पु. शि. रेगे यांची ‘सावित्री’ ही अवघी 117 पानांची लहानशी कादंबरी आहे. सावित्रीने एका आवडलेल्या पुरुषाला, जो तिला बहुतेक गाडीत भेटला होता, लिहिलेली 39 पत्रे यात आहेत. 1939 ते 1947 या कालावधीत लिहिलेली ही पत्रे आहेत. ती आई नसलेली आणि वडील लेखनाच्या कामात सतत व्यग्र असलेल्या पालकांची मुलगी असते. तिला वडील आनंदभाविनी म्हणत. तिने या व्यक्तीला लिहिलेल्या पत्रांतून कथा उलगडत जाते. पण त्याने लिहिलेली पत्रे नसल्यामुळे त्याच्या पत्रातला मजकूर तिच्या लेखनातूनच समजतो. ही कादंबरी लहानशी असली, अगदी हाताच्या पंजात मावण्याइतकी तरी, लवकर वाचून होत नाही! कारण, समजून वाचावी लागते. सुंदर सरळ भाषा, शब्दांचं मोहक वैविध्य वाचायला मिळतं. उदा. सोहीरा शब्द. याचा अर्थ मला समजला नव्हता. सोहीरा म्हणजे भान!
मुखपृष्ठावर पिसारा असलेला मोर आहे. त्याने पिसारा फुलवलेला नाही, तो नाचत नाही. सुरुवातीला ऋग्वेदातला देवीसूक्तातला श्लोक येतो – मी ज्याची कामना करते, त्याला तेजपुंज करते… अशा अर्थाचा हा श्लोक आहे. हा श्लोक इथे का लिहिला? हे समजायला ही कादंबरी वाचायला हवी.
सुरुवातीला राजम्माने सांगितलेली, लच्छी आणि मोराची कथा आहे. ज्यात ती म्हणते, ‘आपल्याला आनंदात राहायचं असेल तर, जे जे हवं असेल ते आपणच व्हावं!’ या कथेचा रूपकात्मक सुरेख उपयोग करण्यात आला आहे. अशा लहानशा कथा यात येतात. त्यात झाड, पाखरे आणि राजाची कथा आहे. ती सावकाश अर्थ समजून पचवून वाचावी लागते. तेव्हा गर्भितार्थ समजतो. सावित्री जिला सगळे साऊ म्हणतात, निर्मळ मनाची मुलगी आहे. ती म्हणते, ‘मी पहिल्यांदा काय शिकले असेन तर, स्वतःला विसरायला…’ पत्रांतून ती संयमितपणे भावना व्यक्त करते, प्रेम व्यक्त करते. तो तिला भेटायला येण्याचे ठरवतो, पण येत नाही. त्यासाठी कारण देतो, तेही न पटण्यासारखे! पुढे तो शिकायला इंग्लंडला जातो आणि ती अप्पांबरोबर जपानला जाते. तिथे एजवर्थ, अप्पांचे मित्र भेटतात. साऊने पत्रांत काहीजणांचा उल्लेख केला आहे – ल्योरे, राजम्मा, नामुरा, ओसाका, मि. सेन, बीना.
हेही वाचा – Bookshelf : मनात खोलवर प्रभाव पाडणाऱ्या ‘चौघीजणी’
एजवर्थ म्हणतात की, ‘पुढच्या जन्मी मी कुर्गी स्त्रीचा जन्म घेणार आहे…’ हा धागाही लेखकाने पुरा केला आहे. असे लहान वाटणारे उल्लेखसुद्धा कथानकात अर्थपूर्ण रंग भरतात. ती पत्र लिहित असलेला पुरुष तिच्याकडे पाच दिवस राहून जातो. दोघे बुद्धिमान आणि कलासक्त असल्याचे जाणवत राहते. तो शांत, ऋजू, न्यायबुद्धी, मागचं पुढचं सांधून त्यांना नव रूप द्यायची हातोटी असलेला असा आहे. ती म्हणते, ‘मी तुम्हाला आपलंसं करून घेतलं आहे, मला तुमचंसं करून घेतलं आहे.’ त्याने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे ती देत नाही. स्वत: मात्र भरपूर प्रश्न विचारत राहते. त्यांचे नाते असेच पुढे जाते. तो थिसीसमध्ये तिचे आभार मानतो. इतके ते भावनिकदृष्ट्या जवळ आलेले आहेत.
