दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 15 जून 2026; वार : सोमवार
- भारतीय सौर : 25 ज्येष्ठ शके 1948; तिथि : अमावस्या 08:24, प्रतिपदा 28:31; नक्षत्र : मृगशीर्ष 19:09;
- योग : शूल 08:55, गंड 28:38; करण : किंस्तुघ्न 18:27;
- सूर्य : वृषभ; चंद्र : वृषभ 08:40; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:16;
- पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
अधिक मास समाप्ती
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
ज्येष्ठ साहित्यकार शंकर वैद्य
टीम अवांतर
ज्येष्ठ साहित्यकार, समीक्षक, शिक्षक, उत्तम वक्ते आणि सूत्रसंचालक अशी ओळख असणाऱ्या शंकर वैद्य यांचा जन्म 15 जून 1928 साली ओतूर येथे झाला. पुढे जुन्नरसारख्या गावी माध्यमिक शिक्षण घेऊन ते पुण्याला नोकरीसाठी स्थायिक झाले. आधी नागपूरच्या, नंतर पुण्याच्या आणि शेवटची वर्षे मुंबईच्या महाविद्यालयांमध्ये ते मराठीचे अध्यापन करत राहिले.
वयाच्या सहाव्या वर्षापासूनच शंकर वैद्य यांना कवितेची गोडी लागली. ‘कालस्वर’ हा पहिला काव्यसंग्रह होता. पहिल्या काव्यसंग्रहानंतर 27 वर्षांनी त्यांचा ‘दर्शन’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या दरम्यान अनेक मासिके आणि विशेषांकांमध्ये त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. अत्यंत सोप्या आणि सहजसुंदर शब्दांची निवड हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. अगदी नवखा वाचकही त्यांच्या काव्याशी पटकन जोडला जायचा. कालस्वर, दर्शन, बादली, आम्ही पालखीचे भोई आदी त्यांचे काव्यसंग्रह गाजले. आदित्य – कवी मनमोहन, प्रवासी पक्षी – कुसुमाग्रज, रसयात्रा या ग्रंथांचे संपादनही त्यांनी केले होते. ‘स्वरगंगेच्या काठावरती’ हे त्यांचे सर्वाधिक गाजलेले भावगीत होते. याशिवाय, आज हृदय मम विशाल, गुरुविण नाही दुजा आधार, या यमुनेच्या काठावरती, शतकांच्या यज्ञांतून उठली यासारख्या कविताही रसिकप्रिय झाल्या.
हेही वाचा – शिव आणि आरूच्या लग्नात दिनकररावांनी हुंडा म्हणून…
मनमिळावू आणि मदत करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे नवकवी आणि विद्यार्थ्यांचा कायम त्यांच्या भोवती गोतावळा असायचा. त्यांचे सूत्रसंचालन ऐकणे हा देखील रसिकांसाठी यादगार अनुभव असे. काव्य लेखानाशी निगडीत अनेक किस्से ते जसेच्या तसे वाचकांसमोर मांडायचे. पंडित हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यासमवेत ‘मोगरा फुलाला’ हा संतांच्या कलाकृतींवर आधारित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर वैद्य करत असे. संत ज्ञानेश्वर महाराज, त्यांची बहीण मुक्ताबाई आणि भाऊ निवृत्तीनाथ यांचे अभंग या कार्यक्रमातून सादर केले जात असे.
कविता, कथांसोबत गोष्ट धमाल नाम्याची, चिमणराव गुंड्याभाऊ यांसारख्या मराठी चित्रपटांची गाणी देखील शंकर वैद्य यांनी लिहिली होती. सॅन होजे येथे पार पडलेल्या पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, अनंत काणेकर पुरस्कार, कोकण मराठी साहित्य पुरस्कार, वाग्विलासिनी दीनानाथ प्रतिष्ठान पुरस्कार, भा. रा. तांबे पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ज्येष्ठ साहित्यिक पुरस्कार असे अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले होते. प्रसिद्ध लेखिका आणि समीक्षक सरोजिनी वैद्य या त्यांच्या पत्नी होत्या. योगायोगाची गोष्ट अशी की सरोजिनी बाईंचा जन्म दिवसही 15 जूनच होता. 23 सप्टेंबर 2014 रोजी शंकर वैद्य यांचे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – प्रत्येक टप्प्यावर काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. घाईने घेतलेल्या निर्णयांबाबत नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. जोडीदाराच्या भावना समजून घ्या. कुटुंबात तुमच्या मुलाच्या / मुलीच्या लग्नाशी संबंधित चिंता, हळूहळू सुटू शकतात. तयारीशिवाय कोणतेही नवीन काम सुरू करू नका. नोकरदारांनी इतरांच्या कामात लक्ष देण्याऐवजी स्वत:च्या कामाकडे लक्ष केंद्रीत करावे.
वृषभ – तुमच्या कष्टाचे फळ समाधान आणि भक्कम आर्थिक स्थिती देणारे ठरेल. घरी काही धार्मिक विधींचे आयोजन केले जाईल. घरातल्यांशी अनावश्यक वाद टाळा, कारण त्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो. संततीच्या संगतीकडे बारकाईने लक्ष द्या, याबाबत थोडासा निष्काळजीपणा भविष्यात अडचणी निर्माण करू शकतो. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी अचानक प्रवास करावा लागू शकतो, जो भविष्यात फायदेशीर ठरेल.
