पहाटेचे पाच वाजले, तसे काशिनाथरावांना जाग आली. ही त्यांची रोजचीच वेळ. आता उठून काय करायचे, हा त्यांच्यापुढे प्रश्न. बेडरूममध्ये मुलगा प्रमोद आणि सून प्रणिता, नातू आदर्श झोपलेले. काशिनाथराव आणि त्त्यांची पत्नी हॉलमध्ये… त्यांच्या पत्नीला गुडघेदुखी असल्याने ती कोचावर आणि खाली चटईवर काशिनाथराव.
काशिनाथराव चुळबूळ करत पडून राहिले. त्यांना माहीत होतं, यावेळी आपण उठलो तर सर्वांच्या तोफखान्याला तोंड द्यावे लागेल. त्यापेक्षा शांत पडून राहावे. चहाचा वास आला की, हळूच उठावे, कोणी चहा दिला तर गुपचूप घ्यावा.
आपली परिस्थितीच तशी आली आहे किंवा घरातील इतरांनी आपली परिस्थिती घरातील झाडूसारखी केली आहे. काशिनाथरावांनी नि:श्वास टाकला. पैसे न कमवणाऱ्या म्हाताऱ्याची परिस्थिती ही अशीच.
काशिनाथरावांची पत्नी उठली आणि तिने चहा ठेवला. ते हळूच उठले आणि वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश झाले. चहा झाल्यावर ती मुलाला आणि सुनेला उठविण्यासाठी, त्यांच्या बेडरूमजवळ गेली आणि दारावर थापा मारू लागली, हे त्यांनी ऐकले. ती आता आपल्याला चहा देईल, या आशेवर काशिनाथराव कोचवर बसून राहिले. तोपर्यत सून उठली आणि चहा घ्यायला किचनमध्ये गेली. मग दोघींचे बोलणे त्यांच्या कानावर येत होते…
सून – घेवड्याच्या शेंगा आहेत, त्याची भाजी करा आणि चवळीची आमटी करा… आदर्शच्या डब्यात दही-साखर घालून आणि पोळी द्या… प्रमोदला आज डबा नको, तो बाहेर जेवणार आहे… मी आंघोळ करून येते मग पोळ्या लाटूया.
सासू – हो, तू ये आंघोळ करून, तोपर्यत मी शेंगा सोलते.
सासू-सूनेचे बोलणे काशिनाथराव ऐकत होते. पण आपणास उठून पंधरा मिनिटे झाली तरी दोघींपैकी कोणी चहा द्यायचे नाव घेत नव्हते. प्रणिता आपले कपडे घेऊन बाथरूममध्ये गेली आणि त्यांची पत्नी आतमध्ये धुसफूसत होती.
“चहा हवा तर आतमध्ये यायला काय होतं… माझं पण वय झालंय… वय झाल तरी मिजास काही कमी नाही…” अस बडबडत त्यांच्या पत्नीने गार झालेल्या चहाचा कप त्यांच्यासमोर आदळला.
“अगं, पण तू आणि प्रणिता जेवणासंबधी बोलत होतात ना, मग मी आत कसा येऊ?”
“ती पण सूनच ना तुमची? उद्यापासून तिच्याकडे चहा मागा… माझं आता वय झालंय लक्षात ठेवा…” असं बडबडत ती आत गेली. काशिनाथरावांच्या मनात आले, सून चहा विचारत नाही आणि तिची सासू माझ्याकडे चहा मागू नका, सुनेकडे मागा, असे म्हणते.
काशिनाथरावांना विल्स ओढायची तल्लफ आली, पण या घरात सिगरेट ओढायची बंदी. गेली पन्नास वर्षे आपण सिगरेट ओढतोय… रोज दोन पाकिटे! मग डॉक्टर सूचनेनुसार कमी केले, हळूहळू रोज एक पाकीट… मग दिवसाला सहा… आता दिवसाला चार… पण तेवढी पण ओढू देत नाहीत. एकदम व्यसन कसे सुटेल?
