भाग – 30
शिव आणि आकाश स्टडी रूममध्ये ऑफिसच्या एका महत्त्वाच्या कामाबद्दल चर्चा करत होते. “यार शिव, अंकल खरंच असं काही करतील… विश्वास बसत नाही यार! पैशासाठी कोणी इतकं कसं लालची आणि नीच असू शकत?”
जीवनने आत्ताच थोडया वेळापूर्वी आकाश आणि शिवला, शिवच्या बाबांनी सखाराम यांच्यासोबत या लग्नाच्या बदल्यात एका जमिनीची डील केली आहे, हे सांगितलं होतं. रामने आरूच्या नावे हायवे-टच पाच एकर जमीन घेतली होती. अगदी मोक्याची ती जमीन असल्यामुळे पुढे त्या जमिनीची करोडोंमध्ये किंमत मिळू शकणार होती आणि त्याच जमिनीवर दिनकररावांची नजर पडली होती. माहिती काढल्यानंतर कळलं की, ती जमीन सध्या सखाराम यांच्या नावे आहे. आरू अठरा वर्षं पूर्ण झाल्यावर ती जमीन तिच्या नावे करण्यात आली होती. तीच जमीन त्यांना आरूच्या लग्नाच्या हुंड्यापोटी मागितली होती.
तसंही आपली लेक एवढ्या मोठ्या घरात सून म्हणून जाणार आहे, जिथे तिला कशाचीच कमी नसणार आणि ती जमीन तिचीच आहे… असा विचार करून त्यांनी ही गोष्ट मान्य केली. पण रामला हे आवडणार नाही म्हणून त्याला कळू नये, असं ते म्हणाले. दिनकररावांनाही तेच हवं होतं.
शिव त्यांना ती जमीन घेऊ देणार नाही म्हणून ही गोष्ट त्या दोघांत राहणार होती. पण शिवची नजर सगळीकडे असते, अगदी घारीसारखी! त्या दोघांना लग्नात इतका वेळ एकत्र उभं राहून बोलताना पाहून त्याला संशय आला आणि जीवनला त्याने माहिती काढायला सांगितलं होतं.
आत्ता जीवन तेच सांगून निघून गेला होता. ते सगळं ऐकून आकाशला राग आला होता. आजच्या या काळातही दिनकर सरपोतदार यांच्यासारखे सुशिक्षित लोक पैशांसाठी हुंड्याची मागणी करत आहेत!
“सॉरी…” बोलता बोलता आकाशने शिवकडे पाहिलं आणि त्याची नजर पाहून आपण जरा जास्तच बोलून गेलो, ते आकाशला जाणवलं… तसं तो लहान आवाजात ‘सॉरी’ म्हणाला.
हेही वाचा – लीला आजीची रागीट नजर आरूवरच होती…
“तू का सॉरी म्हणतोय? बरोबरच बोलतोयस! राग तर मलाही खूप येतोय… पण बाबा आहेत ते! कितीही राग येत असला तरी काहीच करू शकत नाही… त्यांचे विचार आणि मेंटॅलिटी नाही बदलू शकत मी…” शिव सुस्कारा सोडत म्हणाला.
“पण मग आता?” आकाश.
“त्यांचे विचार बदलवणं माझ्या हातात नसलं तरी, त्यांचे इरादे सफल होऊ न देणं माझ्या हातात आहे. राहू दे त्यांना याच भ्रमात की, मला अंधारात ठेऊन त्यांनी त्यांची चाल खेळली आहे! बाकी ती जमीन मात्र आराधनाचीच राहील. तीच ठरवेल त्या जमिनीच काय करायचं ते. टेन्शन त्याचं नाहीय, टेन्शन तर आराधनाचं आहे…” शिव आरूचा चेहरा आठवत म्हणाला.
“म्हणजे? मला कळलं नाही, आरू वहिनीचं कसलं टेन्शन?” आकाशने न समजून विचारलं.
“तिला सगळ कळलंय…” असं म्हणत लग्नाच्या आदल्या दिवशी त्याचं आणि रामचं झालेलं बोलणं आणि दारात उभ्या आरूने ते सगळं एकलं… याची सविस्तर माहिती शिवने आकाशला दिली.
“म्हणजे, जिजूंना पण माहीत आहे आणि आरू वहिनीला पण? पण लग्न तर झालं ना! म्हणजे, वहिनीने जास्त मनावर नाही घेतलं वाटतं…”
“आय डोन्ट नो, यार! तिने हे सगळं कसं घेतलं… हे सगळं कळल्यानंतर तिच्या स्वभावप्रमाणे तिचं चिडणं एक्सपेक्टेड होतं… बट शी इज क्वाइट… काहीच रिॲक्ट नाही केलं तिने…” शिव गंभीर चेहरा करून म्हणाला.
