरुष ग्रुपने गाडीची वाट बघत उभे असतात.

    काही ठिकाणी दोन-तीन जण असतात, तर काही ठिकाणी सहा-सात जण असतात. रोजचे दृश्य म्हणजे, प्रत्येकाच्या हातात मोबाइल असतो… एकतर ही  मंडळी फोनवर बोलत असतात किंवा चॅट करत असतात… काहींच्या कानाला मशीन लावलेले असतात… सकाळी सकाळी भेटतो,  तर एकमेकांना ‘हाय’ ‘हॅलो’ करणे, एकमेकांची विचारपूस करणे, काही गप्पा मारणे हा प्रकार कधीच बघायला मिळत नाही!

    हेही वाचा – अगं अगं म्हशी… सगळ्यात इनोव्हेटिव्ह कल्पना!

    आज बायकोला सकाळी एका लग्नाला जायचे होते, म्हणून मी नेहेमीच्या वेळेलाच, पण एकटाच फिरायला बाहेर पडलो. मृत्युंजय मंदिराच्या जवळच, एका स्टॉपजवळ, दोन मुली उभ्या होत्या आणि चक्क मोठमोठ्यांनी हसत गप्पा मारत होत्या! एकीच्याही हातात मोबाइल नव्हता!! दोघींच्या हातात बाजूच्या चहाच्या स्टॉलवरून घेतलेल्या चहाचे ग्लास होते. मुलींनाच असे नाही, पण कुणालाही असे मनमोकळं हसताना बघितलं की, प्रसन्न वाटतं, मस्त वाटतं.

    रस्त्याने जाताना, असं काही वेगळं दिसलं की, आपोआपच आपली पावलं तिथे थांबतात. माझं पण असंच झालं. या रस्त्याने मी इतके दिवस फिरतो आहे, पण हाती मोबाइल नसणारी आणि एकमेकांशी बोलणारी माणसं, मी पहिल्यांदाच बघत होतो… आणि ती पण विथ स्माइलिंग फेस! काय कारण असेल? ही माझी जिज्ञासा जागी झाली.

    कारण समजण्याकरिता, त्यांनाच विचारणे, हा एकच पर्याय होता.

    मी :  मॅडम, एक विचारू का?

    (त्यांची  नावे समजेपर्यंत आपण त्यांना मेघना आणि मनवा म्हणूया.)

    मेघना :  विचारा काका, काहीही विचारा, आम्ही आज एकदम खूश आहोत.

    मी माझी शंका त्यांना विचारली.

    मनवा :  काका, तुम्हाला आश्चर्य वाटणं साहजिक आहे. आज आम्ही एकमेकींना मोबाइलशिवाय बघतो, तेव्हा आम्हाला पण आश्चर्य वाटतं.

    मेघना :  काका, आज ड्राय-डे आहे.

    मी :  महाराष्ट्रात ड्राय-डे कुठे पाळतात? आणि आता तर सकाळ आहे!

    मेघना :  आमच्या ड्राय-डेचा दारूशी काहीही संबंध नाही. ड्राय-डेला दारू नसते, आमच्या ड्राय-डेला मोबाइल नसतो. मृत्युंजय मंदिराजवळ आमचा स्टॉप आहे, श्री शंकराचा वार सोमवार, म्हणून सोमवारी आमचा ड्राय-डे असतो. आज मोबाइलची जागा, हातात नसून आमच्या पर्समध्ये असते आणि वापर फक्त आलेला फोन घेण्याकरिता किंवा काही फोन करण्यापुरताच!

    मी :  वा! काय मस्त आयडिया आहे! तुम्हाला ही  कल्पना सुचली कशी?

    मनवा :  काका, नुकतेच आम्ही दोघी स्वीडनला गेलो होतो, तीन महिने. तिथे आम्हाला खूप शिकायला मिळाले. ही कल्पना पण त्यातूनच मिळाली. आमच्या ड्राय-डेबद्दल विचारणारे तुम्ही पहिलेच आहात. तुम्हाला ऐकायचे असेल तर, आमच्याबरोबर चहा घ्यावा लागेल. मी काही उत्तर द्यायच्या आत, तिने बाजूच्या चहावाल्याला खूण केली आणि माझ्या हातात चहाचा ग्लास आला.

