कधीही ड्रिंक्स न घेणारा तो मित्राच्या प्रमोशन पार्टीसाठी महफिल ऑर्केस्ट्रा बारच्या पायऱ्या चढत होता. आत गेल्यावर समोरच ती होती, महफिल बारची स्टार सिंगर… अस्सल बेंगॉल ब्युटी! काही वेळ तिचं गाणं ऐकून ते निघाले. महफिल बारच्या काऊंटरवर पैसे देऊन गाण्याची फर्माईश करता यायची. तो तशी फर्माईश कधीच करायचा नाही. त्याची स्वतःची अशी एक स्टाईल होती. सुसंस्कृत व्यक्तिमत्व, शांत चेहरा आणि हातात डायरी. ड्रिंक्स न घेणारा, फक्त गाणी ऐकण्यासाठी महफिल बारला येणारा तो खराखुरा रसिक होता. त्याचे मित्र प्यायचे, पण तो मात्र जीवाचे कान करुन गाणी ऐकायचा.
महफिल बारमधील पैसे उडवणाऱ्या गिधाडांच्या कळपात हा राजहंस तिला भावला. एक दिवस तिनेच त्याला चिठ्ठी पाठवली “फर्माईश कीजिये!”
महफिल बारच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडत होतं.
त्याने “अगर तुम मिल जाओ, जमाना छोड देंगे हम…” लिहून पाठवलं. मग काय, त्याची एंट्री झाली की, ती तेच गाणं म्हणायची. एक दिवस तिने चिठ्ठी पाठवली, “मिलना है.” खाली पत्ता होता.
हेही वाचा – काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली
तो गेला. तिने त्याला थेट प्रपोज केलं. त्याचंही तिच्यावर प्रेम होतं, पण त्याची घरी सांगायची हिंमत नव्हती. त्याचं घराणं अत्यंत कर्मठ होतं. इकडे तिच्या आवाजातील व्याकुळता वाढत गेली. महफिल बारच्या मालकांच्याही लक्षात आलं. त्यांनी याला समजावलं की, धंद्यावर विपरीत परिणाम झाला आहे, तेव्हा तुम्ही येऊ नका. तो येईनासा झाल्यावर ती बेचैन झाली. तिने त्याच्या मित्राकरवी चिठ्ठी पाठवली,
“आखरी बार मिलना है…”
तो गेला. तिने जड अंतःकरणाने सांगितले, “कल मैं जा रही हूँ. गांव में ही कुछ काम करूंगी. जब तुम्हारा दिल चाहे, तुम आ जाना. जब भी आओगे, सीधे समंदर के किनारे पर आ जाना. वहां मैं राह देख रही हूँ…”
तिने त्याला पत्ता दिला आणि ती बोलल्याप्रमाणे निघून गेली.
ती गेल्यावर मात्र त्याचं मन बेचैन झालं. नक्की काय करावं, ते त्याला सुचत नव्हतं. अशा स्थितीत त्याचे मित्र त्याला माझ्याकडे घेऊन आले. मी त्याची जन्मपत्रिका काळजीपूर्वक तपासली आणि त्याला म्हणालो, “सध्याचा काळ तुमच्यासाठी खूप कठीण आहे. तुम्हाला सध्या ग्रहस्थिती प्रतिकूल आहे. तुम्ही सारासार विवेकबुद्धी वापरूनच कोणताही निर्णय घ्यावा.”
माझे बोलणे ऐकून त्याने त्याची सर्व कहाणी मला सांगितली आणि म्हणाला, “समजा मी जाऊन तिला घेऊन आलो आणि तिच्याशी लग्न केलं तर काय होऊ शकेल?”
हेही वाचा – आत्मसन्मान जपलाच पाहिजे…
मी म्हणालो, “तुमचं घराणं अत्यंत प्रतिष्ठित आहे. तुम्ही जरी तिला पत्नी म्हणून स्वीकारलंत तरी समाज आणि तुमचे नातेवाईक स्वीकारणार नाहीत. प्रत्येक समारंभात तिला इतर नातेवाईक स्त्रिया टोमणे मारतील. तिला तसं जगणं असह्य होऊ शकतं. तुमच्या मोठ्या बंगल्यात तुमचं एकत्र कुटुंब राहतं. तिला कुटुंबातील इतर स्त्रियांसोबत घरात वावरणं कठीण होऊ शकतं. तुम्ही दिवसभर कामानिमित्त बाहेर असताना ती घरी अशा तणावपूर्ण वातावरणात कसे दिवस काढू शकेल, याचा तुम्ही गंभीरपणे विचार करणं आवश्यक आहे.”
माझं बोलणं त्याला कितपत पटलं माहीत नाही, पण तो सावकाश उठला आणि जड पावले टाकत निघून गेला.
या प्रसंगाला बराच काळ लोटला. रोजच्या कामाच्या रहाटगाडग्यात मी हा प्रसंग साफ विसरुन गेलो.
इकडे त्याचे एका घरंदाज मुलीशी लग्न झाले. पत्नी आणि मुलासोबत तो आता त्याच्या बंगल्यात राहातो. अचानक एक दिवस तो भेटला. त्याने मला कातर आवाजात विचारले,
“अजून ती वाट बघत असेल का? मला तिच्याशी लग्न करायचं होतं…”
त्याच्या जागी मला ‘दुनियादारी’मधला श्रेयस दिसू लागला… खिन्न हसून मी त्याचा निरोप घेतला.
दूरवरून कुठूनतरी लताचे आर्त सूर ऐकू येत होते…
खुशबू आती रहे
दूर से ही सही
सामने हो चमन
ये जरुरी तो नहीं…