“क्या बात है! अशी किती दिवसांची ओळख आहे तुमची हं? तिच्या स्वभावाबद्दल एवढं खात्रीने बोलतोय तू हां… ” आकाश भुवया उंचावत मिश्किल हसत म्हणाला.
शिवला पण हासू येत होतं. तो कसबस तोंडावर हात ठेऊन त्याची स्माइल दिसू न देण्याचा प्रयत्न करत होता…
“क्या बात है… शिव तू लाजतोयस! हाय मेरा यार गया काम से…” आकाशला तर संधीच मिळाली होती त्याला पिडण्याची!
“शट अप आकाश…” असं म्हणत शिव मोकळेपणाने हसला.
त्याला असं हसताना पाहून आकाश मात्र भावूक झाला. परदेशातून आल्यापासून त्याने शिवला अस हॅप्पी बघितलंच नव्हतं. सतत राग चेहऱ्यावर घेऊन फिरत होता… स्वतःला कामात झोकून दिलं होतं. पण या काही दिवसांत त्याच्यात झालेला बदल आकाशच्या लक्षात आला होता. तो शिवसाठी खरंच खूश होता. त्याने पुढे होऊन शिवला मिठी मारली आणि शिव हसायचा थांबला. पण पुन्हा नॉर्मल होत त्याने त्याच्या हात पाठीवर ठेवले.
“असाच नेहमी हसत रहा यार… भारी दिसतोस…” आकाश.
“हं चल बास झाल आता… सुट्टया संपल्या, आता ऑफिस जॉईन करा उद्यापासून. खूप सारी कामे पेंडिंग आहेत.”
“हां, स्वतःही काही एन्जॉय नको करू आणि दुसऱ्याला पण करू देऊ नकोस! पूर्ण लग्नभर तू मला ऑफिस आणि घर अशा दोन्ही कामात गुंतवून ठेवलंस! याचा बदला घेतला जाईल लक्षात ठेव,” आकाश गाल फुगवून लटक्या रागात म्हणाला.
तो तसं म्हणाला आणि दारातून मोठमोठ्याने हसण्याचा आवाज आला. तसं दोघांनी दाराच्या दिशेने पाहिलं तर, आरू खळखळून हसत होती… त्यात भावनाही तिला साथ देत होती.
“अरे वहिनी, तुम्ही?” आकाश त्यांना म्हणाला.
“ओ दादा, कसले भारी दिसत होता तुम्ही ते गाल फुगवलले…” आरू अजूनही हासत होती.
आकाशला उगाच ओशाळल्यासारखं झालं होतं… त्याने केसात हात फिरवत अवघडल्यागत आरूकडे पाहिलं.
“सॉरी…” आरु त्याचा चेहरा पाहून आपलं हसू आवरात म्हणाली आणि तिची नजर त्याच्या शेजारी उभ्या शिवकडे गेली अन् आता तिचं उरलंसुरलं सगळंच हसू गायब झालं… आणि चेहरा निर्विकार झाला. डोळ्यांत राग होता आणि पाणीही जमा झालं.
आतापर्यांत तिच्या निरागस मनमोकळ्या हसण्यात हरवून, एकटक तिच्याकडे पाहणाऱ्या शिव याला चेहऱ्यावरचा हा बदल लगेच जाणवला आणि त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या… त्याच्या लक्षात यायला जास्त वेळ नाही लागला की, नक्कीच खाली काहीतरी झालंय. तो काही बोलणार तोच
“ताई, मला झोप आलीय… चल ना जाऊ,” असं म्हणून आरू पुढे निघूनही गेली.
“वहिनीला अचानक काय झालं? अशा का निघून गेल्या?” आकाश म्हणाला.
“डोन्ट नो! चल खाली जाऊन बघू,” म्हणत शिव बाहेर जायला निघालाही… आकाश त्याच्या मागे गेला.
खाली हॉलमध्ये आजी सोफ्यावर बसून बडबड करत होत्या आणि सुधा मावशीच्या मदतीने डायनिंग टेबल आवरात होत्या.