    मी :  मॅडम, तुमची बस किती वाजता आहे? नाहीतर बोलण्याच्या नादात…

    मेघना :  कॅब आलेली आहे. ही काय आमची कार उभी आहे. आमचं फ्लेक्सी टायमिंग असतं, उशिरा गेलो, तर तेवढं नंतर थांबायचं! नो प्रॉब्लेम.

    आता, ड्राय-डेची कल्पना कशी सुचली?  त्याचं असं झालं  –

    स्वीडनमध्ये टू-व्हीलर किंवा फोर-व्हीलर चालवणारा एकही जण, आम्हाला मोबाइलवर बोलताना दिसला नाही. आम्हालाही तुमच्यासारखंच आश्चर्य वाटलं. दुसऱ्याच दिवशी, आम्ही तिथल्या एकाला गाठलं, जसं शंका विचारायला तुम्ही आम्हाला गाठलं…  तिथे सगळ्यांनाच इंग्रजी येतं.

    हेही वाचा – रस्ता क्रॉस करण्याची अशी पण एक मज्जा…

    मी : मॅडम, थोडा फरक आहे. मी दोघींना गाठलं आणि तुम्ही दोघींनी एकाला गाठलं. त्यांनी पण तुम्हाला चहा ऑफर केला होता  का? बरं, गाठल्यावर पुढे काय झालं?

    त्या दोघी मला भूतकाळात घेऊन गेल्या…

    मेघना :  आम्ही त्यांना विचारलं की, इथे गाडी चालवताना कोणीच मोबाइलवर बोलताना दिसत नाही. पोलीस पकडतात का? दंड जास्त असतो का? लायसन्स जप्त करतात का?

    परदेशी माणूस :  अहो, गाडी चालवताना मोबाइल वापरणे, स्वतःकरिताच धोकादायक असते, हे आम्हाला समजत नाही का? ते पोलिसांनी कशाला सांगायला पाहिजे! उन्हाळ्यात आपण डोक्यावर टोपी घेतो, पावसाळ्यात छत्री घेतो.  छत्री नाही घेतली, तर पोलिसांनी आपल्याला पकडायला पाहिजे का? मॅडम, पाऊस पडतोय, तुम्ही छत्री नाही घेतली – भिजल्यामुळे तुम्हाला ताप येईल, सर्दी होईल… द्या 10 युरो दंड.

    मी टू-व्हीलर चालवताना हेल्मेट घातले नाही आणि काही कारणामुळे, रस्त्यावर गाडी घसरली आणि मी पडलो, तर माझं डोकं फुटल्याशिवाय राहणार नाही, हे मला नक्कीच समजतं. त्यामुळे माझ्या सुरक्षिततेकरिता मी हेल्मेट घालतोच. याच्याकरिता नियम आणि पोलीस कशाला पाहिजेत? कार चालवताना आम्ही सीट बेल्ट लावतोच, त्याचं कारण हेच! अर्थात,, ज्याला मानेचा त्रास असेल, वयस्कर माणसांना हेल्मेटमुळे त्रास होत असेल, तर ते हेल्मेट वापरत नाहीत. हेल्मेट हे वैयक्तिक सुरक्षिततेसाठीच आहे.

    मनवा :  अहो, पण कार चालवणारे मोबाइलवर का बोलत नाहीत? अपघात झाला तर त्यांना काहीच होणार नसते, चालणाऱ्याचे बारा वाजतात! मग, याकरिता काही नियम आहे का? दंड आहे का?

    परदेशी माणूस :  मॅडम, नियम आला की, बघायला यंत्रणा आली. दंड आला की, गैरव्यवहार आला… आणि मॅडम समजा, माझ्या कारने अ, ब, क, ड  लोकांना  धडक दिली, तर मला काहीच होणार नाही, हे बरोबर आहे. आता, इतर कुणी असेच चार-पाच लोकांना उडवले आणि त्या  अ, ब, क, डमध्ये माझे आई-वडील असले तर? बायको असू शकते… मुले असू शकतात… मित्र असू शकतात… अशी दुसऱ्यांनी दिलेली धडक मला आवडेल का? नक्कीच नाही. मग, मी दिलेली धडक इतर कुणाला आवडेल का? तर नाही! ‘इस हाथ दे, उस हाथ ले!’ व्हेरी सिम्पल. म्हणून गाडी चालवताना  ‘नो मोबाइल’.