मिथुन – एखाद्या जुन्या कायदेशीर किंवा महत्त्वाच्या गोष्टीबद्दल चिंतित रहाल. नोकरदारांना वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल, चांगल्या कामाची प्रशंसाही होईल. मात्र महत्त्वाची कामे स्वतःच हाताळण्याचा प्रयत्न करा. इतरांवर जास्त अवलंबून राहणे हानिकारक ठरू शकते. वैयक्तिक बाबी प्रत्येकाशी शेअर करणे टाळा. तुमच्या कल्पना आणि सूचनांचा लोकांवर प्रभाव पडेल, मात्र प्रत्येकजण तुमचा हितचिंतक नाही हे देखील लक्षात ठेवा.
कर्क – इतरांच्या मदतीमुळे तसेच तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. बऱ्याच काळापासून रखडलेले प्रकल्प हळूहळू पुढे सरकतील. कामाच्या ठिकाणी बोलण्यात संयम राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण शब्द नातेसंबंध घडवू किंवा बिघडवू शकतात. आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. नवीन नोकरी किंवा संधीच्या शोधात असलेल्यांनाही आशेचा किरण दिसू शकतो.
सिंह – कामाच्या ठिकाणी काहीतरी नवीन करून पाहण्याचे विचार मनात येतील. या बदलांमुळे भविष्यात यश मिळू शकते. बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे निष्काळजीपणा टाळा. वेळीच वैद्यकीय सल्ला घ्या. घरच्याच जेवणाला प्राधान्य द्या. कुटुंबातील एखादी शुभ घटना आनंद घेऊन येईल. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात आणि स्पर्धात्मक प्रयत्नांमध्ये परिश्रम घेतील.
कन्या – कठोर परिश्रम आणि समर्पण तुमचा सर्वात मोठा आधार ठरतील आणि त्याचे सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. रखडलेली कामे पुढे सरकू लागतील. जीवनावश्यक वस्तू आणि सुखसोयी यावरील खर्च वाढू शकतो, परंतु यामुळे मानसिक समाधान मिळेल. जोडीदारासोबत क्वालिटी टाइम घालवाल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यामुळे नवीन लोकांशी ओळख होईल.
तुळ – प्रगती आणि समृद्धीची सकारात्मक चिन्हे बघायला मिळतील. प्रभावशाली व्यक्तींच्या भेटीमुळे भविष्यासाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत पुढे नेईल. मालमत्ता खरेदी करण्याचा किंवा गुंतवणूक करण्याचा विचारही करू शकता. कुटुंबाला दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणे महत्त्वाचे ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या शब्दांना महत्त्व दिले जाईल.
वृश्चिक – संयमाने आणि समजूतदारपणे वागणे महत्त्वाचे ठरेल. घाईत घेतलेल्या निर्णयांमुळे नुकसान होऊ शकते. तुमचा आत्मविश्वास आणि प्रभाव वाढेल. संततीला दिलेल्या पाठिंब्याचे कौतुक होईल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची किंवा छोटी कौटुंबिक सहल करण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे नात्यात ताजेपणा येईल. कामाच्या ठिकाणी आदर किंवा पदात वाढ झाल्याने आनंद मिळेल. विरोधकांपासून सावध रहा.
हेही वाचा – शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”
धनु – सावधगिरीने आणि समतोल राखत पुढे जाण्याची गरज आहे. व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. संततीच्या करिअरबद्दल थोडी चिंता वाटू शकते, परंतु योग्य सल्ल्याने त्यावर मार्ग काढू शकता. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तीकडून एखादी चांगली बातमी किंवा भेटवस्तू मिळू शकते. स्वतःच्या कामाबाबत निष्काळजी राहू नका, कारण मेहनतीमुळे तुमची ओळख निर्माण होणार आहे.
मकर – नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढेल, पण सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे तुम्हाला भावनिक बळ मिळेल. अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात, त्यामुळे आपल्या बजेटनुसार खर्च करणे उत्तम. कुटुंबातील सुरू असलेले वाद किंवा गैरसमज दूर झाल्यावर वातावरण शांत होईल. गाडी चालवताना सावधगिरी बाळगा. आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
कुंभ – नफ्याच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात, मात्र आततायीपणा टाळणे महत्त्वाचे आहे. नोकरी किंवा रोजगाराच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. नियोजित कामातून यश मिळेल. काहीतरी नवीन सुरू करण्याची कल्पना उत्तम आहे, त्यात हुशारीने गुंतवणूक करा. डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका. पाहुण्यांच्या आगमनाने घरी आनंद आणि सुख येईल.
मीन – काही आव्हानांचा सामना करावा लागेल, पण विश्वास आणि सकारात्मक विचार तुम्हाला त्यातून बाहेर पडायला मदत करतील. घरातील धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये सहभागी व्हाल, ज्यामुळे तुम्हाला मनःशांती मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास शारीरिक समस्या वाढू शकतात. कोणत्याही गोष्टीत घाई करू नका. संयमी प्रयत्नांनीच यश मिळते. तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल.