काशिनाथरावांनी तल्लफ मारून टाकली. खाली पाय मोकळे करायला जावे, तेव्हा एक ओढावी आणि एक पेपरमिट खाल्ली म्हणजे वास येणार नाही, त्यांची ही नेहमीची आयडिया. त्यांनी तो कोमट चहा घेतला आणि कप आत नेऊन ठेवला. आत बायको पोळ्यांचं पीठ डब्यातून काढत होती.
तिने त्याला पहिल्याबरोबर टोमणा मारला… “काम ना धाम, चपात्या करायला शिकायला हरकत नाही… नुसत्या सिगारेटी फुंकून जेवण कसं मिळायचं?”
काशिनाथरावांचा संताप संताप झाला, पण आलेला राग त्यांनी गिळून टाकला. आपण चिडून काही बोललो, तर दुपारचे जेवण मिळायचे नाही… त्याखेरीज अजून टोमणे ऐकावे लागतील… त्यापेक्षा गप्प बसणे केव्हाही बरे!
ते गप्प बसले. आंघोळ करायची होती, पण आता मुलगा प्रमोद उठण्याची वेळ… म्हणजे तो आता उठेल, मग त्याची आई, नाहीतर बायको त्याच्या हातात गरम चहा देतील, मग साहेब पेपर वाचतील आणि आंघोळीला जातील. मग साहेब नाश्ता करून डबा घेऊन बँकेत जातील. तो बाथरूममधून बाहेर येईपर्यंत आपल्याला वाट पाहात रहावे लागेल, हे त्यांना माहीत होतं. तोपर्यत चहा प्यायल्यामुळे आलेला ‘नैसगिक कॉल’ थोपवत कोचावर बसायचं.
काशिनाथरावांना रोज आंघोळीनंतर देवपूजा करावी लागे… ही त्यांना शिक्षाच वाटे. आयुष्यात आपण देव देव कधी केलं नाही. देवळात आवडीने कधी गेलो नाही. लोक देवळाबाहेर का एवढ्या रांगा लावतात, याचे त्यांना आश्चर्य वाटे. जी मूर्ती कधी हालत नाही, बोलत नाही, श्वास घेत नाही, नैवेद्य दाखवतात तो कधी खात नाही… तरीपण नवनवीन देवळे बांधली जातात. काशिनाथरावांना वाटे यापेक्षा स्वामी विवेकानंद, साने गुरुजी किंवा बाबा आमटे अशी माणसे, ज्यांनी या भूमीत जन्म घेतला आहे, ज्यांनी सामान्य माणसासाठी खूप काही करून ठेवले आहे, त्यांची पूजा करावी किंवा त्यांची देवळे उभारावीत… हे असे त्यांना वाटले तरी आंघोळीनंतर देव्हाऱ्यातील देवांची तेच पूजा करत.
हेही वाचा – बनिया आणि मराठी कस्टमर
काशिनाथरावांनी आंघोळ केली आणि ते देवपूजेला बसले. त्यांना देवाची आवड नाही, हे त्यांच्या पत्नीला माहीत होते, त्यामुळे ती लक्ष ठेवून असे. आज पण त्यांनी देव ताम्हणात घेऊन धुतले आणि तोंडाने “ॐ केशवाय नम:, माधवाय नम:” म्हणू लागले. खरंतर, त्यांना तेवढेच स्तोत्र यायचे, त्यामुळे हे दोन शब्द मोठ्याने म्हणायचे आणि बाकी नुसते काहीतरी पुटपुटायचे. बाहेर बायकोला वाटले पाहिजे, स्तोत्र म्हणत आहेत…
तोपर्यंत प्रमोद नाश्ता करून गेलेला असे आणि बालवाडी शिक्षिका असलेली प्रणिताही नाश्ता करून आपला डबा घेऊन घेऊन घराबाहेर पडे.