“काय उद्धट पोरगी आहे ही! मोठ्यांचा आदर करायची माहिती नाही, काय हे संस्कार आहेत? आत्तापासूनच चुरू चुरू जीभ चालवतेय…”
शिव आला तसं आजीने शब्द आवरते घेतले. कारण तो नजर रोखून त्यांच्याकडे पाहात होता. सुधा पण तिथे आल्या… समर पण कॉल संपवून मोबाईल खिशात ठेवत तिथे आला…
“काय झालं इथे? का बडबड सुरू आहे आजी तुझी?” शिवने धारदार आवाजात विचारलं.
“आता तू तुझ्या आजीला प्रश्र्न विचारणार का? हेच शिकला का तू परदेशात जाऊन?” आजीने त्याला प्रत्युत्तर दिलं.
“आजी प्रॉब्लेम काय नेमका तुमचा?” आधीच दिनाकरवांनी जे केलं त्याचा राग डोक्यात होता आणि वरून आजीचंही असं वागणं… त्याला इरिटेट होऊन आणकी चिडायला पुरेसं होतं.
“शिव अरे काही नाही, तू कशाला लक्ष देतो त्यांच्याकडे… शांत हो आणि जाऊन आराम कर बरं! आनंदाच्या प्रसंगी घरात वाद नकोत…” सुधा त्यांच्याजवळ येत म्हणाल्या.
“बट… मॉम…” शिव.
“जा म्हटलं ना… आई तुम्ही पण चला, खूप उशीर झाला आहे,” सुधाने त्याला जायला सांगून लीला आजीला रूममध्ये घेऊन गेल्या.
“शिव, सोड ना… नको लक्ष देऊस! जाऊन आराम कर. मागच्या काही दिवसांत तुझीही खूप धावपळ झाली आहे… आणि हो, अजून दोन दिवस ऑफिसला येऊ नकोस, ऑफिसची काळजीही करू नकोस. चल, मी निघतो बाय…” आकाश त्याला मिठी मारत म्हणाला आणि बाय करून निघाला.
0000
“आरू, अगं काय चाललंय तुझं रात्रभर झोपली नाहीस तू आणि मलाही झोपू दिलं नाहीस! आता जमिनीवर लोळत पडलीस… उठणार आहेस का आता तू? तुझ्या सासूबाई येऊन गेल्या एकदा… खोट बोलून दारातूनच पाठवल मी त्यांना… उठणार आहेस का आता, का घालू पाठीत लाथ!” जमिनीवर झोपलेल्या आरूला उठवण्याचा प्रयत्न करत भावना म्हणाली.
“ताई झोपू दे ना गं! एक तर तो एसी आणि आणि त्या बेडवरची ती मऊ लुसलुशीत गादी… कशी झोप येणार सांग बरं? सवय नाही मला. झोप नाही आली मला नव्या जागेत…” आरू कशीबशी आळस देत उठून मांडी घालून बसत म्हणाली.
“आरू अगं, काकूंनी सांगितलं आहे की, सकाळी लवकर पूजा आटपून तुला आणि भाऊजीला कुलदेवीच्या दर्शनाला जायचं आहे… त्याचमुळे तू तुझं आवरून पटकन चल,” भावना तिला हाताला धरून उठवत म्हणाली.
“यार… ताई,, आजच पूजा आहे! आपल्या इकडे तर…”
“आपल्या इकडे काय होतं, ते ठेव तुझ्याजवळच! आणि उगाच या गोष्टीला धरून खाली गेल्यावर काही बोलू नकोस… रात्री बघितलंस ना, तुझ्या आजे सासूबाईंना अजिबात आवडलं नाही तुझं बोलणं” भावना तिच बोलणं थांबवत म्हणाली.
रात्रीबद्दल तर बोलूच नको ताई! त्यात माझी अजिबात चूक नव्हती. त्या माझ्या वहिनीबद्दल बोलत होत्या आणि तेही चुकीचं… जे मी अजिबात खपवून घेणार नाही! मला तर या गोष्टीचं टेन्शन आलंय की, वहिनी यांची नात आहे तरीही त्या त्यांच्याबद्दल अस बोलत होत्या, असे विचार मनात ठेवत्यात… आई किंवा इतर कोणी वहिनीला वाईट वाटेल असं बोललं तर…” आरूला तिच्या गावाकडील लोकांचे विचार आणि त्याचा आपल्या आईवर होणारा परिणाम लक्षात घेता खरंच टेन्शन आणि भीती वाटू लागली.
“आरू गं काय विचार करतेस? दादा माहीत नाही व्हय तुला कसा आहे ते… तो घेईल सगळं सांभाळून,” भावना तिला समजावत म्हणाली.
0000
इकडे राम सिया पहाटेच गावी निघाले होते आणि आता वाटेत होते.
