Sunday, July 20, 2025
Homeशैक्षणिक‘तू मूर्ख' आहेस!

‘तू मूर्ख’ आहेस!

डॉ. किशोर महाबळ

परीक्षा नुकत्याच संपल्या होत्या. शिक्षकांसाठी राखीव असलेल्या रूममध्ये बसून एक ज्येष्ठ शिक्षिका उत्तरपत्रिका तपासत होत्या. हे काम सुरू असताना अनेकदा उत्तरपत्रिकेत चूक आढळली की, त्यांच्या तोंडून ‘मूर्ख लेकाचा’ असा शब्द बाहेर पडायचा. प्रत्येक उत्तरपत्रिकेत अशा काहीना काही चुका असायच्याच. त्यामुळे ‘मूर्ख’ हा शब्द अनेकदा त्या खोलीत उमटत होता. जेव्हा जेव्हा या शिक्षिकेला चुकीची उत्तरे आढळायची, त्या प्रत्येकवेळी उत्तराचे जाहीर वाचन त्या खोलीत केले जात होते आणि शेवटी अर्थातच परवलीचा शब्द उमटत होता ‘मूर्ख लेकाचा’. इतर शिक्षक ही उत्तरे ऐकून मोठ्याने हसायचे. कधीकधी त्या शिक्षिका चुकीच्या उत्तरांजवळ ‘मूर्ख’ असा शेरादेखील लिहीत असे. हा सगळा प्रकार एक सर्वात तरुण शिक्षक बघत होता. काहीवेळाने त्याला हे सगळंच असह्य झालं आणि तो म्हणाला, “मॅडम, कृपया ‘मूर्ख’ हा शब्द वापरू नका.” आताच शिक्षक झालेल्या या सर्वात तरुण शिक्षकाने केलेल्या सूचनेची तिथे उपस्थित असलेल्या एकाही शिक्षकाने दखल घेतली नाही.

पेपर तपासणाऱ्या त्या शिक्षिकेने मात्र विचारलं, “तू असं का म्हणालास?”

त्या तरूण शिक्षकाने सांगितलं, “मी या सगळ्या प्रकारातून गेलो आहे. शाळेत असताना मी नेहमीच चांगले गुण मिळवत होतो, तरी एक शिक्षक कायम माझी तुलना इतर विद्यार्थ्यांशी करायचे, त्यांनी कधीही माझं कौतुक केलं नाही.‌ याउलट, जेव्हा मी एखादी छोटी चूक करायचो, तेव्हा ते मला ‘मूर्ख’ हाक मारायचे. घरीही काही वेगळी परिस्थिती नव्हती. माझ्या वडिलांनी कधीच माझ्या भावनांची पर्वा केली नाही, मला समजून घेतलं नाही. अनेकदा माझे मित्र, नातेवाईक आणि बाबांचे मित्र यांच्यासमोर ते मला ‘मूर्ख’ अशीच हाक मारायचे. हा सगळा प्रकार माझ्या मनावर खोलवर परिणाम करून गेला. मात्र, माझ्या वडिलांना याचा काहीही फरक पडत नव्हता. त्यानंतर जेव्हा जेव्हा कोणी ‘मूर्ख’ हा शब्द वापरतो, तेव्हा मला हे सगळे प्रसंग आठवतात. हे प्रसंग जुने असले तरी त्यामुळे मनावर उमटलेले ओरखडे मी अजून विसरू शकलेलो नाही.”

हेही वाचा – एक संवेदनशील समस्या… कच्चे प्रेम

हे ऐकताच खोलीतील वातावरण एकदम गंभीर झालं. दुपारच्या जेवणाची वेळही संपल्याने चर्चा तिथेच थांबली. शाळा सोडताना त्या वरिष्ठ शिक्षिकेच्या लक्षात आले की, तो नवा, तरुण शिक्षक त्यांचा निरोप न घेताच आज घरी गेला.

दुसऱ्या दिवशी सर्व शिक्षक नेहमीच्या वेळी पुन्हा भेटले, तेव्हा तरुण, नव्या शिक्षकाला त्या ज्येष्ठ शिक्षिका म्हणाल्या, “माझ्या कालच्या वागणुकीबद्दल मला खूप वाईट वाटले. मी घरी गेल्यावर तुझ्या बोलण्यावर विचार करत असताना मला आठवलं की, माझ्या लहानपणीही अनेकजण मला ‘मूर्ख’ म्हणत असत. त्यावेळी मी लहान, असहाय्य होते आणि याचा बदला घेऊ शकत नव्हते. आता जेव्हा मी शिक्षक आहे, तेव्हा माझ्या मनात त्या खोलवर गाडलेल्या दुखावलेल्या भावनांचा परिणाम म्हणून मी विद्यार्थ्यांविरुद्ध वारंवार तोच शब्द उच्चारत असते. माझ्या हातून ही फार मोठी चूक झाली आहे आणि त्याबद्दल मला खूप वाईटही वाटतंय. तू केलेल्या सूचनेबद्दल खूप खूप धन्यवाद. यापुढे मी पुन्हा कधीही ‘तो’ शब्द वापरणार नाही. आणखी एक गोष्ट मला सर्वांना सांगायची आहे की, मी जिथे जिथे उत्तरपत्रिकेत ‘मूर्ख’ हा शब्द लिहिला आहे तिथे मी दुरुस्ती केली आहे. ‘मूर्ख’ या शब्दाच्या आधी मी लिहिलं आहे, ‘अधिक अभ्यास कर, लक्षात ठेव की तू मूर्ख नाहीस.”

हेही वाचा – प्रत्येक चुकीला शिक्षा हा मार्ग नाहीच!

हे ऐकताच त्या तरुण शिक्षकाला खूप आनंद झाला. तो म्हणाला, “तुम्ही माझ्या बोलण्यावर विचार केलात, मी केलेली विनंती स्वीकारल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम. एक गोष्ट नक्की आहे की, पालक आणि शिक्षकांच्या नकारात्मक टिप्पण्यांचा मुलांच्या विकासावर दीर्घकाळ परिणाम होतो.”

(कै. डॉ. किशोर महाबळ यांच्या ‘You are stupid!’ या कथेचा आराधना जोशी यांनी केलेला हा स्वैरानुवाद)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!