पूजा आटोपल्यावर काशिनाथराव गॅलरीत आले. या लहानशा प्लॅटमध्ये त्यांना ही एक हक्काची जागा वाटे. दुसऱ्या मजल्यावरून खालचे जग त्यांना दिसायचे, त्याना भूक लागली होती. किचनमध्ये जाऊन पत्नीला म्हणावे तर, ती मांजरीसारखी फसकन अंगावर येणार… त्यापेक्षा वाट पहावी, कोणी बोलावते काय याची…
मुलगा आणि सून कामावर गेल्यावर त्यांच्या बायकोने बशीतून पोहे आणून दिले. कोचावर बसून काशिनाथराव खाऊ लागले… तशी ती बोलू लागली,
“बिल्डिंगमधील बायका दक्षिण भारताच्या ट्रिपवर चालल्यात, पण आमच्या नशिबात नाही ना…”
“मग तू पण जा, तेवढाच बदल.”
“जा म्हणे, पैसे कुठून आणू? नोकरी करत होतात तेव्हा पैसे फिक्स्डमध्ये नाहीतर, जाहिरातीत दाखवतात… काय ते… कसलासा फण्डमध्ये ठेवला असतात, तर कुणाकडे हात पसरायला लागले नसते…” ‘ती मुसमुसत म्हणाली.
“त्यावेळी पगार कसले? रोजची फिरती माझी. त्या पगारात घरभाडे, लाइटबिल आणि घरखर्च करून पैसे उरायचे काय?”
“मग सिगारेट्स कमी ओढायच्या! आणि दारू?”
“सिगारेटचा असा कितीसा खर्च… आणि रोज टूर करणाऱ्या माणसाला काही तरी विसावा हवा की नको?” काही क्षण थांबून ते म्हणाले, “पैसे प्रमोदला विचार?”
“तो काय देतो? पैसे पुरत नाहीत, म्हणून प्रणिता रोज चिडचिड करत असते.”
एवढ्यात त्यांचा नातू शाळेतून आला म्हणून ते दोघे गप्प झाले.
काशिनाथराव गॅलरीत आले. ‘आपल्या नातवाला सुद्धा आपल्याबद्दल ओढा नाही. घरात आपल्याला कोण जवळ नाही, मग त्याला तरी कशी ओढ वाटणार? आपण वयाच्या साठ वर्षांपर्यंत नोकरी केली, पण साबण, तेल बनविणाऱ्या कंपनीत सेल्समन म्हणून! रोजची टूर, कधी मराठवाडा, कधी विदर्भ, कधी कोकण…’
आपले काय चुकले, याचा ते विचार करत राहिले, मुळात आपल्याला गाव नाही.., ही हुरहूर त्यांना आयुष्यभर पोखरत राहिली. आपले गाव होते चंदगडजवळ, पण आपल्या वडिलांनी चुलत्याबरोबर भांडण केले आणि आपण गावाला कायमचे मुकलो. गाव असता तर गावी जाऊन राहिलो असतो, या प्रमोदच्या संसारात अडकलो नसतो आणि अपमानाचे जिणे जगलो नसतो.
दुसरी आपली चूक म्हणजे आयुष्यात भाड्याच्या घरात राहिलो, स्वतःची जागा घेऊ शकलो नाही. पगार तुटपुंजा, त्यामुळे ते जमलेच नाही. म्हणून या वयात स्वतःच्या नावावर एक इंच पण जमीन किंवा घर नाही.
प्रमोद फार हुशार नव्हता, त्यामुळे तो जेमतेम B. COM. झाला. त्याला काशीबशी छोटया अर्बन बँकेत नोकरीं मिळाली, पण स्वतःची जागा नाही म्हणून त्याचे लग्न होत नव्हते. त्याचसुमारास आपण निवृत्त झालो, मिळालेला फंड बायकोच्या सूचनेनुसार त्याच्या हवाली केला, या शहरात जागा घ्यावी म्हणून. त्या पैशात आणि त्याच्या बँकेकडून मिळालेल्या कर्जातून त्याने ही जागा घेतली, त्याच्या नावावर. मग वर्षाने त्याचे लग्न झाले, त्यात आपल्याकडील थोडेबहुत होते ते पैसे संपले आणि आपण उघडे पडलो.
