कॉलेजमध्ये असताना परीक्षेच्या अगदी वेळेवर अभ्यास करून पास होणारा आमचा ग्रुप होता. मग काय, परीक्षेच्या दोन-चार दिवस आधीपासून रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा, असं आम्हा सर्व मैत्रिणींचं रुटीन होतं. ग्रुपमधली आमची एक मैत्रीण शीतल नेहमी सांगायची, “रात्री जेव्हा मी अभ्यास करते ना, तेव्हा माझे बाबा स्वतः बारा-एक वाजता उठून मला कॉफी करून आणून देतात. त्या कॉफीवर मग पुढचे दोन तास छान अभ्यास होतो.”
आम्हाला या गोष्टीचं फार अप्रूप वाटायचं. एक तर तिला रात्री बारा वाजता कॉफी मिळायची आणि तीही स्वतः वडिलांनी करून दिलेली! आमच्या ग्रुपमध्ये त्या मैत्रिणीचे वडील सोडले, तर बाकी कोणाचेच वडील कधी किचनमध्ये ओट्याजवळ उभे राहिलेले कोणाला आठवत नसावेत.
तेव्हा असो वा आता, स्वयंपाकघर ही प्रामुख्याने स्त्रीचीच जबाबदारी मानली गेली आहे, हे एक निर्विवाद सत्य आहे. पण मला कधी कधी वाटतं की, ही कामाची विभागणी नक्की कोणी आणि कशी करून दिली असेल? मानवी उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात पुरुषांची ताकद आणि आक्रमकता बघून शिकार करणे आणि कुटुंबाचे संरक्षण करणे ही कामं पुरुषांकडे दिली गेली असावीत आणि सहाजिकच अन्नाचे व्यवस्थापन तसेच मुलांची काळजी, हे काम स्त्रियांकडे आले असावे.
हेही वाचा – ती अन् तिचं स्वतंत्र अस्तित्व!
त्यानंतर हळूहळू अन्न शिजवणे, विविध पदार्थ बनवणे अशा प्रक्रिया सुरू झाल्या आणि स्त्रियांनी स्वयंपाकघर नावाचं एक स्वतंत्र राज्य स्वतःच्या घरात सुरू केलं असावं. परंतु सुरुवातीच्या काळात स्त्रियांनी या राज्यात पुरुषांना प्रवेश दिला नाही की, पुरुषांनी स्वतःच कधी त्यात प्रवेश केला नाही, हे कळत नाही. याच विभागणीतून पुरुषी कामं आणि बायकी कामं, असे स्तर पडले असावेत. स्त्रियांची कामं दुय्यम मानली गेली, पुरुषसत्ताक कुटुंब पद्धती अस्तित्वात आली आणि स्त्रियांच्या वाटेला एक चौकटबद्ध आयुष्य आले. हळूहळू ही चौकट थोडी धुसर झाली, स्त्री स्वयंपाकघरातून बाहेर पडली खरी, पण पुरुष मात्र आजही स्वयंपाकघरात म्हणावा तसा प्रवेश करू शकलेला नाही.
काही काळाने “पुरुषाच्या हृदयाचा रस्ता पोटाकडून जातो” असे काही विचार समाजात रुजले आणि स्त्री केवळ पुरुषाच्याच नाही, तर घरातील इतर सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी त्या ओट्याभोवतीच फिरत राहिली. स्वयंपाक करण्यापलीकडे रांधणे, उष्टी काढणे, भांडी घासणे इथपर्यंत हा परीघ विस्तारला गेला. हे सगळं एकवेळ ठीक होतं, पण घरातल्या पुरुषांना साध्या पाण्यासाठीही हाक मारण्याची सवय लागली, ही मानसिकता नेमकी कुठून आली? घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करणं समजू शकतं, पण घरातल्याच माणसाने साध्या पाण्यासाठी सुद्धा स्त्रीवर अवलंबून राहणं, हे स्वयंपाकघरापासून जास्तीत जास्त दूर राहण्याची वृत्ती दर्शवते का? हे कळत नाही.
लोक म्हणतात की, “स्त्री स्वयंपाक करताना सर्वात सुंदर दिसते,” परंतु मला असे वाटते की, स्वयंपाकघरात स्त्रीला मदत करणारा आणि तिच्या कामाचा सन्मान करणारा पुरुष हा खऱ्या अर्थाने सर्वात देखणा दिसतो.
हेही वाचा – सौंदर्याचा सुवर्णपाश!
पाण्याचा पेला
लग्नाआधी चारी ठाव स्वयंपाक करणाऱ्या माझ्या वडिलांना,
लग्नानंतर पाण्याचा पेला हातात मिळायला लागला…
कदाचित सुरुवातीला प्रेम असेल, आदर असेल,
दोघांनीही आपल्या घरात बघितलेलं चित्र असेल…
किंवा नातं बांधून ठेवण्यासाठी अवलंबित्वाच्या दोरीचा वापर असेल,
कधी थकलेल्या शरीराने,
कधी कंटाळलेल्या मनाने,
कधी दुखऱ्या गुडघ्यांनी…
कधी पेंगळालेल्या डोळ्यांनी
कधी आजारपणात कंबर मोडून,
कधी हातचं काम सोडून,
कधी नोकरीवरून येऊन,
कधी लेकरू कडेवर घेऊन…
कधी मागितल्यानंतर,
तर कधी मागण्याआधी,
ती हातात पेला देत राहिली…
आणि वडीलही…
तिचा तो निर्विकार होत जाणारा चेहरा, थकलेलं शरीर,
तिची ती लंगडणारी चाल, ओले हात
या सर्वांकडे दुर्लक्ष करीत
आयुष्यभर तिच्या हातून तो भरलेला पेला घेत राहिले…
आता तर वडील पाणी आणि पेला यांची जागाच विसरले आहेत
आणि आई स्वतःची!


