हाजमोलाची ती टीव्हीवरील जुनी जाहिरात आठवली की, आजही चेहऱ्यावर नकळत हसू फुलतं. रात्रीच्या अंधारात हॉस्टेलच्या बेडवर लपूनछपून ती चटपटीत गोळी खाणारी मुलं, आणि अचानक गुरुजी आल्यावर घाबरून “हाजमोला, सर!” म्हणणारा तो निरागस चेहऱ्याचा मुलगा… हाजमोला म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची आणि तोंडाला चव आणणारी एक मज्जाच होती.
पण आज सकाळी जेव्हा चहाचा घोट घेत घेत मी हातात वर्तमानपत्र घेतलं आणि बातम्या वाचायला सुरुवात केली, तेव्हा ती जुनी आठवण आणि शेजारीच डायनिंग टेबलवर ठेवलेली हाजमोलाची बाटली एका वेगळ्याच वास्तवात घेऊन गेली.
वर्तमानपत्रात बातमी एका मोठ्या, नामांकित ब्रँडची होती — ज्या ‘डाबर’ कंपनीवर पिढ्यानपिढ्या लोकांनी डोळे बंद करून विश्वास ठेवला, जी कंपनी वर्षानुवर्षे ‘शुद्धतेची हमी’ देते म्हणून घराघरांमध्ये पोहोचली, आज तीच कंपनी गुणवत्तेच्या आणि शुद्धतेच्या दाव्यांवरून प्रश्नांच्या फेऱ्यात अडकली होती.
ती बातमी वाचली आणि नकळत माझी नजर डायनिंग टेबलवर ठेवलेल्या त्याच कंपनीच्या हाजमोलाची गोळी, मध आणि तुपाच्या पॅकेटवर गेली.
काही दिवसांपासून जेवणानंतर अपचन झालं की, एक हाजमोलाची गोळी तोंडात टाकायची आणि विषय संपायचा. पण त्या दिवशी तो चहा, वर्तमानपत्रातील ती बातमी आणि समोर ती हाजमोलाची बाटली पाहून माझं मन सुन्न झालं. नेहमीप्रमाणे ती गोळी हातात घेतली खरी, पण ती तोंडात टाकायची हिम्मतच झाली नाही. गोळी न खाताच माझं पोट बिघडल्यासारखं वाटू लागलं. पण सत्य हे होतं की, ते अपचन पोटाचं नव्हतं… ते विश्वासाचं होतं! आपण रोज ज्या गोष्टींवर डोळे बंद करून विश्वास ठेवतो, ती प्रत्येक गोष्ट जर अशीच डळमळीत निघणार असेल, तर माणसाने जगायचं कसं?
रोजच्या जेवणात, खाण्यापिण्यात जी फसवणूक होते, ती आता कोणाला वेगळी सांगायला लागत नाही. अन्नातील ही भेसळ आता आपल्याला न सांगताही चटकन कळून येते. भाजी असो, दूध असो, तेल असो किंवा साधी मसाल्याची पूड असो… भेसळ ही आता आपल्या रोजच्या ताटात येऊन बसली आहे. आज बाजारात मिळणाऱ्या अनेक गोष्टींवरून पडदा बाजूला सारला की, आपण काय खातोय आणि कशावर विश्वास ठेवतोय, हा मोठा प्रश्न उभा राहतो.
हेही वाचा – थकलेल्या जीवाला नवा श्वास देणारे शब्द…
त्या बाटलीकडे बघताना माझ्या मनात तोच जुना प्रश्न पुन्हा घर करून बसला — मुळात या जगात फसवणुकीचा शोध कोणी लावला असेल?
इतिहासात प्रत्येक छोट्या-मोठ्या शोधाची नोंद आहे. चाकाचा शोध कोणी लावला, आगीचा शोध, विजेचा शोध, औषधांचा शोध, अगदी इंटरनेटचा शोध… प्रत्येक शोधामागे एक नाव आहे, एक इतिहास आहे. पण जगात सर्वाधिक वापरला जाणारा आणि माणसाच्या जिव्हारी लागणारा एकमेव शोध असा आहे, ज्याचा शोधकर्ता आजपर्यंत कोणालाच माहीत नाही… तो म्हणजे ‘फसवणूक’!
त्या पहिल्या माणसाच्या मनात नेमकं काय आलं असेल? त्याने पहिल्यांदा कोणाला फसवलं असेल? दोन पैसे जास्त मिळावेत म्हणून? लोकांचा विश्वास जिंकून त्याचा गैरफायदा घ्यावा म्हणून? की फक्त “एकदा करून बघूया काय होतं ते” या सहज भावनेतून? त्याला तेव्हा थोडीतरी कल्पना होती का, की त्याने पेरलेलं हे छोटंसं बीज एक दिवस एवढं वाढेल की, संपूर्ण जगाला अजगरासारखा विळखा घालेल!
आज फसवणूक फक्त पैशांपुरती उरलेली नाही. ती अन्नात आहे, औषधांत आहे, टीव्हीवर आणि वर्तमानपत्रातील झगमगत्या जाहिरातींमध्ये आहे, ऑनलाइन खरेदीत आहे, मोबाइलवर चमकणाऱ्या एखाद्या अज्ञात लिंकमध्ये आहे, नोकरीच्या नावाखाली आहे, धर्माच्या नावाखाली आहे, नात्यांमध्ये आहे, मैत्रीत आहे, प्रेमात आहे… आणि या सगळ्यांपेक्षा जास्त, जिथे जिथे माणूस उभा आहे, त्या प्रत्येक विश्वासात ती आहे. आज एखादी साधी वस्तू विकत घेतानाही आपण तिची किंमत विचारण्याआधी, तिच्यावर विश्वास ठेवावा की नाही, हा विचार करतो.