प्रमोदच्या नावावर घर झाले, त्यामुळे तो आणि त्याची पत्नी शिरजोर झाली… ती दोघं आपल्या पत्नीला संभाळून असतात, कारण तिने त्याच्या मुलाला सांभाळले. शिवाय, तीच घरातील जेवणं, भांडीकुंडी करते… म्हणजेच त्यांना मोलकरीण ठेवण्याची गरज नाही.
आपणाला जेवण करता येत नाही, काही शिकावे म्हटले, तर त्या दोघी आपल्याला स्वयंपाकघरात घ्यायच्या नाहीत आणि आता या वयात शिकण्याची उमेदही नाही. एकांदरीत त्याच्या संसाराला आपला उपयोग नाही… आपल्याला पेन्शन मिळत असती तर?
इतरांसारखी आपली नोकरी नव्हती, त्यामुळे इतरांप्रमाणे बायकोला स्कूटरवर मागे बसवून आपण फिरू शकलो नाही किंवा मुलाला शाळेतून आणायला गेलो नाही. शनिवारी रात्री टूरवरून येणे आणि परत रविवारी रात्री दुसरी बॅग घेऊन दुसऱ्या टूरवर निघणे… यामुळे मुलाला आपला लळा लागला नाही! सर्व खर्च आईच करत होती, त्यामुळे त्याला आई एवढे पैसे मिळविते, असे वाटले असेल. पण घाम गाळून आणि पायी, सायकल चालवत मी अनेक गावे फिरत होतो, कंपनीला धंदा मिळवून देत होतो, त्याबदल्यात कंपनी जो पगार देत असे, तो त्याच्या आईच्या हातात देत होतो… याचीच त्याला कदाचित कल्पना नसेल.
प्रमोदची बायको प्रणिता, आपला नवरा आपल्या बापाला किंमत देत नाही, शिवाय आपला सासरा काही कमवत नाही, हे ती पहाते आहे, मग ती का किंमत देईल? आपल्या नातवाला सुद्धा आपल्याकडे देत नव्हते, त्याच्या लहानपणी! आपण त्याच्यावर माया केली ती लांबून. मग त्याला कसे आपल्याबद्दल प्रेम वाटेल?
अशा कोंदट वातावरणात त्याच्या डोळ्यासमोर आली सुलभा. त्यांना सहा महिन्यांपूर्वीची संध्याकाळ आठवली…
काशिनाथराव रोज संध्याकाळी नदीकडे फिरायला जात. नदीच्या घाटाच्या बाजूला जास्त गर्दी असायची. फिरायला येणारी जोडपी, वृद्ध लोक, तसेच क्रियाकर्म करणारे. गणपती विसर्जन पण त्याच बाजूला. नदीच्या विरुद्ध बाजूला फार गर्दी नसे. तुरळक लोक असत. काशिनाथराव म्हणून मुद्दाम या बाजूला येत… एक विल्स ओढत. नदीकडे पहात आपला कोंडमारा तिला सांगत. दिवसातला हा एक तास त्यांचा असे.
गेले आठ दिवस त्यांच्या लक्षात आले की, एक पस्तीस-चाळीस वर्षांची लग्न झालेली स्त्री रोज त्याच बाजूला बसे. रोज अंदाजे अर्धा तास ती तेथे असे. नदीकडे पहात हळूच पदर डोळ्याला लावी…
गेले आठ दिवस रोजच ती एकटी येई. कधीही तिचा नवरा सोबत नसे. काशिनाथरावांना आश्यर्य वाटले. एकदा धाडस करून त्यानी तिला विचारले –
“अहो बाई, तुम्ही रोज एकट्या कशा काय नदीवर येता? तुमच्या घरी कोणी सोबत नाही काय?”