ल्योरे ही स्वीडिश मुलगी तिची मैत्रीण होते. सावित्री एक फोटो पत्रातून पाठवते. यात ल्योरे आणि तिने पोशाखांची अदलाबदली केली आहे, असे ती म्हणते. पुढे एका पत्रात ती लिहिते, ‘तुम्ही मला भेटला नाहीत आणि ल्योरेला भेटू शकलात, तर ती मीच समजा.’ ल्योरे त्याला स्वतंत्रपणे पत्र लिहिते असेही तिला वाटते.
सावित्रीला सतत सुजन कसे भेटतात, असे तो विचारतो. ती म्हणते, ‘दु:खाच्या पलीकडे एक सुख असतं, तसं सुखाच्या पलीकडे एक दु:ख असतं.’ सुजन आणि दुर्जन यावर ती भाष्य करते. स्वतःकडे दुसर्याच्या दृष्टीने पाहण्याचा खेळ ती खेळते. हे तिला शक्य होते, कारण तिला स्वतःला विसरता येत असते.
मेजर सेन आणि मिसेस सेन मृत्यू पावल्यावर त्यांच्या मुलीला, बीनाला घेऊन ती भारतात परतते. ‘बीना माझ्यासाठी तृप्त मातृत्व अनायासे घेऊन आली,’ असे ती लिहिते. युरोपात युद्ध सुरू झाल्यावर काही पत्रे गहाळ होतात. जेव्हा त्याचं पत्र मिळतं, तेव्हा ती लिहिते, ‘आज तुमचं ओळखीचं लाडकं अक्षर घेऊन मी मला मिरवलं.’ सहा वर्षांच्या पत्रलेखनातून निर्माण झालेल्या नात्याबद्दल ती लिहिते, ‘पहिल्यांदा एक सहेतुक वेगळेपणा आणि दुसऱ्यांत एक निर्हेतुक आपलेपणा दिसून येईल.’ शेवटी तो भारतात परत यायच्या तयारीला लागतो. तिला भेटायला अधीर झालेला असतो. शेवटच्या पत्रात ती पुन्हा सुरुवातीच्या मोराच्या गोष्टीचा उल्लेख करते. लेखकाने या कथेचा किती खुबीने वापर केला आहे!
हेही वाचा – एव्हरग्रीन… ‘सारे प्रवासी घडीचे’!
कादंबरी वाचून संपल्यावर त्यातल्या कितीतरी संकल्पनांचा, वाक्यांचा विचार मनात सुरू राहतो. खलनायक नसलेली, धक्कादायक घटना नसलेली ही कथा आहे; तरी, ती मनाचा ठाव घेते. त्यातले नाट्य तरीही आपल्याला बांधून ठेवते. हा केवळ सावित्रीच्या मनाचा व्यापार आहे. तिच्या नजरेतून आपण तिच्या प्रियकराबद्दल आडाखे बांधतो. सावित्रीला आपण ओळखू लागलो, असे वाटत असताना ती अनोळखी, अथांग वाटू लागते.
ही मराठीतली खूप गाजलेली कादंबरी. लेखकाची ही पहिलीच कादंबरी. एवढ्या लहानशा पुस्तकाने इतके वैचारिक खाद्य पुरवले आहे की, पाने आलटून पालटून पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते, तरी अतृप्त वाटते… इतके लिहूनही अपूर्ण वाटतंय, कारण सावित्रीचा परिचय करून देणे कठीण आहे.


