विदर्भ हा त्याच्या काही वैशिष्ट्यपूर्ण प्रथा आणि परंपरांमुळे विशेष नावाजलेला प्रांत आहे. या भागातील जिल्ह्यांमध्ये प्रदेश रचनेनुसार लोकप्रथा आणि त्यांच्या कलासंस्कृती आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजऱ्या केल्या जातात. नागपूरमधील पोळ्याच्या दिवशी काळी/ पिवळी मारबत आणि बडग्यांची मिरवणूक ही जशी एक विशेष परंपरा आहे, त्याचप्रमाणे ‘हाडपक्या गणपती’ ही सुद्धा विदर्भातील एक निराळी प्रथा आहे. 2026 हे या मस्कऱ्या किंवा हाडपक्या गणपतीचे 239वे वर्ष असे आयोजकांकडून सांगण्यात आले. 27 सप्टेंबरला या गणरायाचे नागपूर आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांत आगमन झाले आहे. नागपुरातील सीनियर भोसले वाड्यात भाद्रपदातील गणपतीच्या अनंत चतुर्दशीच्या विसर्जनानंतर हाडपक्या गणपतीची स्थापना होते. पितृपक्षात सर्व धार्मिक कार्य, उत्सव बहुतेक निषिद्ध असतात; परंतु नागपुरात/ विदर्भात हाडपक्या गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
या गणेशोत्सवाचा भोसले राजघराण्याशी जोडलेला ऐतिहासिक वारसा आणि पार्श्वभूमी मोठी रंजक आहे. नागपूरकर भोसल्यांनी आपल्या पराक्रमाने महाराष्ट्रातील वऱ्हाडापासून पश्चिम बंगाल आणि ओडिशापासून उत्तर प्रदेशापर्यंत आपले साम्राज्य विस्तारले होते. हे एवढं मोठं विस्तीर्ण राज्य जिंकण्यासाठी नागपूरच्या शासकांनी अनेक लढाया लढल्या आणि त्या जिंकल्यासुद्धा! अशाच एका पराक्रमी लढाईमुळे या हाडपक्या गणपतीची सुरुवात झाली आहे. इ. स. 1755मध्ये नागपूरकर भोसले घराण्यातील तत्कालीन राजे श्रीमंत खंडोजी महाराज भोसले (तथा चिमनाबापू) बंगालच्या स्वारीवर होते. बंगालवर ऐतिहासिक विजय मिळवून परत येत असताना त्यांच्या कुटुंबात साजऱ्या होणाऱ्या कुळातील गणपतीचे विसर्जन झाले होते. त्यामुळे श्रीमंत खंडोजी महाराज भोसले गणपती उत्सव साजरा करू शकले नाहीत. त्यावेळी राजपुरोहित आणि अन्य विद्वानांसोबत चर्चा करून पितृपक्षातील भाद्रपद कृष्ण चतुर्थीला (भाद्रपद संकष्ट चतुर्थीला) गणपती उत्सव साजरा करण्याचे ठरविले आणि त्यासोबत बंगालवर ऐतिहासिक विजय मिळविल्याचा आनंदोत्सवसुद्धा सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याचे ठरविले.
हेही वाचा – नागपूरची प्रसिद्ध काळी पिवळी मारबत!
श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले यांच्या काळात हाडपक्या गणपतीची 12 हातांची, वीर भद्रासनातील 21 फूट उंच मूर्ती स्थापन केली जात असे. आजही याच प्रकारची भव्य मूर्ती स्थापन करण्यात येते. आजही ‘हाडपक्या गणपती’ उत्सवाचा मुख्य सोहळा नागपुरातील सीनियर भोसले राजवाडा, महाल येथे आयोजित केला जातो. हा उत्सव भाद्रपद गणेश विसर्जन झाल्यानंतर पितृपक्षात 10 ते 11 दिवस चालतो. या दरम्यान भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. भाद्रपद कृष्ण द्वादशीला गणपती उत्सवाची सांगता होऊन हाडपक्या गणपतीचे विसर्जन केले जाते.