“माझा नवरा आहे. तो कामाला आहे कंपनीत. तो साडेसातला येतो, त्या आधी मी घरी पोहोचते.”
“मी तुम्हला पहातो, तुम्ही एकसारखा पदर डोळ्याला लावत असता, तुम्हला कसला त्रास आहे का?”
“काय सांगू… माझं फुटकं नशीब! त्याला दोष देत असते मी.”
“काय झालं? मला सांगाल काय? मी पण रोज इथे या नदीपाशी येतो, माझं नशीब सांगायला…”
“तुम्हाला कसला त्रास आहे का? मी पहाते तुम्ही सिगरेट ओढत अधूनमधून डोळे पुसत असता.”
“होय, आहे बाई… कुटुंबात कोण विचारत नाही मला बायकोसकट. मला पेन्शन नाही… कंपनीकडून मिळेलले पैसे मुलाला दिले ब्लॉक घ्यावा म्हणून… आता मी कफल्लक झालो आहे. कुणालाच प्रेम नाही माझ्याबद्दल… तुझं काय? तुझं माहेर असेल ना?”
“होतं, माझ्या सावत्र आईने विकलं मला आणि बिजवराच्या गळ्यात बांधलं! माझा नवरा आहे दुप्पट वयाचा… माझ्या सावत्र आईचा भाऊ तो! पहिल्या बायकोला मूल झालं नाही म्हणून सोडलं तिला. माझे बाबा गेल्यानंतर तिने आपल्या भावाशी माझा पाट लावून दिला, पाच वर्षे झाली, मला पण मूल झालं नाही, म्हणून छळतोय तो मला.”
एवढ्यात तिला आठवण झाली… “जाते मी, साडेसातला येईल तो, त्याच्या आधी घरी पोहोचायला हवं,” असं म्हणत ती उठली आणि झापझप अंधारात नाहीशी झाली.
ती गेली त्या दिशेने ते पहात राहिले. असं मनापासून बोलणारे आपले तीन मित्र होते – अश्या, मोहन आणि आपा.
अश्या आणि मोहन आधीच वर गेले. राहिला आपा. आपा फोनवर बोलतो अधूनमधून; म्हणतो – ‘ये मुंबईत…’ पण आपल्याकडे जायला यायला पैसे कुठे आहेत? आपा म्हणतो, “वृद्धाश्रमात जा, तुझा खर्च मी करतो.” त्याला पेन्शन आहे म्हणून तो तसं म्हणतो, पण तो आपल्या आधी वर गेला तर मग?
नकोच ते.
दुसऱ्या दिवशी काशिनाथराव नदीवर गेले. थोडयावेळाने ती स्त्री आली. येताना वाटी घेऊन आली… त्यांच्या हातात दिल्यानंतर त्यानी पाहिले, वाटीत खरवस होता. किती वर्षांनी त्यांनी खरवस खाल्ला! मग ती रोज काहीना काही आणत राहिली. कधी दुधीहलवा, कधी कुंदा…
काशिनाथरावांना कळेना, आपण तिला काय द्यावे? त्याच्या खिशात फारच थोडे पैसे असत. नदीकडे येताना त्यांना एक फुलवाला दिसला. त्यांनी ठरवले मोगऱ्याची वेणी घ्यावी, आज सिगरेट घेऊ नये… ते पैसे वेणीसाठी वापरावे. त्यांनी मोगऱ्याची वेणी घेतली, नदीवर ती आली असताना तिला दिली. ती खूपच खूश झाली.
“मी तुझं नाव विचारलं नाही अजून!”
“मी सुलभा, माहेरची सुलभा विचारे. कोकणात मालवणजवळ माहेर माझं…” आणि मग ती मालवणबद्दल आणि तिच्या माहेरबद्दल सांगत राहिली. तिचं बोलणं ऐकत राहावे असे कशिनाथरावांना वाटले.