    आम्ही रस्त्यावर नजर टाकली, तर, खरोखरच हेल्मेट, सीटबेल्ट वापरताना सगळेच दिसत होते. आम्ही दोघींनी एकमेकीला चिमटा काढून शुद्धीवर असल्याची खात्री करून घेतली.

    मेघना :  इथे चौकात कुठेच ट्रॅफिक पोलीस दिसत नाहीत. स्पीड लिमिट न पाळणे, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी करणे, नो एंट्रीतून येणे वगैरे कोण बघतं? कोण पकडतो?

    परदेशी माणूस :  इथे सगळेच लोक सुशिक्षित आहेत, सगळ्यांना वाचता येतं. रस्त्यावर स्पीड लिमिटचे बोर्ड का लावले आहेत? रस्त्यावर लेन का मार्क केल्या आहेत? झेब्रा क्रॉसिंग का मार्क केले आहेत? याचा अर्थ सगळ्यांना समजतो. इथे फक्त वाहतूक आणि सुरक्षितता यांच्याशी संबंध असलेलेच बोर्ड रस्त्यावर लावता येतात.

    मेघना :  अहो, आमच्याकडे पण सगळ्यांना वाचता येतं, आमच्याकडे पण रस्त्यावर असे बोर्ड असतात. पण जास्त बोर्डचा भरणा वाढदिवसांचे बोर्ड आणि जाहिराती यांचा असतो. त्यामुळे सुरक्षिततेसंबंधीचे बोर्ड कुणालाच दिसत नाहीत आणि कुणी बघितले – तरी ते पाळत नाहीत. याला आम्ही, ‘कळतं पण वळत नाही’ असं म्हणतो.

    मनवाने मेघनाला हळूच चिमटा काढला, “अगं, मराठी माणसांनाच ही सवय आहे, म्हणूनच  ही म्हण फक्त मराठीत आहे. इंग्रजीत तू ‘अंडरस्टॅण्डिंग बट नॉट टर्निंग’ अशी म्हण कधी ऐकली आहेस का?”

    मनवा :  अहो, इथे स्पीड ब्रेकर दिसत नाहीत, जिथे फोर-व्हीलरला एंट्री नाही, तिथे खांब दिसत नाहीत, फुटपाथवर टू-व्हीलर नेऊ नये म्हणून तिथे खांब आहेत.

    फुटपाथवर खांब हा काय प्रकार आहे, हे परदेशी माणसाला बम्पर गेले असावे, त्यामुळे तो, ‘व्हॉट,  व्हॉट,  व्हॉट इज दॅट?’ असं विचारायला लागला. आमच्या लक्षात आलं की, जे बोर्ड वाचून तसं वागत नाहीत, त्यांच्याकरिताच स्पीड ब्रेकर आणि खांब लागतात… आणि यांचा शोध आपल्याकडेच लागला असणार.

    हेही वाचा – अवघ्या पंधरा दिवसांत 5 रुपयांचे झाले 500 रुपये!

    हे सगळं ऐकल्यावर सगळ्यांच्याच मनात एक शंका नक्कीच येणार, तीच मनवाच्या पण मनात आली. विचारू का नको, असं करत, तिने विचारलंच –

    मनवा :  इथे सगळे लोक नियम पाळतात, त्यामुळे कुणालाच अडवायचे नाही, कुणाचं लायसन्स बघायचं नाही, कुणाच्या पावत्या फाडायच्या नाहीत, मग इथे ट्रॅफिक पोलीस असतात की नाही? आणि असले, तर ते करतात काय?

    परदेशी माणूस :  अहो, इथे पोलीस आहेत. ते सगळ्या ट्रॅफिकवर नजर ठेवून असतात. कुठल्याही कारणामुळे कुठेही काहीही अडचण असेल, तर ते लगेच मदतीला पोहोचतात. सगळे रस्ते, फुटपाथ यांची स्वच्छता, वेळच्या वेळी दुरुस्ती, रस्त्यावरचे मार्किंग – पट्टे या सगळ्या गोष्टी तेच पाहत असतात. इथे तुम्हाला रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही, कचरा दिसणार नाही, एकही सिग्नल बंद दिसणार नाही.

    मेघना :  तुमचं हे सगळं ऐकून आणि बघून असं वाटतं, की, आम्ही एखाद्या काल्पनिक दुनियेत आहोत. अजूनही काही विचारलं तर चालेल का?

