आज खूप दिवसांनी आजोबा मैदानावर दिसले. माझं रोजचं चालणं संपवून मी ते बसलेल्या बाकापाशी जाऊन उभा राहिलो. आजोबांचा नेहमीचा सळसळता उत्साह गायब होता. कसल्यातरी विचारात होते ते. शेवटी मीच संवाद सुरू केला… “आजोबा कुठे होता इतके दिवस? किती वाट बघितली मी तुमची.”
आजोबांचे डोळे काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न करत होते. शेवटी उसासा टाकत ते अस्पष्ट आवाजात बोलले, “ती गेली गेल्या महिन्यात!”
आजोबांचे बोलणे ऐकून माझ्या पोटात धस्स झाले… “आजोबा, पण काय झाले अचानक? मी गेल्याच महिन्याच्या सुरुवातीला तर भेटून गेलो होतो आजींना…”
“तू येऊन गेल्यानंतर दहा दिवसांनी खेळ आटोपला. तुला भेटायचे होते म्हणून मी आज पहिल्यांदाच बाहेर पडलो आहे.”
मी नि:शब्द झालो होतो… भावनाविवश झालो होतो. मला गेल्या वर्षीची आमची पहिली भेट आठवली…
माझ्या घराजवळच्या किराणा मालाच्या दुकानात आजोबा मला पहिल्यांदा भेटले होते. दुकानातील माणसाने त्यांच्या पुढ्यात डझनभर कॅडबरी चॉकलेट आणून ठेवली. ती बघून त्यांच्या डोळ्यांतील चमक मला आठवून गेली…
“आजोबा, नातवंडांना देण्यासाठी घेतलीत की काय एवढी चॉकलेट?” मी न रहावून त्यांना विचारले. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने मला थोडं आश्चर्य वाटले. आजोबा बोलून गेले, “माझ्या बायकोला आवडतात. तिच्यासाठी घेतली आहेत.” एवढं बोलून आजोबा दुकानाबाहेर पडले…
हेही वाचा – सागरगोटे… आयुष्यातील चढ-उताराचे अन् सुख-दुःखाचे!
नंतर खूपदा मला आजोबा भेटले, त्याच दुकानात. पण दरवेळी ते फक्त कॅडबरी चॉकलेटच घ्यायचे विकत. माझं कुतूहल आमच्या प्रत्येक भेटीत वाढत होतं आणि ते आजोबांनी ओळखले. एक दिवस मला ते त्यांच्यासोबत त्यांच्या घरी घेऊन गेले.
“ये तुझी ओळख करून देतो माझ्या बायकोशी,” असं म्हणून आजोबा मला आतल्या खोलीत घेऊन गेले. समोरच्या बेडवर आजी झोपलेल्या होत्या. आजोबा त्यांच्या कानाजवळ जाऊन म्हणाले, “अगं बघतेस का कोण आलं आहे तुला भेटायला? हा अद्वैत आहे. माझा तरूण मित्र आहे.”
मी त्यांच्या बेडच्या जवळ गेलो. आजींनी किलकिल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघितले. त्यांच्या खोल गेलेल्या डोळ्यांत मला फक्त उदासीनता दिसली. हात जोडून मला नमस्कार केला त्यांनी आणि हातानेच बसायला सांगितले.
आजोबांनी एव्हाना एका चॉकलेटची चांदी काढून त्याचे आठ दहा छोटे-छोटे तुकडे करून आजींच्या जिभेवर त्यातला एक तुकडा ठेवला…
“अद्वैत बस आता शांतपणे. तुझ्या मनातील सगळ्या शंकांचे मी उत्तर देतो तुला.”
माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसून आजोबा मला सांगायला लागले आणि भोग भोगायला लागणे म्हणजे काय ते मला पुढच्या तासाभरात समजून गेले.