घरी जाताना तिने केसात माळलेली वेणी परत त्यांच्या हातात दिली…
“नवरा बघेल तर, कोणी दिली म्हणून खडसावेल.”
ती वेणी हातात घेऊन ते खूप वेळ तिच्या वाटेकडे पाहात राहिले.
मग रोज संध्याकाळी सुलभा येत राहिली, गप्पा मारत राहिली. येताना कधी लाडू कधी एखादा खायचा पदार्थ आणत राहिली… काशिनाथराव तिला एखादं फूल देत राहिले.
खूप वर्षांनी काशिनाथरावांना जीवनात आनंद आहे, असे वाटू लागले होते. संध्याकाळ झाले की, त्यांची पाऊले नदीकाठी वळू लागली होती.
असेच सहा महिने गेले आणि सुलभा यायची बंद झाली. काशिनाथराव तिची वाट पहात राहिले. एक दिवस… दोन दिवस… आठ दिवस. सुलभाचा पत्ता नव्हता.
काशिनाथराव अस्वस्थ झाले, गेली कुठे सुलभा? त्यांना आठवले, आपण वृंदा दूध डेअरीच्या मागे राहतो, अस तिने म्हटलं होतं. वृंदा डेअरीचे मालक कुलकर्णी आपल्यावर मुलीप्रमाणे प्रेम करतात, असे ती म्हणाली होती, हेही त्यांना आठवले.
दुसऱ्या दिवशी त्यांची पावले वृंदा डेअरीकडे वळली. ते कुलकर्णींच्या समोर उभे राहिले.
काशिनाथराव – अहो, या बाजूला सुलभा नावाच्या बाई राहात होत्या, त्या कुठे गेल्या ते तुम्हाला माहिती आहे का?
कुलकर्णी – होय, सुलभा आणि तिचा नवरा पाठीमागे राहतात. पण सुलभाचा नवरा विक्षिप्त आहे. वयाने पण मोठा. हल्ली तो तिच्यावर चिडला होता. ती नदीवर फिरायला म्हणून जायची तेव्हा कुणाबरोबर तरी बोलत बसायची, अशी त्याला बातमी कळली. शेवटी त्याने तिला खूप मारले आणि त्याच्या गावी मला वाटते राजापूरजवळ पाठवून दिले. आता ती परत यायची नाही. जाताना ती मला भेटली, तिचे तोंड सुजले होते. खूप रडत होती. तुमची तिची कशी ओळख?
काशिनाथराव – मीच तो नदीवर तिच्यासोबत गप्पा मारणारा! कुलकर्णी, मी आता आजोबा झालोय. माझ्या घरात माझ्याशी कोण प्रेमाने बोलत नाही, सर्वाना मी नको झालोय. मी नदीवर फिरायला जातो, तेव्हा ही नदीकडे पहात रडत पदर डोळ्याला लावताना दिसायची. मी तिची आस्थेने चौकशी केली. तिने तिची दुःखं मला सांगितली, मी माझी सांगितली, एवढंच!
कुलकर्णी – हो, मला कल्पना आहे. ती मला सर्व सांगायची, मोकळ्या स्वभावाची आहे ती. पण या धटिंगणाच्या तावडीत सापडली. मला सर्व समजत होते, पण शेवटी ती त्याची बायको होती. सुलभा मला सांगायची, काकांना म्हणजे तुम्हाला खरवस फार आवडतो. ते म्हणजे तुम्ही कदाचित तिची चौकशी करत इथे आलात, तर त्यांना खरवस द्या.
कुलकर्णीनी फ्रीज उघडून भांडे काढले आणि एका बशीतून खरवस त्यांच्या हातात दिला. डोळे भरून आलेल्या काशिनाथरावांनी सुलभाची आठवण काढत तो खरवस खाल्ला आणि त्यांनी कुलकर्णीचा निरोप घेतला.