    परदेशी माणूस : हो, पण छोट्याश्या ब्रेकनंतर –

    परदेशी माणसाने बाजूच्या व्हेंडिंग मशीनमधून तीन कोक आणले आणि म्हणाला, चियर्स! एक एक घोट घ्या आणि विचारा.

    मेघना :  आमच्याकडे लोक रस्त्यावर कचरा जाळतात, खूप धूर सोडणारे आणि कानठळ्या बसतील असा आवाज करणारे फटाके फोडतात.  सण साजरे करण्याकरिता, मोठमोठया मिरवणूक काढतात, ट्रॅफिक जॅम होतो. कर्कश्श आवाजात गाणी लावलेली असतात. ही यादी खूप मोठी होईल. तुमच्याकडे असे प्रकार असतात का?

    परदेशी माणूस :  तुम्ही सांगता एवढी वाईट परिस्थिती इथे कधीच नव्हती. पण थोड्याफार प्रमाणात काही गोष्टी असायच्या. आता यातले काहीच इथे बघायला मिळणार नाही. इथल्या सामाजिक संस्था, लोकांच्या सभा घेऊन, वर्तमानपत्रांमधून, व इतर उपक्रमांमधून, असे केल्यामुळे होणारे दुष्परिणाम, लोकांना वेळोवेळी समजावून सांगतात. राजकीय विरोधी पक्ष पण, सरकारच्या सगळ्याच धोरणांना विरोध करत नाहीत. चांगले असेल त्याला सगळेच मनापासून पाठिंबा देतात. इथे लोकांना एकदा कळलं की, लगेच ते वळतं. ज्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडेल किंवा ज्यामुळे देशाच्या संपत्तीला हानी पोहोचेल, अशा गोष्टी इथे कुणीच करणार नाही. सगळेच राजकीय पक्ष याबाबतीत एकत्र काम करतात. विरोधी  पक्ष म्हणून कायम विरोधीच भूमिका घ्यायची, हा प्रकार इथे नाही. लोकांचे हित, हेच सगळ्या पक्षांचे उद्दिष्ट असते.

    मनवा :  वा, तुमच्याकडून आज खूपच शिकायला मिळालं. आमच्याकडे असा बदल झाला तर काय मजा येईल!

    (अशा ठिकाणी आता तीन महिने राहायला मिळणार, या कल्पनेनेच आम्ही सुखावलो). आम्ही परदेशी माणसाचे नाव विचारले, त्यांचे आभार मानले आणि त्यांना बाय – बाय केले…

    मी :  वा, म्हणजे तुम्ही तीन महिने प्रदूषणमुक्त हवा आणि पाणी यांचा आस्वाद घेतला. तिथले अन्नपदार्थ पण केमिकल विरहित आणि भेसळविरहित असणार!  मस्तच! आपल्याकडे फक्त नारळ हाच एकमेव असेल की, ज्यात केमिकल नाहीत आणि भेसळ नाही.

    मनवा आणि मेघना :  काका, तिकडे अन्न आणि औषधे यात भेसळ करणाऱ्याला नक्कीच फाशी असणार. काका, तुम्ही आता ड्राय-डे कधी सुरू करताय?

    मी :  मॅडम, तुम्ही स्वीडनला जाऊन आला, आणि तुमचा स्टॉप शंकराच्या मंदिराजवळ आहे, म्हणून तुम्ही सोमवारी ड्राय-डे सुरू केला. मॅडम, मी दोनदा स्वीडनला जाऊन आलो आणि माझ्या रोजच्या फिरण्याच्या रस्त्यावर शंकर, देवी, दत्त, बालाजी, मारुती, नवग्रह अशी सगळीच देवळे आहेत, म्हणून मी रोजच ड्राय-डे पाळतो. फिरायला जाताना नो मोबाइल, गाडी चालवताना नो मोबाइल, लिफ्टमध्ये – जिने चढता-उतरताना नो मोबाइल, कुणाशी बोलताना – गप्पा मारताना नो मोबाइल, जेवताना नो मोबाइल!

    मनवा : काका, ग्रेट. तुम्ही आमच्याही पुढे आहात.

