अध्याय चौदावा
ऐसे चारी हे सरळ । करचरणतळ । महाप्रकृति स्थूळ । तेंचि शिर ॥103॥ प्रवृत्ति पेललें पोट । निवृत्ति ते पाठी नीट । सुरयोनी आंगें आठ । ऊर्ध्वाचीं ॥104॥ कंठु उल्हासता स्वर्गु । मृत्युलोक मध्यअर्धभागु । अधोदेशु चांगु । नितंबु तो ॥105॥ ऐसें लेकरूं एक । प्रसवली हें देख । जयाचें तिन्ही लोक । बाळसें गा ॥106॥ चौऱ्यांशीं लक्ष योनी । तियें कांडां पेरां सांदणी । वाढे प्रतिदिनीं । बाळक हें ॥107॥ नाना देहअवयवीं । नामाचीं लेणीं लेववी । मोहस्तन्यें वाढवी । नित्य नवेन ॥108॥ सृष्टी वेगवेगळीया । तिया करांघ्रीं आंगोळियां । भिन्नाभिमान सूदलिया । मुदिया तेथें ॥109॥ हें एकलौतें चराचर । अविचारित सुंदर । प्रसवोनि थोर । थोरावली ॥110॥ पै ब्रह्मा प्रातःकाळु । विष्णु तो माध्यान्ह वेळु । सदाशिव सायंकाळु । बाळा यया ॥111॥ महाप्रळयसेजे । खिळौनि आले निदिजे । विषमज्ञानें उमजें । कल्पोदयीं ॥112॥ अर्जुना यापरी । मिथ्यादृष्टीचां घरीं । युगानुवृत्तीचीं करी । चोज पाउलें ॥113॥ संकल्पु एयाचा इष्टु । अहंकारु तो विनटु । ऐसिया होय तैं शेवटु । ज्ञानें यया ॥114॥ आतां असो हे बहु बोली । ऐसें विश्व माया व्याली । तेथ जांघु जाली । माझी सत्ता ॥115॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जैसा रंकु भ्रमला, म्हणे जा रे मी रावो आला
अर्थ
या प्रमाणे ह्या चार भूतयोनी, हे ज्याचे सरळ चार हात व पाय आहेत व स्थूल जी महाप्रकृती हे (ज्याचे) मस्तक आहे ॥103॥ प्रवृत्ति हे ज्याचे पुढे आलेले पोट आहे व निवृत्ति ही नीट (सरळ) पाठ आहे, व अष्ट देवयोनी ही ज्याची कमरेच्या वरची अंगे आहेत. ॥104॥ आनंदभरित असा जो स्वर्ग हा ज्याचा गळा आहे, मृत्युलोक ही ज्याची कंबर आहे व पाताळ ज्याचा चांगला कमरमागचा पृष्ठभाग आहे ॥105॥ अर्जुना, त्याचे बाळसे तिन्ही लोक आहेत, असे एक मूल, ही प्रसवली आहे पाहा. ॥106॥ चौर्यांशी लक्ष योनी ह्या ज्याच्या (ज्या बालकाच्या) कांड्यांचे व पेरांचे सांधे आहेत, असे हे बालक दिवसेंदिवस वाढत आहे. ॥107॥ (माया ही त्या बालकाच्या) देहाच्या निरनिराळ्या अवयवांवर नामांचे अलंकार घालते व मोहरूपी दुधाने ती माया या बालकाला नित्य नवेपणाने वाढविते. ॥108॥ वेगवेगळ्या सृष्ट्या, त्या बालकाची हातांची व पायांची बोटे आहेत व प्रत्येक योनीत असणारे निरनिराळे अभिमान हे त्या बोटात घातलेल्या अंगठ्या होत. ॥109॥ स्थावर-जंगमात्मक जगद्रूपी एकुलते एक व अविचारकाली सुंदर वाटणारे असे हे मोठे बालक, त्याला जन्म देऊन ही (माया) वाढली. ॥110॥ ब्रह्मदेव हा या बालकाचा प्रात:काळ आहे, विष्णु हा मध्याह्न काळ आहे व सदाशिव हा सायंकाळ आहे. ॥111॥ हे बालक खेळून आले, म्हणजे महाप्रळयरूप शेजेवर निजते व पुन्हा कल्पाच्या आरंभी भेदज्ञानाने जागे होते. ॥112॥ अर्जुना, याप्रमाणे हे बालक मिथ्या दृष्टीच्या घरात युगांच्या मालिकांची पावले कौतुकाने टाकते. ॥113॥ या बालकाचा संकल्प हा आवडता आहे व अहंकार हा खेळगडी आहे. अशा या बालकाचा शेवट (नाश) ज्ञानाने होतो. ॥114॥ आता हे फार बोलणे राहू दे. वर वर्णन केल्याप्रमाणे माया ही सर्व जगताला जन्म देते. या क्रमात त्या मायेला माझ्या अधिष्ठानाचा आधार मिळतो. ॥115॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : रुखाचा आवांका, जैसी बीजकणिका