अशा वेळी मला नेहमी गौतम बुद्धांची ती प्रसिद्ध गोष्ट आठवते. एका आईचा एकुलता एक मुलगा मरण पावला. दुःखाने वेडी झालेली ती स्त्री बुद्धांकडे गेली आणि म्हणाली, “माझा मुलगा मला जिवंत करून द्या.” बुद्धांनी तिला थेट नकार दिला नाही, ते शांतपणे म्हणाले, “जा… ज्या घरात आजपर्यंत कधीच मृत्यू झालेला नाही, त्या घरातून मूठभर मोहरी घेऊन ये.” ती स्त्री आशेने गावभर फिरली. प्रत्येक घरात मोहरी होती, पण मृत्यू नसलेलं एकही घर तिला मिळालं नाही. अखेर तिला समजलं की, असं दुःख हे प्रत्येकाच्याच घरी आहे.
आज मला वाटतं, जर बुद्धांनी मला असं सांगितलं असतं — “जा… ज्या घरात आजपर्यंत कधीच फसवणूक झालेली नाही, त्या घरातून एक मूठभर विश्वास घेऊन ये,” तर मीही त्या स्त्रीसारख्याच रिकाम्या हाताने परत आले असते…
मी एका घरात गेले असते, तर तिथे कळलं असतं की, कुणी ऑनलाइन फसवल गेलंय. दुसऱ्या घरात गेल्यावर समजलं असतं की, बनावट वस्तू मिळाली आहे, तिसऱ्या घरात भागीदाराने घात केलाय, चौथ्या घरात नातेवाईकांनी विश्वासघात केलाय, पाचव्या घरात प्रेमात फसवणूक झालीये, सहाव्या घरात खोट्या जाहिरातींनी लुबाडलंय, आणि अगदी माझ्यासारखंच आठव्या घरात अन्नात किंवा औषधात भेसळ झाल्याचं दुःख लोकांनी मांडलं असतं. मी देश पालथा घातला असता, पण “आमच्या घरी कधीच फसवणूक झाली नाही,” असं छातीठोकपणे म्हणणारं एकही घर मला सापडलं नसतं.
तेव्हा मला जाणवलं, आज आपला बाजार म्हणजे फक्त वस्तू विकण्याची किंवा खरेदी करण्याची जागा राहिलेली नाही. अनेकदा तो बाजार माणसाच्या विश्वासाची परीक्षा घेणारा अड्डा बनला आहे. आज माणूस नुसती वस्तू विकत घेत नाही, तो विश्वासाचा सौदा करतोय. आणि जेव्हा त्या विश्वासाला तडा जातो, तेव्हा खरं नुकसान पैशांचं नसतं… ते मनाचं असतं.
आज जर कधी त्या पहिल्या फसवणूक करणाऱ्या माणसाची माझी भेट झाली, तर मी त्याच्यावर बिलकूल रागावणार नाही. मी फक्त त्याच्यासमोर उभी राहून म्हणेन —
“मित्रा… तू सुरू केलेला हा खेळ इतका मोठा होईल, याची तुला कल्पना तरी होती का? आज तुझ्या एका खोट्या कृतीमुळे, प्रामाणिक माणसालाही पावलोपावली स्वतःची प्रामाणिकता सिद्ध करावी लागते. हीच या जगाची सर्वात मोठी शोकांतिका आहे.”
हेही वाचा – पोळी बदलली… आणि विचारही!
समोर ठेवलेली ती हाजमोलाची बाटली अजूनही तशीच डायनिंग टेबलवर चमकतीये. पण आता तिच्याकडे बघून पोटाचं नाही, तर मनाचं अपचन झाल्यासारखं वाटतंय. कारण फसवणुकीचा हा प्रवास आता आपल्या जेवणाच्या ताटापर्यंत आणि रोजच्या खाण्यापिण्यापर्यंत पोहोचलाय, आणि खरी भीती यायचीच आहे.
आता शेवटी हाच प्रश्न मनात वारंवार येतो — या फसवणुकीचा नेमका शेवट कसा करायचा? आणि पुन्हा एकदा स्वच्छ, निर्मळ आयुष्य कसे जगता येईल?
याचे उत्तर कोणा दुसऱ्याकडे नाही, तर आपल्या स्वतःच्याच मनामध्ये लपलेलं आहे. फसवणुकीची ही साखळी तोडण्यासाठी जगाला बदलण्याची गरज नाही, तर स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. आपण स्वतः कोणाशीही वागताना प्रामाणिक राहणे, प्रत्येक गोष्टीवर डोळे बंद करून अंधविश्वास ठेवण्याऐवजी तारतम्य बाळगणे आणि आपल्यातील चांगुलपणा जिवंत ठेवणे, हाच एकमेव उपाय आहे.
दुसऱ्याने आपल्याला फसवले तरी आपण आपला मूळ स्वभाव आणि मनाचा निर्मळपणा सोडायचा नाही, कारण अंधार कितीही गडद असला तरी, एक छोटीशी पणती सुद्धा प्रकाश पाडू शकते. संशयाच्या या धुक्यातून बाहेर पडून पुन्हा विश्वासाचा नवा सूर्य उगवायचा असेल, तर मनाचा हा कठोर संशय बाजूला सारून माणुसकीवरचा विश्वास पुन्हा एकदा जागा करावाच लागेल. तरच हे आयुष्य पुन्हा एकदा सुंदर, स्वच्छ आणि निर्मळ होऊ शकेल!