    मी :  आज तुमचा स्वीडनचा अनुभव ऐकायला मिळाला, खूप मजा आली. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी, जर आपण सगळ्यांनीच आचरणात आणल्या, म्हणजे कळत्याला वळते केले, तर सगळ्यांचच जगणं खूप खूप सुखकर होई, यात शंकाच नाही. अर्थात, हे कुत्र्याची शेपूट सरळ करण्यासारखे आहे.

    मेघना :  आपण सगळ्यांनीच जर नेपोलियनवर विश्वास ठेवला, तर अशक्य असं काहीच नाही, काका.  शेपूट पण सरळ होईल…!

    आम्ही आता निघतो. लेट अस् ऑल बी पॉझिटिव्ह अँड होप फॉर द बेस्ट.

    मी :  यस मॅडम, नक्कीच. माहिती आणि चहाबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू. मी माझे नाव त्यांना सांगितले आणि त्यांची नावे विचारली.

    त्या दोघी एकदम :  एम फॉर मनवा आणि एम फॉर मेघना!

    Avatar photo
    सुधीर करंदीकर

    मी पुण्याच्या टाटा मोटर्स मधून 2009मध्ये रिटायर झालो. लिखाणाचा आणि माझा, किंवा वाचनाचा आणि माझा, नोकरीमधून निवृत्त होण्याच्या शेवटच्या काही वर्षांपर्यंत ‘नाही’च्या आसपासच संबंध होता. नोकरीच्या शेवटच्या काळात मात्र ISO 9000 या स्टॅंडर्डच्या निमित्ताने, माहिती नसणाऱ्या आणि जुजबी माहिती असणाऱ्या विषयांवर भरपूर म्हणजे प्रचंड लिखाण करण्याचा योग आला. बहुदा लिखाणाची हीच ‘री’, निवृत्तीनंतर अवांतर लिखाणात सुरू राहिली. लोकसत्ता / सकाळ / महाराष्ट्र टाइम्स / बित्तंमबातमी अशी वर्तमानपत्रे, अभियंता मित्र / प्रज्ज्योत / कजरी / मायभूमी / पुरुष उवाच / मैत्री / अक्षरसिद्धी / सांज / मिळून साऱ्याजणी / विश्वभ्रमंती अशी मासिके यातही लेखन आहेच. माझी मजेशीर लेख आणि अनुभव यांची तीन पुस्तके अमेझॉन वर उपलब्ध आहेत. 1) म्हैस, 2) काही आहे का? काही आहे का? 3) हसती खेळती बायको. वाचकवर्ग वाढतो आहे आणि माझी लिखाणातून आनंदयात्रा मस्त मजेत सुरू आहे. मोबाइल - 9225631100

    Related Posts

    तात्या काका अन् अनुत्तरीत प्रश्न…

    April 22, 2026 ललित

    Bookshelf : ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीचा आवाका मोठा

    April 21, 2026 ललित

    रिटर्न गिफ्ट

    April 21, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    तात्या काका अन् अनुत्तरीत प्रश्न…

    By डॉ. विवेक वैद्यApril 22, 2026

    मी, आई आणि बाबा दरवर्षी आठ दिवस सुट्टीमध्ये गावी जातो. मी यावर्षी नववीत गेलो. आमच्या…

    Bookshelf : ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीचा आवाका मोठा

    April 21, 2026

    रिटर्न गिफ्ट

    April 21, 2026

    घटस्फोटाची याचिका? नव्हे, अतिअपेक्षांचा मृत्यूलेख!

    April 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    तात्या काका अन् अनुत्तरीत प्रश्न…

    April 22, 2026

    Dnyaneshwari : एवं नानाविधाकृती, इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती

    April 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 एप्रिल 2026

    April 22, 2026

    Bookshelf : ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीचा आवाका मोठा

    April 21, 2026

    रिटर्न गिफ्ट

    April 21, 2026

    घटस्फोटाची याचिका? नव्हे, अतिअपेक्षांचा मृत्यूलेख!

    April 21, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 275
    • अवांतर 182
    • आरोग्य 103
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 393
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 197
    • मैत्रीण 18
    • ललित 572
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    तात्या काका अन् अनुत्तरीत प्रश्न…

    April 22, 2026

    Dnyaneshwari : एवं नानाविधाकृती, इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती

    April 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 22 एप्रिल 2026

    April 22, 2026
    Most Popular

    तात्या काका अन् अनुत्तरीत प्रश्न…

    April 22, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.