आजी-आजोबांचा एकुलता एक मुलगा अमेरिकेत आहे. आजकाल आपण घरोघरी बघतो तशीच गोष्ट आजी-आजोबांची होती. लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी झालेल्या चेतनला जमेल तेवढ्या लाडाकोडात वाढवले दोघांनी. चेतन जात्याच हुशार. आयआयटीतून प्रावीण्यासह इंजिनीअर झाला. परदेशी विद्यापीठांची शिष्यवृत्ती मिळवून पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेत दाखल झाला. तिथे रुळला आणि नंतर तिथेच स्थायिक झाला… सुरुवातीला काही वर्ष कौतुकाने भारतात येत होता. पण परदेशी मुलीशी लग्न केले आणि त्याचे भारतात येणं लांबत गेलं आणि गेली काही वर्षे पूर्ण थांबलं.
आजी आणि आजोबा, दोघांची सरकारी नोकरी. मिळणाऱ्या निवृत्ती वेतनावर दोघांचे आयुष्य सुरु होते. पण तरीही डोळ्यांत दाटून रहायच्या चेतनच्या आठवणी. आजोबा मनातून खंबीर होते, पण आजी तशा नव्हत्या. काही वर्षांनी आजींना कॅन्सर झाला आणि पहिल्यांदा आजोबा खचले. चेतनच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या आजींची समजूत कशी काढायची, हा त्यांच्यापुढे यक्ष प्रश्न होता. पण त्याचं उत्तर त्यांनीच शोधलं कॅडबरी चॉकलेटच्या रुपात. जेव्हा जेव्हा आजी अगतिक होऊन जायच्या तेव्हा कॅडबरीचा तुकडा आजोबा आजीच्या जिभेवर ठेवायचे. त्या गोडव्यात आजी काही काळ चेतनचं दुःख विसरून जायच्या…
मी कॅडबरी चॉकलेटचा शोध लावणाऱ्या त्या महान व्यक्तीला मनातून साष्टांग नमस्कार घातला. त्या कॅडबरी चॉकलेटने आजी-आजोबांची सोबत काही वर्षं अव्याहत केली आणि गेल्या महिन्यात संपली.
हेही वाचा – बॅक स्टेज… हाच योग्य निर्णय!
“आजोबा…” मला पुढे बोलवतच नव्हते.
आजोबांनीच उलटं माझं सांत्वन केले आणि म्हणाले, “मी हळूहळू इथला पसारा आवरून एका वृद्धाश्रमात माझी सोय करणार आहे. त्या दृष्टीने माझा पत्रव्यवहार सुरू आहे. जायच्या आधी तुला नक्कीच भेटीन मी… अरे, वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की, हिच्या जिभेवरचा कडवटपणा मी कॅडबरी चॉकलेटने दूर करू शकलो; पण तिच्या मनातील कडवटपणा मी खूप प्रयत्न करून देखील दूर नाही करू शकलो. खूप आर्जव केली चेतनकडे, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पोटचा पोर असून पोरका करून गेला आम्हाला आणि आज ती मला पोरकं करून गेली… त्याचं नांव तिने हौसेने चेतन ठेवले, पण आमच्या दोघांचे आयुष्य आमच्या मुलाने कित्येक वर्षे अचेतन करून ठेवले!”
आजोबा घरी जायला निघाले. त्यांच्या पायातली शक्ती कमी झालेली मला जाणवली. मी त्यांना आधार देत उभे केले. हातातल्या काठीने सावकाश पावलं टाकत ते घराकडे जायला निघाले. जाताना माझ्या हातात त्यांच्या घरात उरलेली कॅडबरी चॉकलेट कोंबून गेले… त्या चॉकलेटचा गोडवा आजींच्या आठवणीत पूर्णपणे निघून जाणारच होता, पण तरीही आजोबांच्या समाधानासाठी मी ती सगळी चॉकलेट खिशात कोंबून मी मैदानातून बाहेर पडलो…


