चंद्रशेखर माधव
सुमारे 20 वर्षांपूर्वीची गोष्ट. आमचा एक मित्र शनीभक्त होता. नेहमी शनिशिंगणापूरला जायचा. त्याच्यासोबत आम्हीही बरेचदा शुक्रवारी रात्री कारने निघायचं… शनिवारी पहाटे शनिशिंगणापूरला दर्शन घ्यायचं आणि सकाळी 11 वाजेपर्यंत पुण्यात परत यायचं… अशा अनेक ट्रिप केल्या. बरेचदा, आम्ही पाच मित्र कारने जायचो. असंच एका ट्रिपच्या दरम्यान घडलेली ही घटना आहे. तेव्हा निखिलकडे मारुती एस्टीम होती. त्याच गाडीने आम्ही निघालो. साधारणपणे रात्री नऊ वाजता पुण्यातून निघालो. शिरूरच्या आसपास थांबून जेवण वगैरे केलं. त्यात सुमारे एक तास गेला असावा. साधारणपणे साडेअकराच्या सुमारास आम्ही नगरच्या घाटात पोहोचलो आणि घाट चढायला सुरुवात केली.
यादरम्यान रात्री प्रवास करणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या, जळगावकडे वगैरे जाणाऱ्या, बऱ्याचशा बसेस, आम्ही त्या गर्दीच्या रस्त्यावर अगदी सगळं कसब पणाला लावून ओलांडल्या होत्या. घाटात आमच्या पुढून एक डंपर जात होता. डंपर रिकामा असल्यामुळे बऱ्यापैकी वेगाने चालला होता. आम्हीही त्याच्या मागोमाग थोडं अंतर सोडून चाललो होतो.
तसं पहिल्यापासूनच निखिल अत्यंत सुरक्षितपणे गाडी चालवतो आणि शेजारी मी बसलो होतो. मी प्रवासाच्या दरम्यान अजिबात झोपत नाही. नुकतं जेवण करून निघालेले असल्यामुळे मागे बसलेले दोघे गाढ झोपी गेले होते. निखिल, मी आणि विवेक, आम्ही तिघेच जागे होतो. घाटात एके ठिकाणी डंपरने डावीकडे वळण घेतलं.
जसा डंपर डावीकडे वळला, आम्ही ही त्याच्या मागोमाग गाडी वळवली. थोडंसं अंतर, म्हणजे साधारण 200 ते 250 मीटर पुढे, गेल्यानंतर डंपर अचानक थांबला. पुढे काहीतरी झालं असावं, असं समजून आम्ही गाडी थांबवली आणि वाट पाहू लागलो. साधारणपणे एक-दोन मिनिटं गेली असावी. नंतर डंपरचा ड्रायव्हरच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि एका माणसाने, म्हणजे ड्रायव्हरने, खाली उडी मारली, दरवाजा बंद केला आणि पुढे अंधाराच्या दिशेने चालता झाला. अंधार होता तरी आम्हाला आमच्या गाडीच्या उजेडात ते दृश्य बरोबर दिसलं. तो जसा निघून गेला, तसं निखिलने आणि मी एकदम एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. मग निखिलनेच काच उघडून बाहेर डोकावून पाहिलं. बाहेर डोकावल्यानंतर आमच्या काय प्रकार झाला तो लक्षात आला होता.
हेही वाचा – अनाहूत सल्ला
तो डंपर मुख्य रस्ता सोडून डाव्या बाजूला रस्त्याचे काम सुरू होते, त्या साइटकडे वळला होता आणि आम्ही सुद्धा काहीही न पाहता त्या डंपरच्या मागोमाग साइटच्या दिशेने आलो होतो. काय प्रकार झाला, तो आमच्या लक्षात आला होता, यानंतर रिव्हर्स गिअर टाकला आणि गाडी मागे घ्यायला सुरुवात केली. जशी तो गाडी मागे घेऊ लागला, तसा अचानक मी “अरे, थांब थांब!” म्हणून ओरडलो आणि मागे बघितलं. आमच्या मागे मागे एक स्कॉर्पिओ सुद्धा येऊन थांबलेली होती.
म्हणजे, चकवा लागलेले आम्ही एकटेच नव्हतो! ते बघून आम्हाला जरा समाधान वाटलं. एव्हाना आम्ही ज्या बसेस ओलांडल्या होत्या, त्या आमच्या उजव्या बाजूला असलेल्या मुख्य रस्त्याने आमच्या डोळ्यादेखत भराभर पुढे निघून जाताना आम्हाला दिसत होत्या.
निखिलने ओरडूनच स्कॉर्पिओवाल्याला गाडी मागे घेण्यास सांगितलं. आम्हीही आमच्याच मूर्खपणावर हसत हसत पुन्हा मुख्य रस्त्यावर येऊन पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झालो.
हेही वाचा – मावशीची हाळी म्हणजे आंब्यांची वर्दी