“राम आरं, गावात पोचल्यावर गाडी आपल्या दारात थांबिव आणि आम्हाला उतरून तुम्ही पुढं जाऊन मारुतीचं दर्शन घेऊन या…” पुढे बसलेल्या कलावती, रामला म्हणाल्या.
“मामी मी थांबवणारच होतो गाडी दारात…” पवन म्हणाला.
रामचं घर गावाच्या बाहेर शेतात होतं आणि रस्त्याला लागून होतं. पुढे गावात मारुतीचं मंदिर, जिथे नवरदेव आणि नववधू आधी दर्शन करून मगच घरी येत. त्यानंतर दारातच भाकर तुकडा ओवाळून त्यांचं स्वागत केलं जाणार.
म्हणून मग पवनने आधी गाडी घराकडे घेतली… तिथेच आत्या मामा-मामी बाकी उतरले आणि पवन, पूर्वी राम, सिया मंदिराकडे गेले.
पूर्वी आणि सियासाठी गाव काही नवीन नव्हते… तिथले लोक, तिथलं राहणीमान त्या दोघींच्या पाहण्यातलं होतं… त्यांच्या गावी नेहमी जाणं असायचं त्यांचं… समर, पूर्वीचे आई-बाबा गावाकडे शेतीच करायचे. पण जास्ती काम तर मजूर लावून केलं जायचं… गावी असूनही हाताखाली नोकर-माणसे होती… त्यांच्या गावी त्यांच्या घराण्याचा मान होता. कोणाचीही सोयरिक एव्हढ्या गरीब घरात झालेली नव्हती, त्याचमुळे राम आणि सियाच्या प्रेमाला तिच्या बाबांचा विरोध होता…
हेही वाचा – आता पूर्वी अन् पवनची प्रेमकहाणी फुलू लागली…
पण आता परिस्थिती वेगळी होती. एका घटस्फोटित मुलीशी कोण लग्न करणार म्हणून आजीने या लग्नात काही आडकाठी आणली नाही. पण आरू आणि शिवचं लग्न मात्र त्यांना रूचलेलं नव्हतं.
सिया मुलगी होती, ती दुसऱ्याच्या घरी जाणार होती. तसंही मुलगी ही परक्याचं धन असते, असेच लीला आजीचे विचार होते. पण आपल्या घरात येणारी सून ही खानदानी आणि उच्च घराण्यातीलच असावी, असंच त्यांना वाटत होत. शिवने आरूशी लग्न करून आपल्या इच्छेचा अपमान केला आहे, असंच त्यांना वाटत होतं.
“दादा, वहिनी उतरा… आलं मंदिर,” पवनने गाडी थांबवत, राम आणि सियाला सांगितलं आणि स्वतःच्या बाजूचं दार उघडून बाहेर आला.
राम पण खाली उतरला आणि सियाला खाली उतरण्याचा इशारा करत तिच्यासमोर हात केला, तिनेही हलकं हसून त्याच्या हातात हात दिला आणि खाली उतरली.
तिची आजूबाजूला नजर गेली तर मंदिराच्या आवारात बायका, लहान मुले, मुली जमले होते आणि त्यांच्याकडेच कुतूहलाने पाहत होते.
“हे… हे सगळे आपल्याकडे असे का पाहात आहेत?” सियाने आजूबाजूला नजर फिरवत अवघडून रामला विचारलं.
“नवल… नव्या नवरीचं नवल वाटत आहे त्यांना! तुला पाहण्यासाठी जमलेत सगळे आणि एवढी सुंदर नवरी आजपर्यंत पाहिली नाही त्यांनी म्हणून कुतूहलाने पाहात आहेत सगळे,” राम तिच्या कानापाशी झुकून म्हणाला.
तो तिच्या दिसण्याच कौतुक करत आहे, हे जाणवून सियाचे गाल लाल झाले आणि तिने लाजून नजर खाली घातली. ओठात लाजरं हसू खेळवत ती साडीच्या पदरासोबत चाळा करू लागली.
“इथंच उभं राहायचं का? चला ना पुढे,” त्या दोघांना गाडीतून उतरल्यावर नुसतं उभं राहिलेलं पाहून पवन म्हणाला.
“हां, जातोय ना अन् तू कुठं होता…” राम त्याला लटक्या रागात म्हणाला आणि सियाला चालण्याचा इशारा केला.
“ओ… मी राहीले ना,” पवन राम आणि सियाच्या मागे निघाला तोच मागून पूर्वीचा आवाज आला.
पवनने मागे वळून पाहिले आणि डोक्यालाच हात लावला…