आजच्या काळातील समाजातील चालू घडामोडी, राजकारण किंवा महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणारे देखावे, समाजप्रबोधनपर कार्यक्रम आणि व्याख्याने या 10-11 दिवसांच्या उत्सवात आयोजित केली जातात. बदलत्या काळानुसार आणि नवीन पिढीचा उत्साह लक्षात घेऊन कार्यक्रमांच्या स्वरूपात काही आधुनिक बदलही करण्यात आले आहेत – लोकप्रिय गाणी, सुगम संगीत आणि वाद्यवृंदाचे (Orchestra) कार्यक्रम, सामाजिक संदेश देणारी लहान नाटके आणि पथनाट्यांद्वारे समाजप्रबोधन.
‘हाडपक्या’ वरून ‘मस्कऱ्या’ गणपती या नावापर्यंतचा प्रवास जाणून घेण्यासारखा आहे. पूर्वी या गणेशोत्सवामुळे तळागाळातील कलाकारांना आपले कौशल्य राजघराण्यासमोर सादर करण्याची संधी मिळून त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळत असे. त्या काळात अनेक गंमतजमतीचे कार्यक्रम या गणेशोत्सवात होत असत, ज्यात थट्टा-मस्करी इत्यादींचा भडीमार होत असे. याच मस्करीचा अपभ्रंश होऊन ‘मस्कऱ्या’ हे स्थानीय बोलीभाषेतील नाव प्रचलित झाले. या गणपतीला ‘मस्कऱ्या’ (म्हणजे उपरोधात्मक किंवा चेष्टा करणारा) हे नाव पडण्यामागे सामाजिक कारण देखील आहे. याचमुळे पितृपक्षातील या गणपतीला ‘मस्कऱ्या गणपती’ किंवा विदर्भातील भाषेनुसार ‘हाडपक्या गणपती’ हे नाव प्राप्त झाले (विदर्भात पितृपक्षाला ‘हाडपक’ असे म्हणतात).
नागपूरच्या शासकांनी सुरू केलेल्या या उत्सवाला पूर्व विदर्भातील लोकांनी आपलंसं केलं आहे. नागपूरसह चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मस्कऱ्या गणपतीची स्थापना केली जाते आणि हा गणेशोत्सव थाटामाटात साजरा केला जातो.
निलजमधील गणेशोत्सवाचे आकर्षण
भंडारा जिल्ह्यातील निलज (बु.) गावातील 35 वर्षांची हाडपक्या गणपतीची प्रथाही विशेष उल्लेखनीय आहे. पूर्वी विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमधील शहरांमध्ये तसेच खेडोपाडी साजरा होणारा हा गणेशोत्सव आता काही जिल्ह्यांमध्येच मर्यादित प्रमाणात साजरा केला जातो. भोसले वाड्यातील या हाडपक्या गणपतीनंतर याच गणेशोत्सवाची प्रथा भंडारा जिल्ह्यातील निलज (बु.) या गावात नावारूपास आली.
हेही वाचा – विदर्भातील आठवीची पूजा!
मोहाडी तालुक्यातील निलज (बु.) हे सुमारे तीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. 1983पासून या गावात मस्कऱ्या गणेशोत्सव मंडळ स्थापन करून पितृपक्षात गणपती बसवण्याची परंपरा सुरू झाली. 1983 साली या गावातील पहिला गणपती दिवंगत कवडू बडगे यांच्या अंगणात स्थापन करण्यात आला होता. काही वर्षांच्या खंडानंतर 1991पासून गावकऱ्यांनी पुन्हा पुढाकार घेऊन हा उत्सव सुरू केला आणि तो आजपर्यंत अविरत सुरू आहे.
यानिमित्ताने गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते – जसे रांगोळी स्पर्धा आणि मैदानी खेळ, दांडपट्टा आणि संगीत नाटक, तमाशा, कव्वाल्या, भजन तसेच कीर्तन इत्यादी. शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील या उपक्रमातून सादर केले जातात.
थोडक्यात सांगायचे तर, भोसले वाड्यातील हाडपक्या गणेशोत्सव हा आजही भक्ती, पारंपरिक लोककला आणि आधुनिक मनोरंजनाचा एक उत्तम मिलाफ म्हणून नागपूर आणि विदर्भाच्या सांस्कृतिक जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे. यशस्वी मोहिमेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीतून हा क्रांतिकारी निर्णय घेतला गेला, जो नंतर लोककला, समाजप्रबोधन व सांस्कृतिक समृद्धीचा सर्वात मोठा पाया ठरला.