काशिनाथराव आताशा निराश असायचे. घरची माणसे परक्यासारखी वागत होती… मनमोकळे बोलावे अशी सुलभा होती, ती पण आता येणार नव्हती.
पावसाळा सुरू झाला, नदी दुथडी भरून वाहात होती. आता रोज नदीवर जाणे, पण शक्य होत नव्हते. त्यांचा जीव घुसमटून गेला होता. कुणाशी मोकळेपणाने बोलावे, असे कोण दिसत नव्हते.
गणपती आले. त्यांच्या घरात गणपती येत नव्हता. पण गावात घरोघरी आणि सार्वजनिक गणपती बसले होते… गणपती विसर्जनाचा दिवस आला. घरची माणसे कुणाकडेतरी जेवायला जायची होती, बायकोने त्यांना गार झालेलं उप्पीट दिले, ते खात असताना अचानक त्यांच्या नातवाने आदर्शने टप्पा बॉल खेळता खेळता बॉल त्याच्या चष्म्यावर मारला. एक क्षणभर त्यांना तिडीक आली आणि एक फटका आदर्शवर मारला. आदर्शने मोठ्याने भोकांड पसरले आणि घरातील सर्व त्यांच्यावर तुटून पडले.
प्रणिता – काही वाटत नाही का लहान मुलाला मारताना? केवढ्याने मारलं माझ्या बाळाला! तुमच्याकडून मार खायला जन्म घेतला नाही त्याने…
प्रमोद – रिकामटेकडे झाला आहात तुम्ही. काहीतरी कामं करा. दोन वेळ घालतोय ते गप्प खायचे सोडून…
बायको – म्हाताऱ्या माणसाने कशाला लहान मुलाच्या खेळात पडावं? वेळ जात नसेल तर भांडी घासून द्या, नाहीतर देवाचे स्तोत्र म्हणा…
हेही वाचा – चॅलेंज.. अहंकार मोडून काढणारं!
एकापाठोपाठ त्यांच्यावर आरोप सुरू झाले. त्यांनी कान बंद करून घेतले… त्यांना मित्रांची आठवण झाली. मित्र असते तर त्यांच्याशी बोललो असतो. सुलभा होती, तेव्हा तिच्याशी बोलता यायचं. सुलभा पण गेली… म्हाताऱ्या माणसाला कोणीतरी बोलणारं हवं असतं. कोणी तरी त्यांचं ऐकणारं हवं असतं. आपल्याशी बोलणारं कोणी नाही राहिलं, ऐकणारं कोणी नाही राहिलं… कशासाठी आणि कुणासाठी जगायचं?
सायंकाळी गणपती विसर्जन सुरू झालं… गावात ढोलाचे, ताशाचे आवाज घुमू लागले. काशिनाथरावांच्या घरची सर्व मंडळी कुणाकडे तरी जेवायला गेली होती. सायंकाळ झाली तशी त्यांची पावले नदीकडे चालू लागली. वाटेत त्यांनी एक विल्स घेतली, फुलवाल्याकडून मोगऱ्याचा गजरा घेतला.
काशिनाथराव नदीशेजारी आले. नदी दुथडी भरून वाहत होती. त्यानी सिगरेट काढली, त्याचे मोठ-मोठे झुरके घेतले. ज्या ठिकाणी सुलभा बसायची, तेथे त्यांनी मोगऱ्याची वेणी ठेवली. एक मोठा दीर्घ श्वास घेतला आणि नदीच्या दिशेने चालू लागले.
दुसऱ्या घाटावर गणेश विसर्जन सुरू होते… फटाके फुटत होते… झांजा, मृदंग वाजत होते… भाविक मोठ्या आवाजात म्हणत होते… “गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला…”
काशिनाथराव पाण्याच्या दिशेने चालले होते, पाणी गुडघ्यापर्यंत आले, अजून पुढे पुढे…
दुसऱ्या घाटावरचे विसर्जन सुरूच होते.. सुरूच होते.


