आपला प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. रोज नवीन प्रश्न समोर उभे राहत असतात. खरंतर, ती आपली एक प्रकारे परीक्षाच असते. मनात सहज विचार आला…
मग गंमत म्हणून मी एक प्रयोग करून बघितला. काही दिवस माझ्याच रोजच्या दिवसभराच्या वागण्याचा पेपर रात्री तपासून पाहिला. त्यातले प्रश्न किती वेगवेगळे होते बघा हं…
एका वाक्यातली उत्तरं – वरवर साधी, पण कस बघणारी होती. काही प्रश्नांना अगदी कमी शब्दांत एका वाक्यात उत्तर देणं, फार अवघड गेलं.
जोड्या लावा – हा प्रश्न सोपा वाटला, पण लावलेल्या जोड्या काही दिवसांनी चुकीच्या ठरल्या.
मोठी प्रश्नोत्तरे सविस्तर लिहायची होती. कधी कधी त्यांची उत्तरे बरी आली, कधी थोडक्यात चुकली. तरी तिथे चांगले मार्क देता आले.
विरुद्धार्थी कोण ते सांगता आले, पण ते कधी समानार्थी झाले हे समजलेच नाही…
उघडपणे न बोलता मनातल्या मनात बोललेल्या… गाळलेल्या जागा भरा – हा पण पेपरातला भाग होता. त्याचेही गुण तपासले. त्या भरल्या नाहीत, हे बरे झाले हे लक्षात आले. मौन राहायला शिकायला हवे, समजते आहे. हळूहळू अभ्यासाने ते पण साध्य होईल. अभ्यास केलेला असूनही काही प्रश्नांची उत्तरं ऐनवेळी आठवलीच नाही.
हेही वाचा – प्रेमाचे झाड
कोण कोणास म्हणाले – हे उमगायला बराच वेळ गेला. त्यांची उत्तरं नंतर कळल्याने त्याचा उपयोग होत नाही. कारण तोपर्यंत विषय संपलेला असतो.
संदर्भासहित स्पष्टीकरण तर ऑप्शनलाच टाकायचे ठरवले. त्यासाठी दुसरा अभ्यास फार करावा लागतो आणि इतकं सविस्तर सांगूनही उत्तर समाधानकारक देता येत नाही, हे समजले.
गणिताचा पेपर फारच अवघड गेला. हातचे धरले… ते धरायला नको होते! त्यामुळे गणित साफ चुकले, हे नंतर समजले. बेरीज कशाची करायची आणि वजा काय करायचे, हळूहळू आता कळत आहे. त्यातही बरीच गडबड होत आहे. गुणाकार आणि भागाकार कशाचा करायचा, हा संभ्रम आहेच!
तोंडी परीक्षेची गोष्टच वेगळी. तिथे बोलण्याच्या स्तराला सगळ्यात जास्ती मार्क ठरवले! कोणाशी, काय, कसं, किती वेळ बोलले… याचा नीट अभ्यास केला. यात अचानक नको ते बोलल्याने, अनवधानाने अनेक चुका होत आहेत.
अध्यात्माचा अभ्यास करण्यात ‘समाधान’ आहे, हे उमगले आहे. तिथे मार्कांची भानगडच नाही. आत्मसुख मात्र अपार आहे. त्यामुळे त्यात आनंद वाटतो आहे. स्तोत्र आणि मंत्र यांचे नुसते पाठांतर न करता, अर्थ समजून उमजून करायचे, हे आता समजले आहे. त्यामुळे ते आता जरा जरा जमायला लागले आहे.
हल्लीच नवीन सुरू झालेला विषय – ‘मूल्य शिक्षण’! तो पेपर संस्कारांमुळे त्या मानाने सोपा गेला.
मोबाइलचे आधुनिक तंत्रज्ञान – यासाठी जाणत्यांची म्हणजे नातवंडांची शिकवणी लावली आहे. वेळ त्यांच्या सोयीनुसार! त्यामुळे त्या विषयाचा आनंद आहे. भीती नाही.
असं सगळं चालू असताना… कधी जेमतेम पस्तीस मार्कांनी काठावर पास झाले.
कधी फर्स्ट क्लास तर कधी डिस्टिंक्शन पण मिळाली…
हेही वाचा – ते दोघे…
बरं, ही परीक्षा कायमची नाही, हे लक्षात आलं आहे. अभ्यास कमी पडला तर, परत आपण मागे पडणार हे पण समजले आहे. गुणवत्ता यादीत यायचं तर अजून अभ्यास हवा आहे. ही जगण्याची ‘गुणवत्ता’ आपली आपण काढून त्याला मार्क द्यायचे. इथे कॉपी करता येत नाही, हे लक्षात आले. आपला पेपर आपणच तपासायचा… प्रत्येकाचे सिलॅबस वेगळे, त्यामुळे पेपर फुटायची भीतीच नाही.
आपला पेपर आणि आपणच परीक्षक! कठोरपणे पेपर तपासायचा, हे ठरवले आहे, तरच चुका सुधारून प्रगती होईल हे आता नीट समजले आहे. नुसती प्रगती नको, तर त्याबरोबर अंतरिम मनःशांती हवी आहे. त्याच्या अभ्यासासाठी संत साहित्याची पुस्तकं हातात आहेत.
एक मजा मात्र झाली आहे. रात्री रिझल्ट चांगला येण्यासाठी दिवसभर सतर्क राहावं लागत आहे. अजून एक म्हणजे, काही दिवस परीक्षांचेच असतात. तेव्हा अभ्यास कसून करावा लागतो.
वय वाढत जाईल तसे पुढे पुढे पेपर अजून अवघड असणार आहेत, हे माहीत आहे. आता सराव सुरू आहे… बघू काय होते… तुम्ही पण बघा ना हा प्रयोग करून… फार अवघड नाहीये ते!
आता लेख पूर्ण करते. आजचा माझा होमवर्क संपला.


